लाला हरदयाळ : (१४ ऑक्टोबर १८८४–४ मार्च १९३९).
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारक नेता. परदेशांतील भारतीय नागरिकांना भारतदेशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांचा जन्म दिल्ली येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. आई भोलीराणी व वडील गौरीदयाळ माथुर यांचे लाला हरदयाळ हे सातवे अपत्य होते. त्यांचे वडील फार्सी व उर्दू या भाषांचे पंडित होते, तसेच दिल्ली येथील जिल्हा न्यायालयात ते वाचक (रीडर) म्हणून नोकरीस होते.
हरदयाळ यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली येथील केंब्रिज मिशन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सेंट स्टीफन्स महाविद्यालय, दिल्ली येथून त्यांनी संस्कृतमधून पदवीशिक्षण घेतले. पंजाब विद्यापीठ, लाहोर येथून त्यांनी संस्कृतमध्ये एम. ए. चे पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. ब्रिटिश सरकारने त्यांना पदव्युत्तर परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय गुणांबद्दल २०० पौंड इतकी शिष्यवृत्ती दिली. या शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी पुढील शिक्षणासाठी इ. स. १९०५ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन येथे प्रवेश घेतला. या विद्यापीठाकडूनही त्यांना आणखी दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या. महाविद्यालयीन काळात हरदयाळ आर्यसमाजाकडे आकृष्ट झाले.
वाय. एम. सी. ए. (यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन) लाहोर या संघटनेचे सचिव व लाला हरदयाळ यांच्यात वाद झाल्यामुळे उपरोक्त संघटनेला समांतर अशा ‘यंग मेन्स इंडिया असोसिएशनʼ या संघटनेची स्थापना हरदयाळ यांनी केली. संघटनेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उर्दू व फार्सीचे कवी, विचारवंत मुहम्मद इक्बाल (१८७७–१९३८) यांना आमंत्रित केले. इक्बाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशभक्तीवरील स्वरचित काव्य ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमाराʼ (तराना-ए-हिंद) सर्वांसमोर गायिले. हरदयाळ हे महाविद्यालयीन जीवनातच मास्टर आमीरचंद (१८६९–१९१५) यांच्या गुप्त क्रांतिकारी संस्थेचे सदस्य बनले होते. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ते इ. स. १९०५ पासून ‘इंडिया हाउसʼ च्या माध्यमातून परदेशी भारतीय लोकांत देशभक्तीचा प्रसार करणारे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते श्यामजी कृष्ण वर्मा (१८५७–१९३०) यांच्या संपर्कात आले. भारतीय इतिहास अभ्यासाच्या परिणामातून इंग्रजी शिक्षणपद्धतीस पाप समजून इ. स. १९०७ मध्ये हरदयाळ यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील शिक्षणाचा त्याग केला आणि लंडनमध्ये देशभक्त समाजाची स्थापना करून ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलनाचा प्रसार व प्रचार करू लागले. भारतास ब्रिटिशांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्यांनी एक योजना बनविली आणि भारतीयांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करून ब्रिटिश धोरणावर टीका केली.
इ. स. १९०८ मध्ये हरदयाळ भारतात परतले. त्या वेळी ते लोकमान्य टिळकांना भेटले. त्यानंतर पतियाळा येथे जाऊन बुद्धांप्रमाणे संन्यास घेऊन आपल्या शिष्यांना क्रांतिकारी विचारांची शिकवण दिली. इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे राष्ट्रीय चरित्र नष्ट होऊन राष्ट्रीय जीवनाचा मुख्य प्रवाह विषारी होत जातो. इंग्रज ख्रिश्चन धर्माच्या माध्यमातून आपणास कायमस्वरूपी गुलामगिरीत टाकत आहेत, असे प्रखर विचार त्यांनी प्रवचनांतून मांडले. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळा, महाविद्यालये सोडली. अनेक सरकारी नोकरदारांनी आपल्या नोकऱ्यांचा त्याग केला. या काळात त्यांनी लाहोर येथील दैनिक पंजाबी या इंग्रजी दैनिकाचे संपादक म्हणूनही काम पाहिले. हरदयाळ यांचा प्रभाव जनतेत वाढू लागल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यावेळी भारतीय क्रांतिकारक नेते लाला लजपतराय (१८६५–१९२८) यांनी हरदयाळ यांना आग्रह करून परदेशात पाठवले.
इ. स. १९०९ मध्ये पॅरिस येथे श्यामजी कृष्ण वर्मा व क्रांतिकारक नेत्या श्रीमती भिकाजी रुस्तुम कामा यांच्या ते संपर्कात आले. तेथे वंदे मातरम् व तलवार या मासिक पत्रिकांचे संपादन ते करू लागले. पॅरिस येथेच त्यांनी आपले प्रचारकेंद्र बनविले. पुढे इ. स. १९१० मध्ये ते अल्जीरिया येथे गेले. तेथून लामार्तनीक बेटावर जाऊन त्यांनी काही काळ एकांतवास स्वीकारला. भाई परमानंद (१८७६–१९४७) यांच्या आग्रहाखातर हरदयाळ हिंदू संस्कृतीच्या प्रसारासाठी अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी आद्य शंकराचार्य, कांट, हेगेल व कार्ल मार्क्स यांच्या कार्याचा अभ्यास केला. तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘हिंदू संस्कृतिदर्शनʼ या विषयावर अनेक व्याख्याने दिली. अमेरिकन बुद्धिवादी लोक त्यांना हिंदू संत, कवी म्हणून संबोधित. इ. स. १९१२ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठात ‘हिंदू संस्कृतिदर्शनʼ या विषयाचे सन्माननीय प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या काळात त्यांनीगदर नावाची पत्रिका काढली.
भारतातील ब्रिटिश साम्राज्य उलथविण्यासाठी अमेरिकेतील भारतीयांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे २५ जून १९१३ रोजी गदर पार्टीची स्थापना केली. गदर पत्रिकेच्या नावावरून या संघटनेस ‘गदर पार्टीʼ असे नाव ठेवण्यात आले. सोहनसिंह भकना (१८७०–१९६८) हे या पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष, तर हरदयाळ हे महासचिव होते. याद्वारे भारतात ब्रिटिशांकडून केले जाणारे अन्याय व अत्याचार यांकडे जगाचे लक्ष वेधण्याचे काम हरदयाळ यांनी केले. त्यासाठी त्यांनी कॅनडा, चीन व जपान या ठिकाणी या पार्टीच्या अनेक शाखा उघडल्या. दरम्यान जर्मनी व इंग्लंड यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन पहिल्या जागतिक महायुद्धास सुरुवात झाली. यावेळी हरदयाळ यांनी परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांना स्वदेशात परत जाऊन भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेण्याचे आवाहन आपल्या व्याख्यानांतून केले. त्यामुळे परदेशांतील अनेक भारतीय लोक भारतात आले. परदेशांत वास्तव्यास असलेल्या हरदयाळ यांना अटक करण्याविषयीच्या हालचाली ब्रिटिश सरकारने सुरु केल्या, तेव्हा ते स्वीत्झर्लंडला व तेथून जर्मनीला गेले. पहिल्या महायुद्धाच्या उत्तर कालखंडात जर्मनीचा पराभव होऊ लागल्याने ते जर्मनीतून स्वीडनला गेले. हरदयाळ यांना जगातील सु. १३ भाषा अवगत होत्या. परदेशांतील त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे त्यांना भारतात आणण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आले. इ. स. १९२७ पासून हरदयाळ यांनी इंग्लंडमध्ये वास्तव्य केले. त्यांनी डॉक्ट्रिन्स ऑफ बोधिसत्त्व हा संशोधनात्मक प्रबंध लंडन विद्यापीठास सादर करून पीएच.डी. पदवी संपादन केली. हरदयाळ यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केले. त्यांमध्ये थॉट्स ऑन एज्युकेशन, युगांतर सर्क्युलर, राजद्रोही प्रतिबंधित साहित्य (गदर, ऐलान -ए -जंग, जंग-दा-हांका), सोशल कॉन्क्वेस्ट ऑन हिंदू रेस, राइटिंग्ज ऑफ लाला हरदयाळ (१९२०), फॉर्टी फोर मंथ्स इन जर्मनी ॲण्ड तुर्की (१९२०), स्वाधीन विचार (१९२२), अमृत में विष (१९२२), हिंट्स फॉर सेल्फ कल्चर (१९३४), ट्वेल्व्ह रिलिजन्स अँड मॉडर्न लाइफ , ग्लिम्पसेज ऑफ वर्ल्ड रिलिजन्स, व्यक्तित्व विकास : संघर्ष और सफलता इत्यादींचा समावेश होतो.
मानवता हाच आपला धर्म मानून लंडनमध्ये हरदयाळ यांनी आधुनिक संस्कृती संस्थेची स्थापना केली. तत्कालीन भारतातील ब्रिटिश सरकारने त्यांना इ. स. १९३९ मध्ये भारतात येण्याची सहमती दिली. दरम्यान शांततावादाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने व्याख्यान देण्यासाठी ते फिलाडेल्फिया येथे गेले होते. तेथेच त्यांचे गूढ रीत्या निधन झाले.
संदर्भ :
- Dharmavira, Lala Hardayal and Revolutionary Movement of His Time, New Delhi, 1970.
- Neeraj, Lala Hardayal, New Delhi, 2006.
- सरकार, सुमित, अनु., डोभाल, सुशीला, आधुनिक भारत (१८८५–१९४७), नवी दिल्ली,१९९३.
समीक्षक – अरुणचंद्र पाठक