(कॉमन कोल्ड). सर्दी किंवा पडसे हा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. सर्दीमुळे मुख्यत: श्वसनसंस्थेच्या सुरुवातीच्या भागात संसर्ग होतो. कधीकधी हा संसर्ग नाक, नासागुहा आणि स्वरयंत्र या भागापर्यंत पसरतो. सर्दीमुळे नाकातील श्लेष्मस्तराचा दाह होतो आणि त्यातून स्राव तयार होतो. नाकातील स्राव पाण्यासारखा गळत असल्यास त्याला नाक गळणे, स्राव घट्ट असल्यास आणि नाकाबाहेर पडत नसल्यास नाक दाटणे आणि स्राव पूयुक्त असल्यास सर्दी पिकणे म्हणतात. सर्दी झालेल्या व्यक्तीला अन्य काही आरोग्याच्या समस्या असल्यास सर्दीमुळे न्यूमोनिया होऊ शकतो.

ऱ्हायनोव्हायरस विषाणू

सर्दी मुख्यत: ऱ्हायनोव्हायरस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषाणूंमुळे होते. सर्दीची सुरुवात एकाएकी होते. सुरुवातीला शिंका येतात. नाक, घसा कोरडा पडून दाह जाणवतो. डोळ्यांची जळजळ सुरू होते. नंतर नाकातून, डोळ्यातून पाण्यासारखा स्राव वाहू लागतो. कधीकधी बारीक ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी विषाणूंच्या संसर्गाची लक्षणे दिसतात. विषाणू संसर्गानंतर ही लक्षणे दोन दिवसानंतर दिसतात; हळूहळू लक्षणे कमी होत जाऊन रुग्ण पाच-सात दिवसांत बरा होतो. कधीकधी सर्दीची लक्षणे तीन आठवडे टिकतात. सर्दीला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचे सु. २०० प्रकार असून त्यात ऱ्हायनोव्हायरस विषाणू सामान्यपणे अधिक संख्येने आहेत. सहसा दरवेळी नवीन विषाणूंमुळे सर्दी होते. कारण सर्दीच्या कोणत्याही विषाणूरोधी निर्माण झालेली प्रतिकारक्षमता दुसऱ्यांदा उपयोगी पडत नाही.

सर्दीचा प्रसार हवेतून, सर्दी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा सर्दी झालेल्या व्यक्तीच्या वस्तू हाताळल्याने होतो. लहान मुलांच्या बाबतीत पाळणाघरे, शाळा अशा ठिकाणी संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. प्रतिकारक्षम यंत्रणा दुबळी असल्यास सर्दी होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये कुपोषणामुळे सर्दी होऊ शकते. प्रौढांमध्ये अपुरी झोप, मानसिक ताण अशी कारणे सर्दीला कारणीभूत असू शकतात. सर्दी झालेल्या व्यक्तीला विश्रांतीची जरुरी असते. सर्दी आणि एन्फ्ल्यूएंझा यांची लक्षणे सारखीच असतात. परंतु एन्फ्ल्यूएंझाची लक्षणे अधिक तीव्र असून त्यामुळे नाक गळत नाही.

अधिहर्षतेमुळेही विषाणुजन्य सर्दीसारखी लक्षणे उद्भवतात. नाकातून शिरलेले अनेक जैविक वा अजैविक, विषारी वा रासायनिक पदार्थांचा, म्हणजेच प्रतिजनांचा, प्रतिकार करण्यासाठी शरीरातील प्रतिक्षम यंत्रणा कार्यरत होते. अशा वेळी तिच्याद्वारे हिस्टामिने ही रसायने स्रवली जातात. या रसायनांच्या परिणामी सर्दीची लक्षणे दिसून येतात. अधिहर्षतेमुळे सर्दीत नाकाला तसेच डोळ्यांना खाज येणे, शिंका व डोळ्यांतून पाणी गळणे, नाक चोंदणे, डोके जड होणे इ. लक्षणे दिसतात. अधिहर्षताजन्य सर्दीची लक्षणे एकाएकी सुरू होतात आणि थोड्याच वेळात बंद होतात; कधीकधी ती पुन:पुन्हा उद्भवू शकतात. अशा सर्दीचे इतर उपद्रव कमी असतात.

मनुष्याला सर्दी वारंवार होऊ शकते. सरासरी प्रौढ व्यक्तीला वर्षभरात दोन ते तीन वेळा सर्दी होते; लहान मुलांना सहा-सात वेळा सर्दी होऊ शकते. सर्दीमुळे प्रौढांना ताप येत नाही. मात्र बालकांना किंवा लहान मुलांना सहसा ताप येतो. बहुधा पावसाळ्यात व हिवाळ्यात सर्दी होण्याचे प्रमाण वाढते.

हात स्वच्छ ठेवणे, अस्वच्छ हातांनी नाक, डोळे किंवा तोंड यांना स्पर्श करावयाचे टाळणे तसेच आजारी व्यक्तींपासून दूर राहणे इ. उपायांनी सर्दीचा प्रसार टाळता येतो. नाक तसेच तोंड झाकणारा कापडी मुखवटा वापरल्यास सर्दीचा प्रसार तसेच सर्दीपासून काही प्रमाणात बचाव करता येतो. सर्दीवर कोणतीही लस उपलब्ध नाही. मात्र सर्दीवर औषध नसले, तरी सर्दीच्या लक्षणांची तीव्रता कमी करता येते. सर्दीवरील उपचारांमध्ये मुख्यत: सर्दीच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर भर असतो. पुरेशी विश्रांती घेणे, भरपूर पाणी पिणे किंवा फळांचा रस घेणे, मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे इत्यादी साधे उपाय केल्यास सर्दीपासून दिलासा मिळतो. सर्दीची लक्षणे उद्भवल्याक्षणीच झिंकयुक्त औषधे घेतल्यास सर्दीची तीव्रता कमी होते. ताप कमी व्हावा किंवा अंग दुखू नये म्हणून आयब्युप्रोफेन आणि पॅरासिटेमॉल इ. औषधे देतात. खोकल्याची औषधेदेखील सर्दीवर निरुपयोगी असतात. सर्दीवर शक्यतो प्रतिजैविकांचा उपचार करू नये, असा संकेत आहे.