रशियन साम्यवादी क्रांतिकारी गट. रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (स्थापना १८९८) या मुळातील मार्क्सवादी पक्षाच्या १९०३ मध्ये लंडन येथे भरलेल्या दुसऱ्या परिषदेमध्ये पक्षांतर्गत सैद्धांतिक मतभेदांमुळे विभाजित झालेला हा गट. ‘बोल्शेव्हिकʼ आणि ‘मेन्शेव्हिकʼ अशा दोन गटांत हा पक्ष विभाजित झाला.

बोल्शेव्हिक हा गट सुरुवातीला अल्पमतामध्ये होता. मार्क्सवादी विचारवंत न्यिकलाय लेनिन (मूळ नाव व्ह्लाद्यीमिर इल्यिच उल्यानफ्स्क) हा या पक्षाचा नेता. परिषदेत पक्षाच्या काही प्रश्नांबद्दल उदा., पक्षाचे ध्येय, धोरणे, रचना इत्यादींबाबत त्याने खूपच आग्रही मते मांडली. एल. मार्तोव्ह या नेत्यानेही टोकाची भूमिका घेतली. त्यावेळी तीव्र मतभेद झाल्यामुळे पक्षात दोन गट निर्माण झाले. पक्षातर्फे मुखपत्र चालविण्यासाठी घेतलेल्या केवळ याच मतदानात लेनिनच्या गटास बहुमत प्राप्त झाले. त्यामुळे लेनिनचे अनुयायी ‘बोल्शेव्हिकʼ म्हणजे ‘बहुमतवालेʼ म्हणून, तर मार्तोव्हचे अनुयायी ‘मेन्शेव्हिकʼ म्हणजे ‘अल्पमतवालेʼ म्हणून परिचित झाले.

बोल्शेव्हिक पक्ष केंद्रीय संघटना आणि कठोर शिस्त यांच्या माध्यमातून सर्व वर्गाचे अधिनायक तंत्र स्थापित करण्यासाठी इच्छुक होता. तसेच क्रांतिकार्यासाठी सर्व प्रकारच्या बलिदानाची तयारी असणारा व बदलास उत्सुक असा हा पक्ष होता. कामगार, शेतकरी, सैन्य यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केली. कामगार वर्गाला भांडवलशाहीविरुद्ध व झारच्या सरंजामी राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी तयार करणे, हे त्यांचे मुख्य ध्येय होते.

बोल्शेव्हिक क्रांती :

१९०५ पासूनच बोल्शेव्हिकांनी दुसऱ्या क्रांतीची तयारी सुरू केली होती. त्यांना पेट्रग्राड आणि मॉस्कोमध्ये समर्थन प्राप्त झाले होते. लेनिनने शेतकऱ्यांना स्वतःची जमीन दिल्यामुळे संपूर्ण रशियाभर बोल्शेव्हिकांचा समर्थक वर्ग तयार झाला होता. त्यांनी कृषकांना स्वतःची जमीन, कामगारांना कारखान्याची मालकी आणि सैनिकांना युद्धबंदीचा विश्वास दिला.

१९१७ च्या बोल्शेव्हिक क्रांतीला तीन पायऱ्यांमध्ये समजून घेण्याची गरज आहे : १) १९०५ च्या क्रांतीद्वारे पायाभरणी, २) १९१७ च्या मार्चक्रांतीने झारच्या राजकीय सत्तेचे झालेले उन्मूलन आणि ३) नोव्हेंबर १९१७ च्या क्रांतीद्वारे आर्थिक बाबींना अधिक महत्त्वपूर्ण बनविले.

बोल्शेव्हिकांनी प्रावदा (सत्य) या मुखपत्राच्या माध्यमातून आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. याशिवाय पक्षाची तात्त्विक भूमिका मांडणारी अन्य दोन मासिकेही होती. हा गट सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून सत्ताप्राप्तीसाठी योजना बनवत होता. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी ‘पॉलिटब्यूरोʼ (मुख्य कार्यकारी समिती) स्थापन केला. क्यिऱ्येनस्कीने ५ नोव्हेंबर १९१७ ला बोल्शेव्हिक नेत्यांना अटक करण्याचा आदेश दिले; परंतु तत्पूर्वीच बोल्शेव्हिक नेत्यांनी क्रांतीची तयारी सुरू केली होती. ६ आणि ७ नोव्हेंबरच्या रात्री या पक्षाने दूरध्वनी केंद्रे, टपाल कार्यालये, रेल्वेस्थानके आणि बँका यांवर ताबा मिळवला. पंतप्रधान अल्यिक्सांडर क्यिऱ्येनस्की (Alexander Kerensky १८८१–१९७०) राजधानी सोडून पळून गेला आणि सरकारचे सर्व मंत्री बंदी बनवले गेले. अशा प्रकारे या पक्षाने रक्तहीन क्रांती करून रशियाच्या राजधानीवर आधिपत्य स्थापित केले आणि रशियामध्ये समाजवादी क्रांती यशस्वी झाली. नोव्हेंबर १९१७ च्या क्रांतीनंतर सत्ता बोल्शेव्हिक नेता लेनिन आणि रशियन क्रांतिकारक नेता लीअन ट्रॉटस्कीच्या हाती आली.

बोल्शेव्हिकांचे उद्दिष्ट व धोरण :

मध्यमवर्गीय व भांडवलदार यांच्या हंगामी सरकारशी कोणत्याही प्रकारे सहकार्य न करणे, संरक्षणात्मक युद्धाच्या नावाखाली चालू असलेले साम्राज्यवादी युद्ध ताबडतोब बंद करणे, गरीब शेतकरी व कामगार यांच्या प्रतिनिधी मंडळाकडे म्हणजे सोव्हिएटच्या हाती सर्व राजकीय सत्ता केंद्रित करणे, शेतजमिनीचे राष्ट्रीयीकरण करणे, राष्ट्रीय उत्पादन व वितरण यांवर सोव्हिएटचे नियंत्रण असणे, बोल्शेव्हिक पक्षाचे ‘साम्यवादी पक्षʼ असे नामकरण करणे व साम्यवादी आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करणे असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

कारखान्यातील कामगारांत जहाल मतवाद्यांचा व बोल्शेव्हिकांचा पगडा झपाट्याने दृढ होत होता. जून १९१७ अखेरी, युद्धबंदीची मागणी करीत निघालेल्या कामगार व सैनिकांच्या मोर्चाच्या वेळी बोल्शेव्हिकांचा प्रभाव स्पष्टपणे प्रत्ययास आला. पाच लक्ष सैनिक-कामगारांचा मोर्चा तौरीद राजवाड्यावर चालून गेला. जुलैचा उठाव पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्यामुळे बोल्शेव्हिक पक्षाला काही काळ का होईना, चांगलाच हादरा बसला. पक्ष व त्यांचे मुखपत्र प्रावदा यांच्या कार्यालयावर हल्ले झाले. नेते तुरुंगात डांबले गेले.

जुलैमध्ये बोल्शेव्हिक नेत्यांना झालेली अटक, त्यांच्या वृत्तपत्रावर घातलेली बंदी, नेतृत्वाची पोकळी या कारणाने त्यांचा प्रभाव ओसरल्यासारखे वाटत होते; तथापि पेट्रग्राडच्या कामगारवर्गात बोल्शेव्हिकांचा प्रभाव झपाट्याने वाढत होता. रशियन सैन्याचा प्रमुख जनरल लॉव्हर करन्यीलॉव्हचा (Lavr Georgiyevich Kornilov १८७०–१९१८) उठाव दडपल्यामुळे बोल्शेव्हिकांचे कणखर नेतृत्व, खंबीर भूमिका, कामगार वर्गावरील त्यांचा प्रभाव यामुळे जनमत दुबळ्या हंगामी सरकारच्या विरोधात बोल्शेव्हिकांकडे झुकले. ३१ ऑगस्ट रोजी पेट्रग्राड सोव्हिएटच्या झालेल्या निवडणुकीत बोल्शेव्हिक पक्षाला बहुमत मिळाले. सोव्हिएटच्या पुनर्निर्वाचित समितीत १३ बोल्शेव्हिक, ६ सोशॅलिस्ट क्रांतिकारक तर केवळ ३ मेन्शेव्हिक सदस्य होते.

२५ ऑक्टोबर १९१७ च्या मध्यरात्री विंटर राजवाड्याचा ताबा बोल्शेव्हिकांनी घेतला. कमीतकमी रक्तपात होऊन राष्ट्राची सत्तासूत्रे त्यांच्या हाती आली. या राज्यक्रांतीबरोबर केवळ रशियाच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. १९१७ मध्ये बोल्शेव्हिकांनी एक नवीन शासनव्यवस्था स्थापन केली. रशियाच्या या साम्यवादी सरकारचा जगातील इतर देशांवरही व्यापक प्रभाव पडला. १९१८ मध्ये रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर बोल्शेव्हिकांनी आपल्या पक्षाचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएट युनियन (सी. पी. एस. यू.) असे नामांतर केले.

रशियाचा अंतर्गत गृहकलह :

रशियाच्या गृहकलहातून ‘व्हाइट आर्मीʼ या नावाखाली बोल्शेव्हिकांना विरोध करणारा एक नवीन शत्रू उदयाला आला. बोल्शेव्हिकांच्या लाल आरमाराचे (रेड आर्मी) नेतृत्व क्रांतिकारी नेता लीअन ट्रॉटस्की याने केले. व्हाइट आर्मी आणि लाल फौज (रेड गार्ड्स) यांच्यातील दीर्घकालीन कलहामध्ये बोल्शेव्हिकांना विजय मिळाला. बोल्शेव्हिकांच्या भयंकर कारस्थानांना ‘लाल आतंकʼ असे म्हटले जाते. बोल्शेव्हिकांनी आपल्या विरोधकांचा अंत करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये भय पसरविण्यासाठी हिंसेचा आधार घेतला. त्यासाठी ‘चेकाʼ नामक एक विशेष न्यायालय स्थापन केले. बोल्शेव्हिकांनी आंतरिक विद्रोहाचे दमन केले. प्रारंभकाळामध्ये बोल्शेव्हिक क्रांती रक्तहीन होती; परंतु नंतरच्या काळातील इतिहासात ती एक भयंकर क्रांती म्हणून सिद्ध झाली.

संदर्भ :

  • जैन, हुकमचंद; माथूर, कृष्णचंद्र, आधुनिक विश्व इतिहास (१५०० – २०००), २०१८.
  • वैद्य, सुमन, रशियाचा इतिहास १८६० – १९६४, आशय प्रकाशन, नागपूर, १९८०.

समीक्षक – अरुण भोसले

प्रतिक्रिया व्यक्त करा