चांगदेव : (? – १३२५). एक हठयोगी व मराठी ग्रंथकार. चांगदेव, चांगा वटेश्वर, वटेश चांगा अशा वेगवेगळ्या नावांनी ते ओळखले जातात. योगसामर्थ्यावर ते १,४०० वर्षे जगले, अशी दंतकथा आहे ; तथापि चांगदेवपरंपरेतील एक ग्रंथकार रत्नाकर याने आपल्या दीपरत्नाकर ह्या ग्रंथात चांगदेवाने चौदाव्या वर्षी वयस्तंभन केले, असे म्हटले आहे. ह्या वस्तुस्थितीचीच अतिशयोक्ती व विपर्यास वरील दंतकथेत झाला असावा. त्यांचे जन्मस्थान अज्ञात आहे. खानदेशातील एदलाबादजवळील चांगदेव ह्या गावी एक तपस्वी म्हणून तो वावरत होता. वटेश्वर हे त्याच्या उपास्य दैवताचे नाव असावे, असे रा.द. रानडे ह्यांचे मत आहे.
ह. रा. दिवेकर ह्यांच्या मते वटेश्वर हे चांगदेवांच्या गुरूचे नाव मात्र हा वटेश्वर मानवदेहधारी नव्हता. मुक्ताबाईने चांगदेवाला एका वडाच्या झाडाखाली दाखविलेले ईश्वररूप म्हणजेच हा वटेश्वर. तथापि ह्या दोन मतांपैकी पहिलेच सर्वसाधारणपणे ग्राह्य मानले जाते. गोरक्षनाथाची साक्षात शिष्या व ज्येष्ठ योगिनी मुक्ताबाई (ज्ञानेश्वरभगिनी नव्हे) हिच्याकडून चांगदेवाने उपदेश घेतला. ह्या मुक्ताबाईचा आश्रम श्रीपर्वतावर होता. हिच्या समाधीनंतरच चांगदेव ज्ञानेश्वर मंडळात रूजू झाले व ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाईस योगिनी मुक्ताबाईचा पुनरावतार मानून राहू लागले. चांगदेव हा श्रीज्ञानदेवांचे समकालीन. ज्ञानदेवांना भेटण्यासाठी त्यांनी त्यांना पत्र लिहावयास घेतले. तथापि मायन्याच्या ठिकाणी तीर्थरूप लिहावे, की चिरंजीव हे ठरविता आले नाही. त्यामुळे कोरेच पत्र पाठविले. ते पाहून ‘चांगदेव अजून कोराच’, असा अभिप्राय मुक्ताबाईने दिला. त्या पत्राला उत्तर म्हणून चांगदेवपासष्टी लिहून ज्ञानदेवांनी त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवणी दिली. चांगदेव व ज्ञानेश्वर ह्यांचा संबंध म्हणजे हठयोग व राजयोग ह्यांचा संबंध होय असे मत रा.द. रानडे ह्यांनी व्यक्त केले आहे. काही अभंग व तत्त्वसार (रचना १३१२) हा ग्रंथ ही चांगदेवाची उपलब्ध रचना. त्याच्या अभंगात ‘नोवरीचे पोटी नोवरा जन्मला’ अशा चमत्कृतिपूर्ण कल्पना, तसेच शाब्दिक कसरत दिसून येते. तत्त्वसाराच्या मूळ १,०३६ ओव्यांपैकी फक्त ४०० उपलब्ध आहेत. निर्गुण भक्तीचे वर्णन, सिद्धपंथातील योग्यांची नामावळी, निर्वाण व सिद्धयोग ह्यांचे प्रतिपादन ‘तत्त्वमसि’ ह्यांसारखे विषय आले आहेत. हा ग्रंथ ह.रा. दिवेकर ह्यांनी अर्थनिर्णायक टीपांसह संपादिला आहे (१९३६). त्यांची समाधी चांगदेव ह्या गावीच आहे.
संदर्भ :
- ढेरे, रा.चिं, नाथ संप्रदायाचा इतिहास, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.