गोड्या पाण्यात आढळणारा एक मासा. झीब्रा माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या सिप्रिनीफॉर्मिस गणाच्या सिप्रिनीडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव डॅनिओ रेरिओ आहे. झीब्रा डॅनिओ असे या माशाचे व्यापारी नाव असून महाराष्ट्रात अंजू व पिडतुली अशीही त्याला नावे आहेत. हा मासा भारत, पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ व म्यानमार इ. देशांत आढळतो. भारतात गंगा नदीमध्ये कोलकाता व मच्छलीपट्टणम् येथे आढळतो. ओढे, कालवे, तलाव, पाण्याचे पाट व भाताची खाचरे या ठिकाणी हे मासे आढळतात.

झीब्रा मासा (डॅनिओ रेरिओ)

झीब्रा मासा झीब्रा माशाच्या शरीराची लांबी सु. ६.४ सेंमी. असून आकार पाणतीरासारखा (टॉर्पिडो) असतो. डोके मोठे व खवलेविरहित असून तोंड वरच्या दिशेने वळलेले असते. शरीराच्या दोन्ही बाजूंना शेपटीपर्यंत चार-पाच, आडवे व एकसारखे निळे पट्टे असतात. नराचे शरीर लांब व निमुळते असते आणि निळ्या पट्ट्यांमध्ये एकाआड एक सोनेरी पट्टे असतात. मादीचे पोट मोठे व फुगीर असते आणि निळ्या पट्ट्यांमध्ये रुपेरी पट्टे असतात. नरामध्ये गुदपक्षाच्या पुढे जनन अंकुराची एक जोडी असते. तिचा उपयोग मादीच्या शरीरात शुक्राणू सोडण्यासाठी होतो. झीब्रा माशाचा आयु:काल २-३ वर्षे असतो.

घरगुती जलजीवालयात झीब्रा माशांना महत्त्वाचे स्थान आहे. शिकाऊ मत्स्यप्रेमींना हे मासे पाळण्यासाठी उपयुक्त आहेत. आकर्षक रूप, खेळकर वृत्ती, चपळता, दणकटपणा, कमी किंमत व सहज उपलब्धता यांमुळे हे मासे मत्स्यप्रेमींमध्ये प्रिय आहेत. जीवदीप्तीचे जेलिफिशमधील अनुस्फुरण जनुक झीब्रा माशामध्ये संक्रमित केलेले आहे. अशा हिरव्या, तांबड्या व पिवळ्या संक्रमित झीब्रा माशांना घरी जलजीवालयात पाळण्यासाठी मोठी मागणी आहे. हे मासे सर्वभक्षी आहेत. जलजीवालयात त्यांना कीटक, कीटकांच्या अळ्या, वलयांकित कृमी, कवचधारी संधिपाद, खारविलेल्या माशांचे तुकडे, बारीक चिरलेला पालक, शिजविलेले वाटाणे किंवा कोरडे मत्स्य अन्न देण्यात येते. मादी रोज ३०-५० अंडी घालते. या अंड्यांचे पालन व संवर्धन करून झीब्रा मासे वाढविले जातात. त्यांची निर्यातही केली जाते. अमेरिकेत त्यांना मोठी मागणी आहे.

प्राणिविज्ञान संशोधनात झीब्रा माशाला पृष्ठवंशीय प्राण्यांचा ‘आदर्श नमुना’ मानतात. या माशाच्या जनुक आराखड्याचा उपयोग प्राण्यांची वाढ आणि जनुकांचे कार्य यांच्या अभ्यासासाठी केला जातो. मानवी जीनोम आणि झीब्रा माशाचा जीनोम यांच्यात आनुवंशिक दृष्ट्या काही बाबतींत साम्य आढळले आहे. माणसाचे अवयव आणि झीब्रा माशाचे अवयव यांच्याशी जी जनुके संबंधित आहेत, ती जनुके एकच असल्याचे दिसले आहे. त्यामुळे या माशांचा उपयोग जीवविज्ञान, कर्करोगविज्ञान, विषविज्ञान, प्रजननविज्ञान, मूल पेशींचा अभ्यास, पुनर्जनन वैद्यक आणि उत्क्रांती अभ्यास यांसाठी जगभर करण्यात येतो. भारतात नवी दिल्ली येथे इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या संस्थेत झीब्रा माशांच्या जनुक अनुक्रमाविषयी संशोधन चालू आहे.