रशियन साम्यवाद समर्थक एक प्रमुख राजकीय गट. रशियामध्ये विभिन्न राजकीय विचारसरणीचे पक्ष होते. निरंकुश आणि दमनात्मक परिस्थिती असूनदेखील तेथे राजकीय चेतनेचा निरंतर विकास होत गेला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्या ठिकाणी मुख्यत्वे दोन विचारसरणी आढळून येतात. एक बोल्शेव्हिक गट (क्रांतिकारी समाजवादी गट), जो क्रांतिद्वारे निरंकुश सत्तेचा अंत करण्याची इच्छा असणारा होता. तर दुसरा, मेन्शेव्हिक गट (उदारमतवाद समर्थक), जो गट संवैधानिक शासनाचे समर्थन  करणारा होता.

रशियातील मार्क्सवादी पुढाऱ्यांनी १८९८ मध्ये रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टीची स्थापना केली. रशियन भूमीवर मार्क्सप्रणीत मार्गाने क्रांती घडवून आणणे, हा या पक्षाचा प्रमुख उद्देश होता. या पक्षाच्या १९०३ मध्ये झालेल्या अधिवेशनात बोल्शेव्हिक आणि मेन्शेव्हिक या नावाचे दोन गट निर्माण झाले. यातील बोल्शेव्हिक गट थोर मार्क्सवादी विचारवंत न्यिकलाय लेनिन याचा समर्थक होता, तर मेन्शेव्हिक हा रशियन क्रांतिकारी नेता लीअन ट्रॉटस्कीच्या विचारांना मानणाऱ्या लोकांचा गट होता. याच अधिवेशनात लेनिन आणि एल. मार्तोव्ह यांनी परस्परविरोधी मते मांडली. यावेळी लेनिनप्रणीत गटास केवळ याच मतदानात बहुमत मिळाले, म्हणून बोल्शेव्हिकांना ‘बहुमतवालेʼ असे नाव प्राप्त झाले, तर मार्तोव्हचे नेतृत्व मानणारे मेन्शेव्हिक ‘अल्पमतवालेʼ या नावाने परिचित झाले. मेन्शेव्हिकांच्या विचारसरणीनुसार संसदीय लोकशाही शासनपद्धतीच्या माध्यमातून संपूर्ण समाजवादाचे ध्येय प्राप्त केले जाऊ शकते. त्यासाठी त्यांना मध्यमवर्गीय लोकांचे (बुर्झ्वा वर्ग) सहकार्य अपेक्षित होते.

मेन्शेव्हिक म्हणजे अल्पमत; परंतु प्रारंभी हा गट बहुमतामध्ये होता. बोल्शेव्हिकांच्या तुलनेत हा गट अधिक शक्तिशाली होता. एल. मार्तोव्ह हा या गटाचा नेता होता. श्रमिक वर्गाबरोबरच इतर अन्य वर्गाचे सहकार्य घेऊन लोकशाही स्थापन करण्याचे समर्थन हा गट करत होता. रोबोचाय गॅझेट हे मेन्शेव्हिकांचे मुखपत्र होते. जुलियस मॅरॅव्ह हा या गटाचा संस्थापक होता. लीअन ट्रॉटस्की सुरुवातीच्या काळात मेन्शेव्हिक विचारसरणीचा होता, पण नंतरच्या काळात तो बोल्शेव्हिक विचारसरणीचा समर्थक बनला.

मेन्शेव्हिक धोरणे व विचारसरणी :

मध्यमवर्गातील श्रीमंत लोकांनी मेन्शेव्हिकांच्या उदारमतवादी विचारसरणीवर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य केले. मेन्शव्हिक उजव्या विचारसरणीचे होते. या गटाच्या नेत्यांनी ड्यूमाच्या (संसद) माध्यमातून कार्य करण्याचे ठरवले. ड्यूमामधील नेतृत्व झेड आणि स्कोनेलेव यांनी केले.  यांच्यातील सामाजिक क्रांतिकारी हे समाजाच्या उच्च बुद्धिजीवी वर्गातून आले होते. मेन्शेव्हिक विचारसरणीनुसार मध्यमवर्गाने जुन्या राज्यप्रणालीमध्ये थोडासा बदल करून कारभार करावा. त्यांची विचारसरणी मार्क्सवादी विचारावरच आधारलेली होती. बोल्शव्हिकांच्या प्रतिक्रियावादी नीतीला त्यांनी विरोध केला; मात्र बोल्शव्हिकांबरोबर युती करण्यासाठी त्यांनी त्यांच्या लोकशाहीवादी कार्यक्रमाची प्रत्येक पायरीवर तडजोड केली.

१९०५ नंतर मेन्शेव्हिकांचे कार्य उदारमतवादी, मध्यमवर्गीय लोकशाही पक्षांकडे झुकले. उदा., ‘कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅट्सʼ, कारण ते मध्यमवर्गाच्या क्रांतीचे नैसर्गिक नेतृत्व होते. त्यांनी कायम कायदेशीर मार्गाने जाण्याचे आणि कामगार संघटनांबरोबर कार्य करण्याचे धोरण ठेवले. १९०५ च्या मेन्शेव्हिकांच्या पराभवानंतर ते कायदेशीरपणे विरोधात सामील झाले. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान मेन्शेव्हिकांचे दोन गटांत विभाजन झाले. बहुतांश मेन्शेव्हिकांनी युद्धास विरोध केला. त्यांनी छापील पत्रके व तोंडी प्रचाराच्या माध्यमातून युद्धविरोधी वातावरण निर्माण केले होते. तसेच मेन्शेव्हिक-आंतरराष्ट्रवादी असा एक गट त्यांनी स्थापन केला होता. परंतु अल्पसंख्याक मेन्शेव्हिकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली युद्धाला समर्थन दिले. तर बोल्शेव्हिक गट हा ड्यूमामध्ये अतिशय कमजोर होता. म्हणून तो रशियाच्या युद्धखोरीला विरोध करू शकला नाही.

मार्च १९१७ मध्ये मेन्शेव्हिक आणि बोल्शेव्हिक या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचे  प्रयत्न सुरू झाले. मार्च १९१७ च्या हंगामी सरकारला मेन्शेव्हिकांनी काही अटींवर पाठिंबा दिला. जून १९१७ च्या पेट्रग्राडच्या संमेलनामध्ये क्रांतिकारी समाजवादी, मेन्शेव्हिक आणि बोल्शेव्हिक असे सर्व गट सामील झाले. या संमेलनावर मेन्शेव्हिक गटाचेच वर्चस्व होते. शहरी कामगारांवर त्यांचा प्रभाव होता. तथापि हंगामी सरकारची निष्क्रियता व दौर्बल्य; जनतेच्या मताविरुद्ध त्यांनी चालू ठेवलेले युद्ध, त्यात झालेली अपार हानी व पराभव यामुळे हंगामी सरकारची व मेन्शेव्हिकांची लोकप्रियता ओसरली. १९१८ मध्ये हा गट साम्यवादी पक्षामध्ये विलीन झाला.

संदर्भ:

  • जैन, हुकमचंद; माथूर, कृष्णचंद्र, आधुनिक विश्व इतिहास (१५०० – २०००), २०१८.
  • वैद्य, सुमन, रशियाचा इतिहास १८६० – १९६४, आशय प्रकाशन, नागपूर, १९८०.

समीक्षक – अरुण भोसले

प्रतिक्रिया व्यक्त करा