शरीरावरील रोग तसेच अन्य घातक आक्रमणे यांच्यापासून शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशी, ऊती आणि रेणू यांच्या समूहाला ‘प्रतिक्षम संस्था’ किंवा ‘रोगप्रतिकारशक्ती’ म्हणतात. प्रतिक्षम संस्था शरीरावर आक्रमण करणारे जीवाणू, कवके, परजीवी आणि विषाणू यांपासून शरीराचे संरक्षण करते. शरीरातील निरोगी ऊतींची हानी होऊ न देता रोगकारकांचा नाश करणे, हे प्रतिक्षम संस्थेचे कार्य असते.

सर्व रोगांपासून शरीराचा बचाव एकट्याने करणे प्रतिक्षम संस्थेला शक्य नसल्यामुळे काही विशिष्ट व जीवघेण्या संक्रामणांपासून बचाव करण्यासाठी व्यक्तीला लस टोचतात किंवा रक्तरस अंत:क्षेपित करतात. या क्रियेला ‘प्रतिक्षमन’ म्हणतात. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे विषाणू, जीवाणू यांना प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता वाढते.

रोगकारक घटक किंवा विष शरीरात शिरते, तेव्हा प्रतिक्षम संस्था या संक्रामणांशी विशिष्ट क्रमाने आणि टप्प्याटप्प्याने लढा देते. याला ‘प्रतिक्षम प्रतिसाद’ म्हणतात. ज्या रोगकारक, हानीकारक घटकांमुळे प्रतिक्षम प्रतिसाद सुरू होतो, त्यांना ‘प्रतिजन’ म्हणतात. प्रतिक्षमन क्रियेत मुख्यत: शरीरातील लसीका पेशी आणि प्रतिजन-दर्शक पेशी अर्थात सहायक पेशी सहभागी होतात.

लसीका पेशी : पांढऱ्या पेशींचा हा एक प्रकार असून अन्य पांढऱ्या पेशींप्रमाणे अस्थिमज्जेत त्या उत्पन्न होतात. त्यांपैकी काही लसीका पेशी अस्थिमज्जेत पक्व होतात. त्यांना ‘बी-लसीका पेशी’ किंवा ‘बी-पेशी’ म्हणतात. अस्थिमज्जेपासून मिळालेल्या पेशी दर्शविण्यासाठी ‘बोन’ या इंग्रजी भाषेतील बी शब्दाचा वापर केलेला आहे. काही बी-पेशी रक्तद्रवातील पेशींमध्ये पक्व होतात आणि प्रतिद्रव्ये तयार करतात. प्रतिद्रव्ये ही प्रथिने असून ती प्रतिजनांवर हल्ला करतात. ती रक्त, अश्रू, नाक व आतडे यांतून स्रवणाऱ्या स्रावातून शरीरभर वाहून नेली जातात.

काही लसीका पेशी रक्तप्रवाहातून थेट छातीच्या भागातील थायमस ग्रंथीमध्ये येतात आणि पक्व होतात. त्यांना ‘टी-पेशी’ (थायमसपासून मिळालेल्या पेशी) म्हणतात. शरीरातील काही ऊतींमध्ये मोठ्या प्रमाणात लसीका पेशी साठलेल्या असतात; त्यांना लसिकाभ इंद्रिये म्हणतात. अस्थिमज्जा व थायमस यांना प्राथमिक लसिकाभ इंद्रिये म्हणतात, कारण त्यांच्यात लसीका ग्रंथी पक्व होतात. प्लीहा, गिलायू व लसीका ग्रंथिका येथे लसीका पेशी साठविल्या जातात, त्यांना द्वितीय लसिकाभ इंद्रिये म्हणतात. लसीका ग्रंथिका लहान व घेवड्याच्या बीच्या आकाराच्या असतात. त्या मान, काख या भागांत गुच्छाने असून लसीका संस्थेत शिरलेले हानीकारक पदार्थ व जीवाणू गाळून वेगळे करतात. म्हणून संक्रामणाविरुद्ध लढत असताना लसिका ग्रंथिका सुजू शकतात व दुखू लागतात.

प्रतिजन-दर्शक पेशी (सहायक पेशी) : सहायक पेशींमध्ये बी-पेशी, वृक्षिका पेशी व बृहत्‌भक्षी पेशी यांचा समावेश होतो. वृक्षिका पेशी आणि बृहत्‌भक्षी पेशी शरीरात सर्वत्र असतात. मात्र वृक्षिका पेशी लसीका ग्रंथीत जास्त प्रमाणात असून आणि त्यांवर भूजांसारखी प्रवर्धक (अंगके) असतात. सहायक पेशी शरीरात बाहेरून शिरलेल्या पदार्थांना वेढतात आणि त्यांचे पचन करून नाश करतात. याला भक्षकपेशीक्रिया म्हणतात. यात शरीरबाह्य पदार्थाचे लहानलहान तुकडे करून ते नष्ट केले जातात. सहायक पेशी हे प्रतिजनयुक्त तुकडे लगतच्या टी-पेशींच्या संपर्कात येतात. त्यावेळी हे तुकडे सहायक पेशींच्या पृष्ठभागावर येतात. तेथे टी-पेशी या तुकड्यांच्या संपर्कात येऊन प्रतिक्षम प्रतिसाद निर्माण होतो.

अन्य पांढऱ्या पेशी : इओसीनरागी पेशी, एककेंद्रक पेशी आणि उदासीनरागी पेशी या पांढऱ्या पेशीही संक्रामणाचा प्रतिकार करतात आणि भक्षकपेशींप्रमाणेच कार्य करतात. इओसीनरागी पेशी परजीवींचा नाश करतात आणि अधिहर्षता उद्भवल्यास क्रियाशील होतात.

प्रतिक्षम प्रतिसादाची दोन स्वरूपे असतात; (१) देहद्रवी प्रतिक्षमता (शरीरातील द्रवामार्फत घडून आलेला प्रतिक्षम प्रतिसाद) आणि (२) पेशीय प्रतिक्षमता (पेशींमार्फत घडून आलेला प्रतिक्षम प्रतिसाद).

(१) देहद्रवी प्रतिक्षमता : यात शरीरातील पेशीबाह्य द्रवात असलेले बृहत्‌रेणू (इम्युनोग्लोब्युलिने), परिपूरक प्रथिने, विशिष्ट प्रतिजैविक पेप्टाइडे इत्यादी प्रतिद्रव्ये प्रतिजनांचा नाश करतात. ही प्रतिद्रव्ये बी-लसीका पेशी आणि रक्तद्रव पेशी यांच्याद्वारे निर्माण होतात, शरीरात असलेल्या द्रवामार्फत शरीराभर पसरतात आणि जीवाणूंनी स्रवलेल्या जीवविषापासून, तसेच संक्रामणांपासून शरीराचे रक्षण करतात. प्रथम बी-लसीका पेशीद्वारे प्रतिजन शोधला जातो. प्रत्येक बी-लसीका पेशी केवळ एका विशिष्ट प्रतिजनाला प्रतिसाद देते. जेव्हा बी-लसीका पेशी विशिष्ट प्रतिजनाच्या संपर्कात येते, ती प्रतिजनाशी जोडली जाते. त्यानंतर बी-लसीका पेशीचे विभाजन घडून येते आणि अनेक एकसारख्याच पेशी तयार होतात. या पेशी पक्व होऊन त्यांपासून रक्तद्रव पेशी किंवा बी-लसीका स्मृती पेशी तयार होतात. रक्तद्रवातील पेशी मोठ्या प्रमाणावर प्रतिद्रव्ये निर्माण करतात आणि ती प्रतिद्रव्ये लसीका वाहिन्यांतून, रक्तप्रवाहातून वाहत जाऊन संक्रामणांचा प्रतिकार करतात. भविष्यात जर त्याच सूक्ष्मजीवांचे संक्रामण झाल्यास बी-स्मृती लसीका पेशी प्रतिक्षम संस्थेला वेगाने प्रतिकार करायला मदत करतात. अन्यथा बी-स्मृती लसीका पेशी या लसिकाभ इंद्रियांमध्ये साठून राहतात.

प्रतिद्रव्ये संक्रामणांचा प्रतिकार वेगवेगळ्या प्रकारे करतात. उदा., काही प्रतिद्रव्ये प्रतिजनांवर असे आवरण तयार करतात, की ज्यामुळे बृहत्‌भक्षी पेशी व उदासीनरागी पेशी यांच्याद्वारे प्रतिजनांवर सहज भक्षकपेशीक्रिया घडून येते. तसेच जीवाणूंनी तयार केलेले जीवविष उदासीन करण्याचे कार्य प्रतिद्रव्ये करतात.

काही प्रतिद्रव्ये विशिष्ट प्रथिनांना सक्रिय करून शरीराचे संरक्षण करतात. त्यांना ‘परिपूरक प्रथिने’ म्हणतात; ती रक्तरसात असून सक्रिय झाल्यानंतर जीवाणू, विषाणू किंवा पेशीं नष्ट करण्यासाठी मदत करतात आणि भक्षकपेशी क्रियेमध्ये सहभागी होतात. एखाद्या जीवाणूवर प्रतिजन आणि परिपूरक प्रथिने या दोन्हींचे आवरण असेल, तर त्याचे भक्षण सहज घडून येते. तसेच संक्रामणाच्या ठिकाणी पांढऱ्या पेशींना आकर्षिक करण्याचे काम परिपूरक प्रथिने करतात. काही विशिष्ट प्रतिद्रव्ये बी-लसीका पेशींप्रमाणे असतात आणि त्यांपैकी प्रत्येक प्रतिद्रव्य ठराविक प्रतिजनाचा नाश करते. उदा., इन्फ्ल्युएन्झा विषाणूंच्या प्रत्येक प्रकारानुसार वेगवेगळी प्रतिद्रव्ये शरीरात निर्माण होतात. मात्र, जे प्रतिद्रव्य इन्फ्ल्युएन्झाच्या एका विषाणूशी लढते ते दुसऱ्या विषाणूंचा प्रतिकार करायला असमर्थ असते.

प्रतिजनांचा परिणाम शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे होतो; काही वेळा, जेव्हा प्रतिजन शरीरात शिरतात, तेव्हा त्या संक्रामणांची लक्षणे दिसण्याआधी पुरेशी प्रतिद्रव्ये निर्माण होतात. इतर बाबतीत, प्रतिद्रव्ये कमी प्रमाणात तयार होतात, परंतु रुग्णाला बरे व्हायला मदत होते.

प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्षमता वेगवेगळी असून ती प्रतिजनाला वेगवेगळ्या रीतीने प्रतिसाद देते. उदा., प्रत्येकाच्या प्रतिक्षम संस्थेवर परागकणांचा परिणाम होत नाही. परंतु काहींसाठी परागकण हे प्रतिजन असतात आणि त्यांमुळे अधिहर्षता उफाळून येते.

(२) पेशीय प्रतिक्षमता : यात शरीरातील पेशींद्वारे शरीरात घुसलेल्या प्रतिजनांचा नाश केला जातो. टी-लसीका पेशी आणि त्यांची रासायनिक उत्पादिते यांच्याद्वारे प्रतिकार घडून येतो. टी-लसीका पेशी विशिष्ट प्रतिजनांचाच प्रतिकार करतात. विशिष्ट प्रतिजनाला टी-लसीका पेशीने प्रतिकार करावा किंवा नाही हे ऊतीसंयोजी जटिल प्रथिने (मेजर ‍हिस्टोकाँम्पॅटिबिलिटी काँम्प्लेक्स प्रोटीन-एमएचसी) आणि टी-पेशी ग्राही प्रथिने ठरवितात. त्यांपैकी एमएचसी प्रथिने सर्व पेशींच्या पृष्ठभागावर आणि टी-पेशी ग्राही प्रथिने टी-लसीका पेशींच्या पृष्ठभागावर असतात.

पेशीय प्रतिसादाची सुरुवात बृहत्‌भक्षी पेशी किंवा सहायक पेशी (प्रतिजन-दर्शक पेशी) यांच्याकरवी होते. प्रतिजन शरीरात शिरल्यावर सहायक पेशी प्रतिजनाचे पचन करून त्यांचे लहानलहान तुकडे करतात. त्यांना प्रतिजन पेप्टाइडे म्हणतात. या पेप्टाइडांच्या तुकड्यांशी एमएचसी प्रथिने जोडली जातात आणि पेप्टाइड-एमएचसी संमिश्रे (प्रतिजन- एमएचसी संमिश्रे) तयार होतात; एमएचसी प्रथिने विशिष्ट प्रतिजन पेप्टाइडांशीच जुळली जातात. ही पेप्टाइड-एमएचसी संमिश्रे प्रतिजन-दर्शक पेशींच्या पृष्ठभागावर दिसू लागतात. त्यानंतर, लगतच्या टी-लसीका पेशींवरील टी-पेशी ग्राही ही पेप्टाइड-एमएचसी संमिश्रे ओळखून कोणत्या टी-लसीका पेशी जोडल्या जातील, हे निश्चित करतात. केवळ विशिष्ट पेप्टाइड-एमएचसी संमिश्रे विशिष्ट टी-पेशी ग्राहीशी (कोणत्याही कुलपाची किल्ली जशी विशिष्ट असते तशी) तंतोतंत जुळतात. पेप्टाइड-एमएचसी संमिश्रे आणि टी-पेशी ग्राही एकमेकांशी जुळले की त्यांद्वारे टी-लसीका पेशी सक्रिय होण्यासाठी पहिला संदेश पाठवतात.

मात्र टी-लसीका पेशी सक्रिय होण्यासाठी दुसरा संदेश सहायक पेशी आणि टी-लसीका पेशी यांच्या पृष्ठभागावरच्या सहायक रेणूंपासून मिळावा लागतो. टी-पेशी ग्राही आणि पेप्टाइड-एमएचसी संमिश्रे एकमेकांशी जुळल्यानंतर हे रेणू एकत्र येतात. ज्या टी-लसीका पेशींना पहिला संदेश टी-पेशी ग्राहींपासून आणि दुसरा संदेश सहायकारी रेणूपासून मिळतात, त्याच टी-लसीका पेशी सक्रिय होतात. सक्रिय झाल्यानंतर गुणित होतात आणि लसिकाभ इंद्रियांपासून रक्तप्रवाहाद्वारे, तसेच लसीका वाहिन्यांद्वारे शरीरभर पसरतात आणि संक्रामणांचा प्रतिकार करतात.

प्रतिजनाच्या स्वरूपानुसार निरनिराळ्या प्रकारच्या टी-पेशी प्रतिकारासाठी सहभागी होतात. विषाणूबाधित पेशींतील प्रतिजनामुळे पेशीबाधक टी-लसीका पेशी सक्रिय होतात आणि त्या विषाणूबाधित पेशींचा नाश करतात. अन्य प्रतिजनांमुळे लिंफोकाईन (सायटोकाईन गटातील संयुगे) रसायन स्रवणाऱ्या टी-सहायक पेशी सक्रिय होतात. लिंफोकाईनच्या एका प्रकारामुळे पेशीबाधक टी-लसीका पेशी निर्माण होतात, ज्या बाधित पेशींचा नाश करतात. अन्य लिंफोकाईन रसायनांमुळे बाधित भागात बृहत्‌भक्षी पेशी एकत्र येऊन सूक्ष्मजीवांचा नाश करतात. काही लसीका पेशी विषाणू आणि अर्बुद यांपासून संरक्षण करतात, त्यांना नैसर्गिक संहारक पेशी म्हणतात. अशा नैसर्गिक संहारक पेशींना सक्रिय होण्यासाठी टी-पेशी ग्राही आणि पेप्टाइड-एमएचसी संमिश्रे यांची गरज नसते आणि त्या स्वत:हून बाधित पेशींचा नाश करतात.

प्रतिक्षम संस्थेने संक्रामणावर मात मिळविल्यानंतर टी-पेशी लिंफोकाईन स्रवतात. त्यामुळे प्रतिक्षम प्रतिसाद थांबला जातो आणि प्रतिकारक्षम टी-लसीका पेशींची निर्मिती थांबते. सक्रिय झालेल्या अनेक टी-पेशी मरतात, तर काही टी-पेशी लसिकाभ इंद्रियांमध्ये साचून राहतात.

पेशीय प्रतिक्षमता इंद्रिय रोपणासाठी निर्णायक असते. ज्या व्यक्तीच्या शरीरात इंद्रियाचे रोपण केले जाते, त्याच्या प्रतिक्षम संस्थेसाठी रोपण केलेले इंद्रिय हा बाह्य पदार्थ असतो. अशा वेळी पेशींद्वारे प्रतिक्षम प्रतिसाद घडून येतो आणि रोपण केलेले इंद्रिय नाकारले जाऊ शकते किंवा इंद्रियाची हानी होऊ शकते. म्हणून इंद्रिय रोपण करताना दाता आणि ग्राहक जनुकीयदृष्ट्या सारखे असतील, हे पाहतात. तसेच प्रतिक्षम संस्थेच्या कार्यावर मर्यादा घालण्यासाठी प्रतिक्षम दमनकारी औषधेही रुग्णाला देतात.

शरीरात प्रतिक्षमता किंवा रोगप्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते; (१) सक्रिय प्रतिक्षमता आणि (२) निष्क्रिय प्रतिक्षमता. संक्रामणामुळे किंवा प्रतिक्षमनामुळे विशिष्ट प्रतिजन शरीरात शिरल्यास सक्रिय प्रतिक्षमता प्राप्त होते. असे संक्रामण पुन्हा झाल्यास स्मृती बी-पेशी आणि टी-पेशी तत्काळ प्रतिकार करतात. कारण पहिल्या प्रतिकारापेक्षा नंतरचा प्रतिकार जोरदार असतो. सक्रिय प्रतिक्षमता वर्षानुवर्षे टिकते. काही रोगांमुळे निर्माण झालेली प्रतिक्षमता अन्य रोगांच्या तुलनेत दीर्घकाळ टिकते. उदा., पीतज्वर विषाणूंच्या संक्रामणामुळे निर्माण झालेली प्रतिकारक्षमता कायम टिकते. कारण हा आजार विषाणूंच्या केवळ एकाच प्रकारामुळे होतो. सर्दीमुळे निर्माण झालेली प्रतिकारक्षमता कायम नसते, कारण सर्दीचे विषाणू दरवेळी नवीन व भिन्न असतात. आधीच्या सर्दीमुळे निर्माण झालेली प्रतिकारक्षमता सर्दीच्या नंतरच्या विषाणूंसाठी कुचकामी ठरते. काही वेळा, काही व्यक्तींमध्ये किरकोळ आजारामुळेही प्रतिद्रव्ये तयार होतात.

लसीकरण हा सक्रीय प्रतिक्षमनाचा एक प्रकार आहे. लशींमध्ये मृत किंवा दुर्बल जीवाणू किंवा विषाणू असतात. त्यामुळे लसीकरणानंतर काही वेळा रोगाची सौम्य लक्षणे निर्माण होतात. मात्र लशीमध्ये असलेल्या मृत किंवा दुर्बल सूक्ष्मजीवांमध्ये असलेल्या प्रतिजनांमुळे प्रतिक्षम प्रतिसाद निर्माण होतो. एखाद्या रोगाची प्रतिबंधक लस टोचल्यानंतर त्या रोगकारकाचे शरीरावर आक्रमण झाल्यास प्रतिक्षम संस्था तत्काळ प्रतिकार करू लागते. काही वेळा, लसीकरण केलेल्या व्यक्तीमध्ये वयानुसार लशीचा प्रभाव कमी होतो. अशा वेळी प्रतिकारशक्ती पूर्ववत करण्यासाठी लशीची लहान अनुवर्धी मात्रा (बुस्टर डोस) देतात.

एखाद्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिद्रव्ययुक्त रक्तरस (सीरम) अंत:क्षेपित केल असता निष्क्रिय प्रतिक्षमता प्राप्त होते. जी व्यक्ती एखाद्या रोगातून बरी झालेली असते किंवा ज्या व्यक्तीला रोगप्रतिबंधक लस दिलेली असते, अशा व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या रक्तापासून रक्तरस मिळवितात आणि त्यातील गॅमा ग्लोब्युलीन वापरतात. गॅमा ग्लोब्युलिनामध्ये रक्तातील बहुतेक प्रतिद्रव्ये असतात. उपचारासाठी अनेक दात्यांच्या रक्तांच्या मिश्रणातून मिळालेले गॅमा ग्लोब्युलीन वापरतात. अशा मिश्रणात विविध प्रतिद्रव्ये असतात. ज्या व्यक्तींमध्ये पुरेशी प्रतिद्रव्ये निर्माण होत नाहीत अशा व्यक्तीला गॅमा ग्लोब्युलिनाची अंत:क्षेपणे देतात. गोवर, विषाणूजन्य कावीळ इ. रोगांचे संक्रामण रोखण्यासाठी रक्तरस अंत:क्षेपित करतात. मात्र अंत:क्षेपणांमुळे निर्माण झालेली प्रतिद्रव्ये लवकर विघटित होत असल्याने निष्क्रिय प्रतिक्षमता काही आठवडे ते काही महिनेच टिकते. ज्या अर्भकाला त्याची माता स्तनपानाने दूध पाजते अशा अर्भकाला दूधातून मिळालेल्या प्रतिद्रव्यांमुळे विशिष्ट रोगांपासून निष्क्रिय प्रतिक्षमता प्राप्त होते. त्यामुळे अर्भकाचे काही महिने संरक्षण होते.

प्रतिक्षम प्रतिसाद सामान्यपणे शरीरबाह्य पदार्थांना लक्ष्य करतो. मात्र, काही वेळा प्रतिक्षम प्रतिसाद शरीरातील ऊतींवर शरीरबाह्य पदार्थ आहेत अशी समजूत होऊन घडून येतो. याला स्वयंप्रतिक्षमता म्हणतात. त्यामुळे काही विकार निर्माण होतात आणि ऊतींची हानी होते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात स्वत:च्याच ऊतींची हानी करणाऱ्या स्वयंप्रतिद्रव्याची निर्मिती होऊ शकते. मात्र, स्वयंप्रतिद्रव्यावर टी-पेशींद्वारे तयार झालेल्या सायटोकीनचे नियंत्रण असते. त्यामुळे स्वयंप्रतिक्षम रोग सहजासहजी होत नाहीत.

स्वयंप्रतिक्षम रोगांचे दोन प्रकार असतात: १. इंद्रिय-विशिष्ट स्वयंप्रतिक्षम रोग आणि २. सर्वांगीण स्वयंप्रतिक्षम रोग. इंद्रिय-विशिष्ट स्वयंप्रतिक्षम रोगांमध्ये अवटू ग्रंथी, त्वचा किंवा प्लीहा यांच्या ऊतींची हानी होते. उदा., अत्यवटुत्व (ग्रेव्ह विकार) हा स्वयंप्रतिक्षम विकार अवटू ग्रंथीला होतो. अशा रुग्णांमध्ये, रक्तातील प्रतिद्रव्ये अवटू ग्रंथीच्या ऊतींवर क्रिया करतात. त्यामुळे अवटू ग्रंथी वाढून ती अधिक संप्रेरक स्रवू लागते. वाढलेल्या संप्रेरकांमुळे उदासीनता येते व हृदयाचे ठोके वाढतात. त्यासाठी अवटू ग्रंथी कमी स्रवेल अशी औषधे रुग्णाला देतात. सर्वांगीण स्वयंप्रतिक्षम रोगामध्ये, अनेक इंद्रियांची हानी होते. उदा., पसऱ्या लांडग्या रोग (सिस्टेमिक ल्युपस इरिथेमेटॉसस) या विकारामुळे त्वचा, वृक्क, चेतासंस्था, सांधे आणि हृदय यांच्यावर परिणाम होतो. या विकारात स्वयंप्रतिद्रव्ये तयार होऊन ती ऊतींशी बद्ध होतात. परिणामी शरीरात दाह होऊन ऊतींची हानी होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा