सूक्ष्मदर्शकातून दिसणारा एंटामिबा

अमीबाजन्य विकार हा आमांश या रोगाचा एक प्रकार आहे. अमीबा या एकपेशीय आदिजीवाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका जातीमुळे हा रोग होतो. हा रोग जगातील सर्व देशांत आढळतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका व आग्नेय आशिया या प्रदेशांत या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झालेला आढळतो. जगामध्ये सु. ५० लाख लोकांना दरवर्षी या रोगाची लागण होते व त्यातील ४० ते ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात.  

एंटामीबा हिस्टॉलिटिका या आदिजीवाच्या संसर्गाने मोठ्या आतड्याच्या अस्तरास दाहयुक्त सूज येते. या अमीबाच्या दोन अवस्था असतात : परिस्थिती अनुकूल असताना क्रियाशील अवस्था असते व प्रतिकूल असताना पुटिमय अवस्था (कवचयुक्त अवस्था) दिसते.

रोगवाहक व्यक्तीने हाताळलेल्या अन्नपाण्यातून व दूषित पदार्थांवर बसलेल्या माश्यांमुळे या रोगाचा प्रसार होतो. क्रियाशील अमीबा जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लाने नाश पावतात, पण पुटकावस्थेतील अमीबांवर त्या आम्लाचा परिणाम होत नाही. असे अमीबा लहान आतड्यात गेल्यावर स्वादुपिंडस्रावाच्या परिणामाने पुटीतून मोकळे होऊन त्याच्यातून अनेक पटीने क्रियाशील अमीबा तयार होतात. ते सर्व मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात जातात व नंतर आतील बाजूच्या नाजूक थराचा छेद करतात आणि त्याखालील थरात प्रवेश करतात. तेथे त्यांच्यापासून उत्पन्न होणार्‍या विषामुळे पेशींचा र्‍हास होऊन आतड्यात व्रण उत्पन्न होतो. रक्तवाहिन्यांच्या मार्गाने हे अमीबा यकृत, मेंदू, फुप्फुस व प्लीहा या ठिकाणी प्रवेश करतात. त्यांच्यामुळे पूयुक्त फोड उत्पन्न होऊ शकतात.

संसर्ग झालेल्या व्यक्तीस जुलाब होतात. मल दुर्गंधीयुक्त असतो. त्यात चिकट श्लेष्मा व काळपट रक्त पडू लागते. यामुळे अशक्तता, अरुची, पोटात उजव्या बाजूस दुखणे वगैरे लक्षणे दिसू लागतात. हा रोग चिरकाली असून सातत्याने त्याची लक्षणे दिसून येतातच असे नाही; पण अशी व्यक्ती वाहक म्हणून रोगप्रसार करीत असते. या रोगाचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत रक्त व शौचाची तपासणी करणे आवश्यक असते. सूक्ष्मदर्शकाखाली या रोगाचे एकपेशीय अमीबा व त्यांच्या पुटी दिसून येतात.

शिजविलेले अन्न, उकळलेले पाणी आणि वैयक्तिक व परिसराची स्वच्छता ठेवणे इ. गोष्टी या रोगापासून दूर राहण्यास मदत करतात. पॅरामोमायसीन (ह्युमॅटिन) सारखी प्रभावी औषधे या रोगाच्या उपचारासाठी अलीकडच्या काळात उपलब्ध झाली आहेत.