नागी (नागरी) : (तेरावे शतक) मराठीतील पहिला पद्य आत्मकथा लिहिणारी कवयित्री. ८ अभंगांची मालिका असणाऱ्या तिच्या आत्मकथनात्मक  रचनेला ‘नागरी नामदेवाची ध्वाडी’ असे शीर्षक आढळते. काव्यांतर्गत संदर्भाच्या आधारे ती संत नामदेवांची पुतणी असावी असे वाटते. तिच्या वडिलांचे नाव रामया असे आले आहे. पाचव्या अभंगात नामदेवांचे मूळ गाव नरसी-बामणीचा उल्लेख, ‘माझयांचा ठाव नरसी ब्राह्मणी | आठवत मनीं रात्रीं दिवस’ असा आला आहे. नामदेवपुत्र गोंदाच्या एका अभंगात ‘नामयाची दासी नागी, दुसरी जनी’ असा उल्लेख आलेला आहे. येथे दासी हा शब्द शिष्या या अर्थाने घेतला जाऊ शकतो.भक्तिपरंपरा असलेल्या घरातील नागरीचा वडिलांनी विवाह लावून दिला;परंतु सासरी पूजा, अर्चा, भक्ती नव्हती. पुढे एकादशीला तिचे चित्त अनावर झाले व ती उन्मनी अवस्थेत विठ्ठलाच्या ओढीने माहेरी आली, अशा प्रकारचा भावोत्कट कथाभाग या काव्यात आला आहे. ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांना सासवडच्या श्रीसोपानदेव संस्थानचे वहिवाटदार श्री चिंतामणीबोवा गोसावी यांच्या संग्रहातून उपलब्ध झालेल्या एका बाडात ही नागरीची आत्मकथा उपलब्ध झाली. ‘मराठीतील आद्य स्त्री-आत्मकथा’ असे त्यांनी या काव्याचे वर्णन केले आहे. जन्म-मृत्यूचे साल व इतर चरित्र अनुपलब्ध आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा