अफू ही पॅपॅव्हरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. या वनस्पतीपासून अफू हा एक मादक विषारी पदार्थ मिळतो. तो अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून मिळवितात. चिरा पाडल्यावर फळातून रस पाझरतो; वाळून घट्ट झालेला रस म्हणजे अफू. मादक पदार्थ म्हणून अफूची लागवड प्राचीन काळापासून होत आली आहे. अफूचे झुडूप मूळचे पश्चिम आशियातील असून अरबांकडून ते पूर्वेस चीनपर्यंत पसरले. तुर्कमेनिस्तान, इराण, रशिया, चीन, म्यानमार, थायलंड, लाओस आणि भारत या देशांत अफूचे उत्पादन होते. भारतात अफूची लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांपुरती मर्यादित केली आहे.
अफू हे ६० ते १२० सेंमी. उंची असणारे वर्षायू झुडूप आहे. याची पाने साधी, कमी-जास्त करवती काठाची, तळाशी खोडास वेढून राहणारी असतात. फुले देखणी, मोठी, पांढरी किंवा लालसर जांभळी असतात. फळांची बोंडे मोठी, मऊ व गोलाकार असतात. बिया लहान, पांढर्या व विपुल असून त्यांनाच ‘खसखस’ म्हणतात.
अफू हा पदार्थ वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त असलेल्या अल्कलॉइडांसाठी प्रसिद्ध आहे. फळांपासून मिळणारी अफू चवीला कडू, स्तंभक, मादक, वेदनाहारक असून ती बद्धकोष्ठता निर्माण करते. जुलाब आणि हगवणीमुळे होणार्या विकारांवर ती उपयुक्त ठरते. तिच्या बिया पौष्टिक असतात. खसखशीपासून तेल काढतात. खाद्यपदार्थांमध्ये खसखस वापरतात. अफूचा मादकपणा खसखशीमध्ये नसतो. खसखशीचे तेल खाण्यासाठी आणि विशेषकरून चित्रकारांचे रंग व साबण तयार करण्यासाठी वापरतात.
अफूपासून मॉर्फीन, कोडीन, नार्कोटीन, पॅपॅव्हरीन, थेबाइन वगैरे अल्कलॉइडे व त्यांची संयुगे प्राप्त होतात. प्रामुख्याने, ही रसायने वेदनाशामक आहेत. मात्र हल्ली त्यांचा मादक पदार्थ म्हणून जास्त उपयोग होतो.
नशेसाठी अफूचे सेवन प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तिच्यामधील अल्कलॉइडे सेवन करून, धुरावाटे किंवा तिचा अर्क शरीरात टोचून वापरली जातात. नशेसाठी अफू सेवन केलेल्या व्यक्तीला पुनःपुन्हा सेवनाची इच्छा होऊन ती व्यक्ती व्यसनात कायमची गुरफटली जाते. जगातील बहुसंख्य राष्ट्रांत अफूचे सेवन व निर्मिती बेकायदा ठरविलेली आहे. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफूचे शुद्धीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी सर्व बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात. भारत हा जगातील एकमेव मान्यता प्राप्त अफू निर्माण करणारा देश आहे.