अळूचे बेट

अळू हे झुडूप अ‍ॅरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कोलोकेशिया अ‍ॅटिकोरम आहे. ही वनस्पती मूळची आग्नेय आशियातील असून नंतर पॅसिफिक महासागरी बेटांवरही तिचा प्रसार झाला. हे झुडूप बहुवर्षायू कंदाभ असून जमिनीखाली व जमिनीलगत त्याचे स्टार्चयुक्त कंद वाढतात. मधला कंद आकाराने मोठा असून त्याभोवती लहान व वेगवेगळ्या आकाराचे कंद वेढलेले असतात. उष्ण प्रदेशात कंदातील पिठुळ गराकरिता (स्टार्चकरिता) या वनस्पतीची लागवड सर्वत्र केली जाते. अळूच्या कंदाला ‘आर्वी’ म्हणतात.

अळूच्या मधल्या कंदापासून मोठी, सु. २०-१५० सें.मी. लांबीची, छत्रासारखी, अंडाकृती व तळाशी त्रिकोणी खाच असलेली पाने येतात. देठ भक्कम, सु.१ मी. लांब व तळाला खोबणीसारखा असतो. फुलोरा कणिश प्रकारचा असून कणिशाच्या दांड्यावर सर्वांत खाली मादी-फुले, मध्यभागी वंध्य-फुले तर त्यावरच्या भागात नर-फुले असतात. फुलात ३-५ पुंकेसर असतात; जायांगात एक कप्पा असून त्यात पाच बीजाणू असतात. मृदुफळे लहान असतात. वनस्पतीचे ‘काळे’ अळू आणि ‘पांढरे’ अळू असे दोन प्रकार पिकवितात. देठ व पानांच्या शिरा जांभळट असलेल्या जातीला ‘काळे’ अळू ; तर हेच भाग हिरवे असलेल्या जातीला ‘पांढरे’ अळू म्हणतात.

अळूच्या कंदात प्रामुख्याने कर्बोदके २१%, प्रथिने ३% तसेच कॅल्शियम व लोह असते. पानात व देठात अ, ब इत्यादी. जीवनसत्त्वे, कॅरोटीन, कॅल्शियम व लोह असते. कंदाचा रस रेचक असतो. पानात कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक असतात. हे स्फटिक सुईसारखे टोकदार असतात. भाजी खाताना हे स्फटिक घशाला घासले गेल्यास घसा खवखवतो.

अळूच्या वाढीसाठी पाणी फार लागते. सांडपाण्यावर अळू चांगली पोसते. भारतात अळूच्या पानांचा व देठांचा उपयोग लज्जतदार अन्नपदार्थांसाठी करतात. अळूपासून कर्नाटकाच्या दक्षिण तसेच उडुपी भागात पात्रोडे, केरळात चेंबिला करी आणि गुजरातमध्ये पात्रा असे पदार्थ बनविले जातात. महाराष्ट्रात अळूवडी व अळूचे फतफते हे प्रकार प्रसिद्ध आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा