राणी गाइदिन्ल्यू  : (२६ जानेवारी १९१५ – १७ फेब्रुवारी १९९३).

प्रसिद्ध भारतीय स्त्री स्वातंत्र्यसेनानी. मणिपूरमधील लोंग्काओ (नुन्ग्काओ) येथे रौंग्मी नागा जमातीतील लोथोनांग पामेई आणि क्चाक्लेनिऊ या दांपत्यापोटी तिचा जन्म झाला. एकूण आठ भावंडांत पाचवी असलेली गाइदिन्ल्यू लहानपणापासूनच अतिशय धाडसी होती. या भागात शाळा नसल्यामुळे तिचे शिक्षण होऊ शकले नाही. ब्रिटिश अधिसत्तेच्या या कालखंडात भारतभर ब्रिटिशविरोधी लढे सुरू होते. गाइदिन्ल्यूचा चुलतभाऊ हैपोऊ जादोनांग याने हेराका नावाचे धार्मिक आंदोलन सुरू केले. विशेषतः नागा लोकांच्या  ख्रिश्चनीकरणास त्यांनी विरोध केला. हळूहळू हे आंदोलन सशस्त्र बनले. झेलियनग्रोंग जमातीतील लोक (झेमी, लाईंगमाय, रौंग्मी, काबुईस) या आंदोलनाकडे आकर्षित झाले. वयाच्या तेराव्या वर्षी गाइदिन्ल्यू या आंदोलनात सहभागी झाली. मणिपूर- नागालँडमधून ब्रिटिशांना बाहेर हाकलून प्राचीन नागा संस्कृतीचे  पुन्नरुज्जीवन करणे या उद्देशाने जादोनांग आणि त्याचे सर्व सहकारी कार्य करत होते. ब्रिटिशांनी जादोनांगला पकडून २९ ऑगस्ट १९३१ रोजी फाशी दिली. पुढे हेराका आंदोलनाचे नेतृत्व अवघ्या सोळा वर्षांच्या गाइदिन्ल्यूकडे आले. गनिमी काव्यात, शस्त्र चालविण्यात तरबेज असलेल्या गाइदिन्ल्यूबरोबर सु. चार हजार क्रांतिकारी लोकांचे संघटन होते. जादोनांगला फाशी दिल्यानंतर नागा लोकांत असंतोष पसरला होता.  त्याला ब्रिटिशविरोधाकडे वळविण्यात तिला यश मिळाले.

 गाइदिन्ल्यूने नागा जमातीतील सर्व गटांना एकत्र आणून ब्रिटिशांच्या विरोधात मोठे सशस्त्र आंदोलन चालविले. महात्मा गांधींनी चालविलेल्या आंदोलनापासून प्रेरित होऊन तिने लोकांना ब्रिटिश सरकारला कर न देण्याचे आवाहन केले. अत्यंत गुप्तपणे तिच्या ब्रिटिशविरोधी कारवाया चालत असत. ब्रिटिशांनी तिला पकडण्याचे बरेच प्रयत्न केले. गाइदिन्ल्यू आणि तिच्या सहकाऱ्यांनी मार्च १९३२ मध्ये आसाम रायफल्सच्या हंग्रुम (Hangrum) गावातील फौजेच्या संरक्षणासाठी लावलेल्या दुसऱ्या ठाण्यावर (आउट पोस्ट) केवळ भाल्यांच्या साहाय्याने हल्ला केला. आसाम प्रांताच्या गव्हर्नरने आसाम रायफल्सच्या दोन तुकड्या तिच्या मागावर पाठविल्या. तिला पकडून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. जे गावकरी तिच्या विरोधात ब्रिटिशांना मदत करतील, त्यांना दहा वर्षे करमाफीही जाहीर केली. गाइदिन्ल्यूला मदत करणाऱ्या दोन गावांत ब्रिटिशांनी जाळपोळ केली, तरीही नागा लोक तिला आर्थिक मदत करत राहिले. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली.

गाइदिन्ल्यूने तिच्या क्रांतिकारी साथीदारांना आश्रय घेता येईल असा मोठा लाकडी किल्ला पुलोमी गावात बांधायला सुरुवात केली (१९३२). हे बांधकाम सुरू असतानाच कॅप्टन मॅक्डोनाल्डच्या नेतृत्वाखाली आसाम रायफल्सने १७ ऑक्टोबर १९३२ रोजी अचानकपणे हल्ला करून गाइदिन्ल्यू आणि तिच्या साथीदारांना अटक केली. त्यांना इंफाळला आणून त्यांच्यावर खटला चालविला गेला. सतरा वर्षांच्या गाइदिन्ल्यूस जन्मठेपेची शिक्षा, तर तिच्या काही सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे जवळपास पंधरा वर्षे ती कैदेत राहिली. कोहिमा, गौहाती, शिलाँग, तुरा इत्यादी ठिकाणच्या तुरुंगांमध्ये तिला ठेवले गेले. पंडित नेहरू मणिपूरभेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांना गाइदिन्ल्यूबद्दल माहिती मिळाली. ते तिला शिलाँग तुरुंगात भेटायला गेले. तेथून तिला सोडविण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. तिला तुरुंगातून सोडले तर जादोनांगच्या पंथाचे पुन्नरुज्जीवन होऊन आंदोलन पुन्हा सुरू होईल, अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती. नेहरूंनीच तिचा उल्लेख ‘राणीʼ असा केला. त्यानंतर ‘राणी गाइदिन्ल्यू ʼ या नावाने ती प्रसिद्ध झाली. हेराका आंदोलन यानंतर थंडावत गेले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ ऑक्टोबर १९४७ रोजी तिची सुटका झाली.

तुरुंगातून सुटल्यानंतर १९५२ पर्यंत तिचे वास्तव्य त्युयेनसंग (Tuensang) या गावात होते. त्यानंतर तिला तिच्या मूळ गावी लोंग्काओला जाण्याची परवानगी मिळाली. भारतीय स्वातंत्र्यानंतर नागा संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी ती कार्यरत राहिली. नागा नॅशनल कौन्सिलच्या भारतातून स्वतंत्र होण्याच्या मागणीस तिचा विरोध होता. तिने भारतातच स्वतंत्र झेलियनग्रोंग  प्रदेशाची मागणी केली. अनेक नागा नेत्यांनी गाइदिन्ल्यूला विरोध करत तिच्यावर टीका केली. त्यांच्यातील संघर्ष वाढत गेला. अखेरीस १९६० मध्ये आपल्या अनुयायांसह ती भूमिगत झाली. भूमिगत राहून तिने आपली चळवळ सुरूच ठेवली. पुढे भारत सरकारबरोबर झालेल्या करारानंतर ती प्रकट झाली. उर्वरित आयुष्य तिने तिच्या जमातीच्या प्रगतीसाठी व्यतीत केले. गाइदिन्ल्यूने गाजविलेल्या पराक्रमामुळे तिचा उल्लेख ‘नागालँडची राणी लक्ष्मीबाईʼ असाही केला जातो.  ब्रिटिशविरोधाबरोबरच पारंपरिक नागा संस्कृतीच्या रक्षणासाठी तिने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले. तिच्यामुळे मणिपूरची स्वातंत्र्य चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जोडली गेली. मणिपूरमधील लोकांत राजकीय स्वातंत्र्याची जाणीव निर्माण करण्यात तिचे योगदान महत्त्वाचे ठरले.

राणी गाइदिन्ल्यूला तिच्या क्रांतिकार्यासाठी स्वातंत्र्यसेनानी ताम्रपत्र (१९७२), भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९८२), विवेकानंद सेवा सन्मान पुरस्कार (१९८३) इत्यादी मानसन्मान देऊन गौरविण्यात आले.

लोंग्काओ (मणिपूर) येथे तिचे निधन झाले.

संदर्भ :

  • Reid, Robert, ‘The Manipur Administrative Report of 1931-32ʼ.
  • Srivastava, A. R. N. Tribal Freedom Fighters of India, New Delhi, 1988.
  • ‘Background Note on Rani Gaidinliuʼ, Press Information Bureau, Government of India, 2015.

समीक्षक – अरुणचंद्र पाठक

This Post Has One Comment

  1. Bijali Shripal Dadape

    स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रीयांच्या सहभाग इतिहासातील एक तेजस्वी पान आहे, सर्व भारतीयांना, महिलांना याचा अभिमान आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा