तीळ (सिसॅमम इंडिकम) वनस्पती व फुले

तीळ ही वर्षायू वनस्पती पेडॅलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिसॅमम इंडिकम आहे. ती मूळची आफ्रिकेतील असून आजही तिळाच्या अनेक जाती तेथे वन्य स्थितीत आढळतात. भारतात तिळाच्या सहा जाती आढळत असून सिसॅमम इंडिकम ही जाती भारतात विकसित झालेली आहे. सु. ५००० वर्षांपूर्वीपासून मनुष्याने तिळाची एक उपयोगी वनस्पती म्हणून लागवड केल्याचे दिसून आले आहे. जगभरातील उष्ण प्रदेशात तिळाची लागवड तिच्या तेलबियांसाठी केली जाते. प्रतिकूल किंवा दुष्काळी परिस्थितीतही ती तग धरून वाढू शकते.

तीळ (बिया)

तीळ ही वनस्पती सु. १ मी. उंच वाढते. खोड लवचिक व फांद्यायुक्त असून त्यावर एकाआड एक पाने येतात. पाने साधी, मोठी (४–१४ सेंमी.), पातळ आणि केसाळ असतात. खालची पाने खंडित व थोडीशी लोमयुक्त असतात तर सर्वांत वरची पाने अंडाकृती असतात. फुले पानांच्या बगलेत मंजरीवर किंवा एकेकटी येतात. ती पांढरी, गुलाबी व पिवळी असून नलिकाकृती व घंटेच्या आकाराची आणि उग्र वासाची असतात. बोंड (फळ) लांबट व आयताकृती पेटिकेच्या स्वरूपात असून त्यावर चार ठिकाणी खाचा असतात. ते वाळले की वरच्या बाजूने आपोआप तडकते. बिया (तीळ) अनेक, काळ्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगांच्या असतात. बिया जेवढ्या फिकट तेवढे त्यांतील तेल जास्त आणि स्वच्छ असते.

तिळाच्या १०० ग्रॅ. बियांमध्ये जलांश ५.८%, प्रथिने २०%, कर्बोदके ११%, स्निग्ध पदार्थ (तेल) ६०%,  कॅल्शियम १%, आणि फॉस्फरस ०.७% असतात. अन्य कोणत्याही तेलबियांच्या तुलनेत तिळाच्या बियांमध्ये अधिक तेल असते. या तेलात इतर कोणत्याही तेलात नसलेले सिसॅमीन, सिसॅमोलीन आणि सिसॅमॉल ही प्रतिऑक्सिडीकारके असतात. त्यामुळे तिळाचे तेल दीर्घकाळ खवट न होता टिकून राहते. तिळाच्या तेलात, सूर्यफुलांच्या बियांच्या तेलाप्रमाणे, ओमेगा-६ मेदाम्ले असतात; मात्र, ओमेगा-३ हे मेदाम्ल नसते.

तिळाची मुळे, पाने, बिया व बियांतील तेल उपयुक्त असते. मुळे व पानांचा अर्क केसांच्या वाढीसाठी व ते काळे करण्यासाठी वापरतात. मूळव्याध, व्रण, भाजणे व हगवण अशा विकारांत तिळाचे तेल उपयोगी असते. पांढरे डाग आणि त्वचेचा दाह कमी करण्यासाठी कोरड्या त्वचेवर हे तेल वापरतात. अनेक व्यंजनात तिळाच्या तेलाचा उपयोग केला जातो. तिळापासून तीळपापडी व तीळगूळ असे अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. २०१० मध्ये जगभरात झालेल्या तिळाच्या उत्पादनात म्यानमार, चीन, भारत, इथिओपिया आणि सुदान हे देश आघाडीवर होते. त्या कालावधीत भारताकडून सर्वाधिक तिळाची निर्यात करण्यात आली होती, तर जपानकडून सर्वाधिक आयात करण्यात आली होती.