पावशा पक्ष्याचा समावेश क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी पक्षिकुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव हायरोकॉक्सिक्स व्हेरिअस आहे. तो आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, भूतान इ. देशांमध्ये आढळतो. भारतात समुद्रसपाटीपासून सु. १,००० मी. उंचीपर्यंत तो सर्वत्र सापडतो. तो एकाच जागी राहणारा व निवासी पक्षी आहे; परंतु उंच तसेच शुष्क प्रदेशात राहणारे हे पक्षी लगतच्या प्रदेशांत स्थलांतर करताना दिसतात. तो शिकरा (ॲक्सिपीटर बेडिअस) या पक्ष्यासारखा दिसतो. मात्र पावशा आणि शिकरा यांचे गणही वेगळे आहेत. शिकरा हा ॲक्सिपिट्रीफॉर्मिस या गणातील आहे.

पावशा (हायरोकॉक्सिक्स व्हेरिअस)

पावशा आकाराने कबुतराएवढा पण त्यापेक्षा सडपातळ आणि जास्त लांब शेपटी असलेला पक्षी आहे. शरीराची लांबी सु. ३४ सेंमी. असते. पाठ करड्या रंगाची असून पोटाकडचा भाग पांढरट असतो आणि त्यावर आडव्या पिंगट रेषा असतात. शेपटीवर तांबूस पट्टे असतात. डोळ्यांभोवती असलेल्या पिवळ्या वर्तुळांमुळे तो सहज ओळखता येतो. नर मादीपेक्षा आकाराने मोठा असतो.

प्रामुख्याने वड, पिंपळ, अंजीर, बोरे व इतर वृक्षांची फळे आणि कीटक हे पावशा पक्ष्याचे अन्न असते. ते केसाळ सुरवंटाला दाबून त्यांची आतडी बाहेर काढतात, फांद्यांना घासून आतडी वेगळी करतात आणि नंतर ती गिळतात. ते वृक्षवासी असून जमिनीवर क्वचितच उतरतात. दाट झाडी, आमराई, बागा व शेताच्या आजूबाजूचा परिसर येथे त्यांचे वसतिस्थान असते. ते एकएकटे असतात.

पावश्याला दुरून पाहिल्यास तो हुबेहूब शिकऱ्यासारखा दिसतो. त्याची उडण्याची व झाडाच्या शेंड्यावर उतरण्याची शैलीदेखील शिकऱ्यासारखी असते. उडताना आणि हालचाली करतानाही तो शिकऱ्याची नक्कल करतो. निसर्गातील अनुकारितेचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

पावशा सहजासहजी नजरेस पडत नाही. मात्र मार्च-एप्रिलच्या सुरुवातीपासून पावसाळा संपेपर्यंत नराचे ओरडणे सतत घातलेल्या शिळेमुळे जाणवते. त्याचे ओरडणे म्हणजे तार व कर्कश स्वरातील शीळ असते. या शिळेचा आवाज टिपेला पोचून शीळ अचानक बंद होते व थोड्याच वेळाने पुन्हा सुरू होते. ही मालिका सुरुवातीला संथ असून उत्तरोत्तर वाढत जाते आणि काही वेळा असह्य होते. त्यामुळे इंग्रजांनी त्याला ‘ब्रेनफीव्हर बर्ड’ हे नाव ठेवले आणि ते पुढे रूढ झाले. त्याच्या ओरडण्यासंबंधी निरनिराळ्या प्रदेशांतील लोकांच्या निरनिराळ्या कल्पना आहेत. महाराष्ट्रातील लोकांना ही शीळ ‘पाऊस आला’ किंवा ‘पेरते व्हा’ अशी आहे, असे वाटते. तो पावसाच्या आगमनाची सूचना देतो, अशी शेतकऱ्यांची भावना असल्यामुळे त्याला पावशा हे नाव पडले असावे.

मार्च–जुलै हा पावशाचा विणीचा हंगाम असतो. कोकिळेप्रमाणे हा पक्षी अंडपरजीवी आहे. पावशाची मादी सातभाई पक्ष्याची नजर चुकवून त्याच्या घरट्यात आपली अंडी घालते. एका घरट्यात ती बहुधा एकच अंडे घालते. आश्रयी सातभाई पक्ष्याच्या निळ्या अंड्यासारखीच पावशाची अंडी असतात. सातभाई पक्षी ती अंडी स्वत:चीच आहेत असे समजून त्यांच्यावर बसून ती उबवितो. त्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांचेही ते पोषण करतात. पिले मोठी झाली की ती उडून जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा