(ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टिम). मनुष्य आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये सामान्यपणे श्वसन मार्ग म्हणजेच श्वसन संस्था असते. शरीरात शिरलेला हवेतील ऑक्सिजन वायू ग्रहण करणे आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर टाकणे, हे श्वसन संस्थेचे मुख्य कार्य असते.

मानवी फुप्फुसे

रचना : श्वसनमार्गाचे वरचा आणि खालचा असे दोन भाग केले जातात. श्वसनमार्गाच्या वरच्या भागात नाक, नाकपुड्या, घसा, नाकाचा आतील भाग आणि स्वरयंत्र असते. शरीरात येथूनच हवा प्रवेश करते. नाकाच्या मध्यभागी कास्थींपासून बनलेला एक उभा पडदा असतो आणि त्यामुळे नाकामध्ये दोन पोकळ्या म्हणजेच नाकपुड्या तयार झालेल्या असतात. नाकाच्या पोकळ भागात विपुल रक्तपुरवठा असलेले श्लेष्मल पटल असते. तसेच प्रत्येक नाकपुडीमध्ये तीन नासा शंखास्थी असून त्यांची वाढ नाकाच्या आतल्या दिशेने झालेली असते. त्यामुळे साधारणपणे १६० चौ.सेंमी. एवढा पृष्ठभाग उपलब्ध होतो. या पृष्ठभागावरून वाहणारी हवा उष्ण व दमट असते. नाकपुडीतील केस आणि नाकातील उंचसखल भाग यांच्यात हवेतील मोठे कण अडकत असल्याने सु. १० मायक्रॉनपेक्षा (१ मायक्रॉन = १/१०,००,००० मी.) लहान कणच श्वसनमार्गात प्रवेश करू शकतात. नाकातील केसांच्या सततच्या हालचालींमुळे हवेतील मोठे धुलिकण, तंतू इ. सुरुवातीला रोखले जातात, तर काही बारीक कण घशातून अन्ननलिकेकडे ढकलले जातात. अशा हालचालींमुळे स्वरयंत्रापासून खालच्या श्वसनमार्गात अडकलेले कण (३–१० मायक्रॉन आकाराचे कण) वर ढकलले जातात किंवा खोकून बाहेर फेकले जातात. श्लेष्मामध्ये अडकलेले सर्व कण श्वसनमार्गातून दूर होण्यासाठी गिळणे, थुंकणे किंवा शिंकणे या क्रिया घडून येतात.

फुप्फुस : श्वसनक्रियेत फुप्फुस हे वायूंच्या देवाणघेवाणीचे कार्य करते. श्वसनमार्गाच्या खालच्या भागातील हवा ही नेहमीच स्वच्छ, शरीराच्या तापमानाएवढी उष्ण आणि बाष्पयुक्त असते. अन्न खाताना जेव्हा आपण घास गिळतो तेव्हा श्वसनमार्ग वर ओढला जाऊन स्वरयंत्राच्या वरच्या तोंडाला असलेली मांसल झडप (कंठच्छद) बंद होते. त्यामुळेच श्वसनमार्गात अन्नपदार्थ किंवा द्रव शिरत नाही. खालच्या श्वसनमार्गाला ‘श्वसनमार्गाचा वृक्ष’ असेही म्हणतात. स्वरयंत्राच्या खालच्या टोकापासून श्वासनलिका सुरू होऊन तिचा शेवट डाव्या आणि उजव्या फुप्फुसाकडे जाणाऱ्या दोन श्वसनींमध्ये होतो. डावे फुप्फुस उजव्या फुप्फुसापेक्षा आकाराने लहान असते; ते दोन खंडांचे असून त्यातील श्वसनी दोनदा विभागलेली असते. उजवे फुप्फुस तीन खंडांत विभागले असल्याने त्यातील श्वसनी तीनदा विभागलेली असते. श्वासनलिका पुढे प्रत्येक खंडात साधारणपणे २० ते २५ वेळा विभागलेली असते. अशा प्रकारे श्वसनमार्गाचा वृक्ष बनतो. उजव्या तसेच डाव्या फुप्फुसात शिरणाऱ्या श्वासनलिकांचा व्यास साधारणपणे १–५ सेंमी. असतो, तर सर्वांत लहान शाखा सु. ०.५–१.० मिमी. व्यासाच्या असतात. श्वासनलिकेच्या टोकाकडील शाखेला श्वसनिका म्हणतात; तिच्या टोकाला द्राक्षाच्या घडांसारखे दहाबारा वायुकोश असतात. वायुकोशांभोवती असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामुळे वायुकोशाच्या हवेतील घटक आणि रक्तातील वायू यांची देवाणघेवाण होते. श्वसनमार्गाच्या आकारात कोणताही बदल होऊ नये म्हणून वायुकोशांमध्ये लवचिक कास्थिमय वर्तुळाकार कड्या असतात. तसेच श्वासनलिकेचे आकुंचन-विस्फारण होण्यासाठी त्यांच्या संरचनेत अरेखित स्नायू, केसल अधिस्तराचे अस्तर आणि श्लेष्मल ग्रंथी यांचा समावेश आढळतो. ०.५ ते १ मायक्रॉन आकाराचे कण वगळता, बाकी सर्व कण श्लेष्मल ग्रंथीच्या स्रावात अडकतात आणि केसांच्या हालचालींमुळे श्वासनलिकेतून वर ढकलले जाऊन खोकल्यावाटे बाहेर टाकले जातात.

फुप्फुसांच्या बाहेरचा पृष्ठभाग आणि छातीचा पिंजरा : श्वासनलिकेपुढच्या सर्व संरचना एकत्रित असून त्यांभोवती उदरच्छद पटलाचे आवरण असते. हेच आवरण संपूर्ण फुप्फुसाला आच्छादून छातीच्या पिंजऱ्याच्या आत आलेले असते. हे पटल दुहेरी असून या पटलांच्या दरम्यान उदरच्छदी द्रव असतो. त्यामुळे फुप्फुसाची हालचाल सुलभतेने होते.

श्वसन : मध्यपटलाची क्रिया.

पुढच्या बाजूला उरोस्थी, बरगड्या आणि मागे पाठीच्या कण्यातील मणके व त्यांतील कास्थी यांपासून छातीचा पिंजरा बनलेला असतो. छातीच्या पिंजऱ्यात एकूण २४ बरगड्या, १२ जोड्यांच्या स्वरूपात असतात. प्रत्येक बरगडीचा सर्वांत पुढचा भाग कास्थीचा असल्याने छातीचा पिंजरा लवचिक व स्थितिस्थापक बनलेला असतो. छातीच्या पिंजऱ्याच्या पहिल्या सात बरगड्या उरोस्थीला जुळलेल्या असतात; आठ ते दहा क्रमांकाच्या बरगड्या उरोस्थीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यांची टोके अनुक्रमे सात ते नऊ क्रमांकाच्या म्हणजेच प्रत्येक टोक बरगडीला येऊन मिळते. शेवटच्या दोन बरगड्या आखूड असल्याने त्यांची टोके मोकळीच असतात.

छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी छाती व उदर यांना वेगळे करणारे मध्यपटल असते. श्वास बाहेर टाकलेल्या स्थितीत मध्यपटल घुमटासारखे दिसते. त्याचे आकुंचन होऊ लागल्यावर घुमटाचा आकार हळूहळू सपाट होऊन छातीच्या पोकळीची उंची वाढू लागते आणि फुप्फुसांमध्ये हवा भरू लागते. फुप्फुसांचा तळ खाली ओढला गेला म्हणजेच अंत:श्वसन पूर्ण झाले की पटलांचे आकुंचन थांबते. ते थांबताच छातीच्या पिंजऱ्याची आणि फुप्फुसांची स्थितिस्थापकता तसेच उदरातील इंद्रियांचा दाब यामुळे मध्यपटल वर ढकलले जाऊन फुप्फुसे हवा बाहेर टाकतात.

श्वसनमिती : श्वसनक्रियेत फुप्फुसांचे प्रसरण आणि आकुंचन होत असते, ज्याद्वारे फुप्फुसात हवा आत घेतली जाते. विश्रांत अवस्थेत दर मिनिटाला १५ वेळा ही क्रिया घडून येते. श्वसन संथपणे चालू असताना दर श्वासाबाहेर आतबाहेर होणाऱ्या हवेचे आकारमान प्रौढ व्यक्तीमध्ये सु. ५०० मिलि. असते. जोराने उच्छ्‌वास केल्यास किंवा जोराने श्वास आत घेतल्यास शरीरात आतबाहेर होणाऱ्या हवेचे आकारमान ‘श्वसनमिती (स्पिरोमेट्री)’ यंत्राने मोजतात. सामान्यपणे प्रौढ व्यक्तीच्या फुप्फुसात वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या हवेच्या आकारमानांसंबंधीची माहिती पुढे दिलेली आहे :

(१) वेलीय आकारमान (टायडल व्हाल्युम; टीव्ही) : विश्रांत स्थितीत फुप्फुसाच्या आतबाहेर होणाऱ्या हवेचे आकारमान (सु. ५०० मिलि.) (२) अंत:श्वसन राखीव आकारमान (रेस्पिरेटरी रिझर्व्ह व्हाल्युम; आयआरव्ही) : नेहमीच्या अंत:श्वसनानंतर विशेष प्रयत्न करून शरीरात घेतलेली हवा. तिचे आकारमान सु. ३,००० मिलि. असते. (३) बहि:श्वसन राखीव आकारमान (एक्स्पिरेटरी रिझर्व्ह व्हाल्युम; इआरव्ही) : नेहमीच्या उच्छ्‌वासानंतर विशेष प्रयत्न करून शरीराबाहेर टाकलेली हवा (सु. १,१०० मिलि.) (४) शेष आकारमान (रेसिड्युअल व्हाल्युम; आरव्ही) : प्रयत्नपूर्वक बहि:श्वसनानंतर शरीरात राहिलेली हवा (सु. १,०००–१,५०० मिलि.) (५) अंत:श्वसन क्षमता (इन्स्पिरेटरी व्हाल्युम; आयसी) : विश्रांत अवस्थेनंतर विशेष प्रयत्न करून शरीरात घेतलेल्या हवेचे एकूण आकारमान (सु. ३,५०० मिलि.) (६) कार्यात्मक शेष क्षमता (फंक्शनल रेसिड्यूअल कॅपॅसिटी; एफआरसी = इआरव्ही + आरव्ही) : नेहमीच्या किंवा सामान्य उच्छ्‌वासानंतर फुप्फुसात असलेली हवा (सु. २,१०० मिलि.) (७) जीवनावश्यक क्षमता (व्हायटल कॅपॅसिटी; व्हीसी = आयआरव्ही + टीव्ही + इआरव्ही) : कमाल अंत:श्वसनानंतर प्रयत्नपूर्वक शरीराबाहेर टाकलेल्या हवेचे कमाल बहि:श्वसन (३,००० मिलि. + ५०० मिलि. + १,१०० मिलि. = ४,६०० मिलि.). (८) फुप्फुसाची एकूण क्षमता (टोटल लंग कॅपॅसिटी; टीएलसी) : फुप्फुसांच्या विस्ताराची कमाल मर्यादा (सु. ६,००० मिलि.)

आपण कितीही जोर लावून हवा बाहेर टाकली तरी फुप्फुसांतील सर्वच हवा बाहेर पडत नाही; फुप्फुसात कोणत्याही क्षणी साधारणपणे १–१.५ लि. हवा (शेष आकारमान) असतेच, जी श्वसनमिती यंत्राने मोजली जात नाही. म्हणूनच ज्यात शेष आकारमान समाविष्ट असते (जसे कार्यात्मक शेष आकारमान (सु. २,५००–३,००० मिलि.) आणि फुप्फुसाचे एकूण आकारमान (सु. ६,००० मिलि.) ते आकारमान श्वसनमिती तंत्राने मोजता येत नाही.

श्वसनमार्गात शिरलेल्या हवेत ऑक्सिजन (२०%), कार्बन डायऑक्साइड (०.०४%), नायट्रोजन (७८%) आणि बाष्प (०.५%) इ. घटक असतात. हवेतील हे वायू सर्वच दिशांना पसरत असून त्यांच्या संहतीच्या प्रमाणानुसार दाब निर्माण करीत असतात. कोणत्याही ठिकाणी मोजलेला एकूण दाब सर्व घटक वायूंच्या दाबाच्या बेरजेइतका असतो. या गुणधर्मामुळे हवेतील प्रत्येक घटकाचे प्रमाण सांगण्यासाठी त्यांच्या दाबाचा उल्लेख करतात. समुद्रसपाटीला वातावरणाचा एकूण दाब पाऱ्याच्या ७६० मिमी. उंचीइतका असल्यामुळे हवेतील वायूंचा दाब ऑक्सिजन (१५८.३ मिमी.), कार्बन डायऑक्साइड (०.३ मिमी.), नायट्रोजन (५९७.५ मिमी.), बाष्प (३.८ मिमी.) असा लिहितात.

श्वसन संस्थेचे मुख्य कार्य वायुकोशाच्या हवेतील घटकांचा आंशिक दाब आणि फुप्फुसाच्या रक्तवाहिन्यातील रक्त यांच्यात समतोल राखणे, हे असते. ही प्रक्रिया विसरणाने घडते; फुप्फुसातील वायुकोशाच्या भित्तिका ज्या पटलाने बनलेल्या असतात, तेथे ही प्रक्रिया घडते. हे पटल फक्त दोन-तीन पेशींच्या थरांचे आणि त्यांच्यातील आंतरपेशीय पदार्थाचे असून त्याची सरासरी जाडी २.२ मायक्रोमीटर असते. ते घड्याघड्यांनी बनलेले असून त्यात सु. ३० कोटी सूक्ष्म पिशव्या म्हणजेच वायुकोश असतात. फुप्फुसातील श्वसनिकेपासून वायुकोश उद्भवलेले असून त्यांची सरासरी व्याप्ती सु. १४५ चौ. मी. असते.

श्वसनमार्गात हवा आत शिरल्यावर तिचा ओलसरपणा वाढल्याने दाबात फरक होऊन हवा वायुकोशाकडे पोहोचते. या हवेत ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे प्रमाण कमी असते. प्रत्येक उच्छ्‌वासाबरोबर श्वसनमार्गातील हवा वायुकोशांपासून वर येणाऱ्या हवेत मिसळत असल्याने हवा आत खाली शिरते तसे तिच्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत जाते. वायुकोशातील हवेत नायट्रोजन आणि बाष्प यांचे प्रमाण सारखे असले, तरी ऑक्सिजनचे प्रमाण १०४ मिमी. व कार्बन डायऑक्साइड ४० मिमी. एवढे आढळते. याच हवेची रक्तातील वायूंबरोबर देवाणघेवाण होते.

केशवाहिन्यांतील रक्तामध्ये वायुकोशाच्या तुलनेत ऑक्सिजन कमी (४० मिमी.) आणि कार्बन डायऑक्साइड अधिक (४५ मिमी.) असतो. साहजिकच ऑक्सिजनचा प्रवास रक्ताकडे (१०४→४०) आणि कार्बन डायऑक्साइडचा प्रवास त्याच्या उलट वायुकोशांच्या दिशेने (४५→४०) होतो. केशवाहिन्यांतील रक्त फुप्फुसांत पोहोचेपर्यंत ही देवाणघेवाण पूर्ण होऊन रक्तामध्ये ऑक्सिजन १०४ मिमी. व कार्बन डायऑक्साइड ४० मिमी. अशी स्थिती होते. असे रक्त हृदयात येते तेव्हा डाव्या अलिंदात श्वसनाच्या शिरांवाटे आलेले रक्त मिसळते. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण ९५ मिमी. पर्यंत खाली येऊ शकते. अशा प्रकारे (डाव्या निलयात आणि तेथून महाधमनीच्या शाखांमार्गे) शरीरात पसरणाऱ्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण ९५ मिमी. व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ४० मिमी. असते.

शरीरातील सर्व ऊतींमधील चयापचय प्रक्रिया आणि पेशींतील श्वसनक्रियेमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी, तर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते. यामुळे ऊतींलगत असलेल्या केशवाहिन्यांतील रक्त आणि ऊतीजल (टिश्यू फ्लुइड) यांच्यात या वायूंची देवाणघेवाण होते. ऑक्सिजन ऊतींच्या दिशेने आणि कार्बन डायऑक्साइड रक्ताकडे, असे हे वहन होते. या देवाणघेवाणीमुळे ऊतींमधून बाहेर येणाऱ्या शिरांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण ४० मिमी., तर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ४५ मिमी. असते. असे रक्त (त्याला अशुद्ध रक्त, अल्पऑक्सिजनयुक्त रक्त असेही म्हणतात) फुप्फुसांकडे हृदयातील उजवे अलिंद व निलयामार्गे येते आणि वायूंची देवाणघेवाण चालू राहते.

रक्तातील वायूचे अभिसरण : ऑक्सिजनच्या अभिसरणासाठी तांबड्या पेशींतील हीमोग्लोबिन उपयोगी पडतो. ऑक्सिजन पाण्यात खूप कमी प्रमाणात विरघळतो आणि हीमोग्लोबिनच्या संपर्कात येणारा ऑक्सिजन सैल बंधांनी जोडलेला असतो. हीमोग्लोबिनच्या प्रत्येक रेणूला ऑक्सिजनचे चार रेणू (म्हणजेच आठ अणू) जोडले जाऊ शकतात. हीमोग्लोबिनमधील आयर्नाच्या (लोहाच्या) प्रत्येक अणूशी ऑक्सिजन रेणूस्वरूपातच जोडला जात असल्याने हे बंध आणि ऑक्सिजन सुटा होण्याची क्रिया सहजपणे घडतात. विश्रांत अवस्थेत हीमोग्लोबिनची ऑक्सिजन पकडून ठेवण्याची क्षमता व मोकळा होण्याची क्रिया सुलभता इ. बाबींची गरज भासत नाही. त्यामुळे ऑक्सिजन अभिसरणात खूप राखीव क्षमता उपलब्ध असते. व्यायाम, वाढलेले तापमान, कार्बन डायऑक्साइडचे वाढलेले प्रमाण तसेच रक्तातील आम्लता अशा प्रसंगी ही राखीव क्षमता वापरली जाते. हीमोग्लोबिनबरोबर जेथे ऑक्सिजन जोडला जातो, तेथेच कार्बन मोनॉक्साइड वायू सु. २५० पट आसक्तीने जोडला जाऊ शकतो. हवेत कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण ०.१% इतके असताना असा विषारी परिणाम घडू शकतो. शुद्ध ऑक्सिजन त्वरित पुरविल्यास कार्बन मोनॉक्साइडचे हे बंध तोडता येतात.

कार्बन डायऑक्साइडच्या अभिसरणात त्याचा काही भाग (सु. ७%) रक्तामध्ये विरघळलेल्या स्वरूपात ऊतींकडून फुप्फुसांकडे जातो, तर उरलेला बहुतांशी भाग (सु. ७०%) रक्तातील तांबड्या पेशींमध्ये प्रवेश करतो. तांबड्या पेशीतील पाण्याबरोबर अभिक्रिया झाल्यामुळे कार्बन डायऑक्साइडपासून कार्बोनिक आम्ल बनते आणि त्याचे विघटन होऊन हायड्रोजन आयन व बायकार्बोनेट आयन तयार होतात. ही प्रक्रिया तांबड्या पेशीतील कार्बोनिक ॲनहायड्रेज या विकरामुळे घडते. त्यांपैकी बायकार्बोनेट आयन तांबड्या पेशीमधून बाहेर पडून रक्तद्रवात येतात, तर हायड्रोजन आयन केशवाहिन्यांतील हीमोग्लोबिनला मिळतात. पेशीमध्ये प्रवेश करणाऱ्या वायूचा काही भाग (सु. २०%) थेट हीमोग्लोबिनला रासायनिक अभिक्रियेने जोडला जातो तेव्हा कार्बमायनोहीमोग्लोबिन बनते. बहुतांशी कार्बन डायऑक्साइड अभिसरणाचे कार्य बायकार्बोनेट आयनांद्वारे घडून येत असते. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड या वायूंच्या संहतीचा एकमेकांच्या देवाणघेवाणीवर अनुकूल असाच परिणाम होत असतो.

श्वसनक्रियेचे नियंत्रण : मनुष्यातील आणि सस्तन प्राण्यांमधील श्वसनक्रियेचे नियंत्रण चेतासंस्थेत असलेल्या मस्तिष्क पुच्छातील श्वसनकेंद्र आणि मस्तिष्कस्तंभातील सेतू यांच्यामार्फत घडून येत असते. या क्षेत्रात अनेक चेतामार्ग असतात, ज्यांना धमन्यांमधील रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या आंशिक दाबाची माहिती मिळत असते. या माहितीनुसार समस्थिती स्थिर राखण्यासाठी फुप्फुसातील ऑक्सिजन–कार्बन-डाय ऑक्साइड (O2–CO2)देवाणघेवाणीचा दर निश्चित होतो. श्वसनकेंद्र ही क्रिया प्रेरक चेतांद्वारे घडवून आणते, ज्याद्वारे मध्यपटल आणि श्वसनक्रियेतील इतर स्नायूंच्या हालचाली घडून येतात.

रक्तातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले असता श्वसनक्रियेचा दर वाढतो. मस्तिष्क पुच्छात असलेल्या मध्यवर्ती रसायनग्राहींद्वारे हे समजून येते, तसेच महाधमनी पिंड आणि करोटीय पिंड या भागात रसायनग्राही असतात. ती रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणातील बदलाला संवेदी असतात.

समुद्रसपाटीला, सामान्य स्थितीत, श्वसनक्रियेचा दर मुख्यत: धमन्यातील कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणावर अवलंबून असतो. व्यायामामुळे हालचाल करणाऱ्या स्नायूंमध्ये चयापचय वाढल्याने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर अवयवांच्या किरकोळ हालचालींमुळे श्वसनक्रियेचा दर वाढतो.

श्वसन संस्थेचे विकार : शरीराबाहेरील वातावरणाशी श्वसन संस्थेचा सतत आणि थेट संपर्क येत असतो. हवेच्या तापमानातील चढ-उतार, सूक्ष्मजीव, धूळ, उद्योगांच्या स्वरूपानुसार परिसरात असलेल्या रसायनांच्या वाफा, प्रदूषके, विविध प्रकारची अधिहर्षताकारके इत्यादींमुळे श्वसन संस्थेचे लहानमोठे विकार संभवतात. परंतु त्यांची लक्षणे जवळपास सारखीच असतात. खोकला, कफाची निर्मिती, विश्रांत अवस्थेत धाप लागणे, श्रम केल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना घशात किंवा छातीत घरघर आवाज येणे, श्वासाच्या हालचालीत सहज लक्षात येतील अशी लक्षणे जाणवणे इ. लक्षणे दिसल्यास श्वसन संस्थेचा विकार असल्याचे जाणवते. पुढे श्वसन संस्थेचे काही विकार दिलेले आहेत –

(अ) दमा : या विकाराला अधिहर्षता (ॲलर्जी), आनुवंशिकता, सूक्ष्मजीव संक्रामण इ. गोष्टी कारणीभूत असतात. यामुळे श्वसनमार्गाचे आकुंचन होते आणि दाट श्लेष्म तयार होतो.

(ब) श्वासनलिकाविस्फार : या विकारात सूक्ष्मजीव संक्रामण किंवा हवेतील क्षोभकारक पदार्थांमुळे श्वसनमार्गाच्या खालच्या मार्गात दाह निर्माण होतो. त्यामुळे श्वसनमार्गातील भित्तिका कठीण बनतात.

(क) दीर्घकालीन अवरोधी फुप्फुसरोग : या विकारात काही रुग्णांमध्ये श्वासनलिकेच्या ऊती कमजोर होऊन जागोजागी विस्फारतात. हा दीर्घकालीन आजार असून हळूहळू बळावत जातो.

(ड) फुप्फुसदाह : हा प्रामुख्याने वायुकोशांचा संसर्गजन्य विकार आहे. यात फुप्फुसाच्या एखाद्या खंडातील सर्व वायुकोश द्रवाने किंवा पुवाने भरले जातात. त्यामुळे वायुकोश वायूंची देवाणघेवाण नीट करू शकत नाहीत.

(इ) क्षयरोग : जीवाणूंच्या संसर्गामुळे उद्भवणारा एक धोकादायक रोग. या रोगामुळे फुप्फुसे बाधित होतात. तसेच वृक्के, पाठीचा कणा किंवा मेंदू इ. भाग बाधित होऊ शकतात.

(ई) फुप्फुसांचा कर्करोग : या विकारात फुप्फुसाच्या पेशींमध्ये बदल होतात आणि त्यांच्या गाठी बनतात. बहुधा धूम्रपानामुळे किंवा इतर कर्करोगजन्य रसायनांच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्याने हा विकार उद्भवतो.

(उ) फुटी तंतूभवन : हा आनुवंशिक आजार असून वाढत्या वयानुसार बळावतो. या विकारात श्लेष्म, घाम किंवा पाचकरस निर्मिती करणाऱ्या पेशींमध्ये बिघाड उद्भवतो. अशा रुग्णांमध्ये स्रवलेले श्लेष्म चिकट आणि दाट असते. त्यामुळे अन्ननलिका व श्वासनलिका यांचे मार्ग तुंबले जातात.

(ऊ) अज्ञातहेतुक फुप्फुसीय तंतूभवन : हा फुप्फुसाचा एक गंभीर आजार असून फुप्फुसांत व्रण ऊतींची वाढ होऊ लागते. त्यामुळे श्वास घेणे कठीण होते.

(ए) सारकॉइड विकार : या विकारात प्रतिक्षम करणाऱ्या पेशी एकत्र जमा होतात आणि त्यांच्या गुठळ्या बनतात. त्यामुळे छातीत घरघर आवाज ऐकू येतो, खोकला तसेच श्वास घेताना त्रास होणे इ. लक्षणे दिसतात.