रावस माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मीस गणाच्या पॉलिनीमिडी कुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एल्युथेरोनीमा टेट्राडॅक्टिलस आहे. भारतात तो पूर्व किनाऱ्यावर ओडिशा व पश्‍चिम बंगाल या राज्यांत, तर पश्‍चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत आढळतो. हुगळी नदीच्या मुखातही तो आढळून येतो.

रावस (एल्युथेरोनीमा टेट्राडॅक्टिलस)

रावस माशाची लांबी साधारणपणे १·८ मी. असून शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असते. शरीराचा रंग रुपेरी हिरवट असून पोट व दोन्ही बाजू पिवळसर पांढऱ्या रंगाच्या असतात. तोंड आकाराने मोठे असून दात लहान व थोडेसे ओठाबाहेर आलेले असतात. पृष्ठपर व पुच्छपर करडे असून त्यांवर काळे ठिपके असतात आणि त्यांच्या कडा काळ्या असतात. अधरपराचा व गुदपराचा अर्धा भाग नारिंगी असतो. अधरपराच्या पुढच्या बाजूस चार तंतुपर असतात. रावस मासा ओळखण्याची ही एक खूण आहे. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

रावस मासा समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ भागातील चिखलात आढळतो. तो मांसाहारी असून खेकडे, झिंगे व अस्थिमत्स्य माशांची पिले खातो. हिवाळ्यात प्रौढ रावस नद्यांच्या प्रवाहात तसेच खाडीमध्ये भरतीच्या खुणेपर्यंत जातात. तेथे नर आणि मादी यांचे मीलन होते. माद्या वर्षातून दोन वेळा म्हणजेच जानेवारी-मार्च आणि जुलै-सप्टेंबर या काळात अंडी घालतात. सप्टेंबर-नोव्हेंबर या काळात पश्‍चिम किनाऱ्यावर रावस पकडण्याचा हंगाम जोरात चालतो. पूर्व किनाऱ्यावर हा हंगाम फेब्रुवारी-मे असा असतो. रावस उत्तम खाद्यमत्स्य आहे. तो ताजा, तसेच उन्हात वाळवून किंवा खारवूनही खातात. या माशामध्ये ओमेगा-३ हे मेदाम्ल असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा