अल्ब्युमीन श्वेतक हा एक चिकट, पाण्यात विरघळणारा व जिलेटीनसारखा पदार्थ आहे. अन्नघटकातील प्रथिनांचा हा एक प्रकार आहे. अंड्यात, दुधात व रक्तात अल्ब्युमीन असते. अंड्यातील पांढरा भाग म्हणजे अल्ब्युमीन होय. दुधातील अल्ब्युमीनला लॅक्टॅल्ब्युमीन म्हणतात, तर रक्तातील अल्ब्युमीनला सेरम अल्ब्युमीन म्हणतात. रक्तातील निम्मी प्रथिने अल्ब्युमीनच्या स्वरूपात असतात. रक्त आणि इतर ऊतींमधील पाण्याची पातळी यांचा समतोल राखणे हे अल्ब्युमीनचे एक मुख्य कार्य आहे. तसेच अविद्राव्य पदार्थदेखील अल्ब्युमीनला चिकटून वाहून नेले जातात.
सर्व अल्ब्युमीनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधक हे मूळ घटक असतात. उष्णता दिल्यास अल्ब्युमीन घट्ट होते. द्रवाबरोबर तापविल्यास ते तळाशी बसते किंवा गुठळीच्या रूपात द्रवावर तरंगते. मुत्रात अल्ब्युमीन आढळणे हे मुत्रपिंड बिघडल्याचे लक्षण मानले जाते.
साखरेच्या शुद्धीकरणासाठी औद्योगिक क्षेत्रात, रंगकामात आणि छायाचित्रणाच्या रसायनांत अल्ब्युमीनचा वापर केला जातो.