प्रेषितांवर विश्वास ठेवणे हे इस्लाम धर्माच्या सहा कलमांमधील एक महत्त्वाचे कलम आहे. इस्लाम धर्मात प्रेषितांचे नबी आणि रसूल असे दोन प्रकार पडतात. रसूल म्हणजे अल्लाहचा संदेश किंवा साक्षात्कार घेऊन येणारे. ही संज्ञा ‘रसूलल्ला’(अल्लाहचा दूत) या मुहंमदांच्या पदवीमुळे परिचित असते आणि नबी म्हणजे अल्लाह आणि अल्लाहला मानणाऱ्या लोकांच्या मधील दुवे, जे अल्लाहचा संदेश त्यांना कळेल अशा भाषेत सांगतात. काही विद्वानांनुसार हे दोन्ही शब्द परिवर्तनीय आहेत, मात्र काहींच्या मते नबी म्हणजे केवळ साक्षात्कार देण्यासाठी निवड झालेली व्यक्ती, तर रसूल यांना केवळ साक्षात्कारच दिला जात नाही तर काहीतरी विशिष्ट कार्यासाठी पाठवलेले असते. काहींनी नबी म्हणजे सामान्य दूत असे मानून केवळ सात प्रेषितांना रसूल मानले आहे. ते सात म्हणजे–आदम, नोआ (नूह), अब्राहम (इब्राहम), मोसेस (मुसा), डेविड (दाऊद), जेसुस (इसा) आणि मुहंमद. येथे साक्षात्कार ही मध्यवर्ती संकल्पना असून त्याचे वर्णन आत्म्यावर पडलेला दैवी प्रकाशाचा झोत, असे करण्यात येते. इस्लामनुसार प्रेषित ही अल्लाहने इस्लामची शिकवण देण्यासाठी निवडलेली खास व्यक्ती होय. मुहंमद पैगंबर यांच्यासोबत कुराणमध्ये एकूण पंचवीस प्रेषितांचा उल्लेख आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : १) आदम, २) अल-यास, ३) अयुब, ४) दाऊद, ५) धु-अल-किफ्ल, ६) हुद, ७) इब्राहीम, ८) इद्रीस, ९) इलियास, १०) इसा, ११) इशक़, १२) इस्माईल, १३) लुक़्मन, १४) लुट, १५) मुसा, १६) नूह, १७) सालीह, १८) शोएब, १९) सुलेमान, २०) युनुस, २१) उझेर, २२) उह्या, २३) याकुब, २४) युसुफ आणि २५) मुहंमद (यातील बहुतांश नावे ख्रिस्ती आणि यहुदी धर्मांतही आढळतात.). परंतु मुहंमद हे मात्र इस्लाम धर्माचे वैशिष्ट्य आहे. मुहंमद हे शेवटचे प्रेषित मानले गेले असून असे मानण्यात येते की, मुहंमदांना अल्लाहने आपल्या उपदेशाचा असा काही साक्षात्कार घडवला की, ते त्यांच्या सर्व पूर्वसूरींपेक्षा श्रेष्ठ ठरले. मुहंमदांच्या श्रेष्ठत्वाचे कारण त्यांनी इस्लामला दिलेले कुराण हेही असू शकते. परंतु असे असले तरी ह्या सर्व प्रेषितांना कुराणमध्ये समान दर्जा आहे.
इस्लाम हा अपौरुषेय धर्म असून मुस्लिमांसाठी त्याची सुरुवात मुहंमदांना झालेल्या साक्षात्कारापासून झाली. इस्लामिक परंपरेनुसार त्यांना हा साक्षात्कार एकतर थेट अल्लाहद्वारे झाला किंवा मुख्य दूत गॅब्रिएल यांच्या मध्यस्थीने झाला. यामुळे अनेक विद्वानांनी ही साक्षात्काराची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण झाली याबाबत विविध सिद्धांत मांडलेले दिसून येते. या सिद्धांतांमध्ये मग मुहंमदांच्या पूर्वीच्या प्रेषितांचाही अंतर्भाव करण्यात आला आणि त्यामुळेच इस्लाम धर्मात नेमके किती प्रेषित होऊन गेले याचा नक्की आकडा सांगता येत नाही. प्रेषितांची ही साखळी नंतर इतकी वाढली की, काहींनुसार तो आकडा सु. १,२४,००० एवढा होता.
प्रेषितांची निवड ही पूर्णपणे अल्लाहचा निर्णय असून त्यांची काय योग्यता असावी, याबाबतचे विवेचन कुठेही आढळत नाही. परंतु एकंदर प्रेषितांची परंपरा पाहिली की, काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. त्यांचे आयुष्य अत्यंत खडतर होते. बऱ्याच प्रेषितांना तर त्यांच्या निकटवर्तीयांपासून दूर पळून जावे लागले होते. अनेकांना आपला मार्ग बदलण्यासाठी आमिष दाखवण्यात आले होते. पण ते आपल्या मार्गावरून हटले नाहीत. त्यामुळे धैर्याने सर्व संकटांना सामोरे जाताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपले काम करत राहणे हीच प्रेषितांची सर्वश्रेष्ठ योग्यता असावी, असे वाटते. बऱ्याचदा ह्या प्रेषितांच्या गोष्टींमधील काही उल्लेख हे अतिरंजित आणि अशक्य वाटणारे असतात. जसे की, नोह हे ९५० वर्षे जगले होते, तर इब्राहीम ४००० वर्षे. नोह या प्रेषितांचे वय ९५० वर्षांचे होते, हे कुराणानुसार बरोबर आहे; परंतु इब्राहीम या प्रेषितांचे वय ४००० वर्ष होते, ह्याला कुराण हा आधार नाही.
इस्लामनुसार प्रेषितांची परंपरा ‘आदम’ म्हणजे पहिल्या मानवापासून सुरू होते आणि मुहंमद ह्या शेवटच्या प्रेषितावर येऊन संपते. याचे कारण, मुहंमदांच्या मृत्युनंतर त्यांच्या समर्थकांनी कुराणमधील मुहंमदांशी निगडित काही संदर्भांचा अर्थ ‘खत्म-अल-अन्बिया’ असा स्पष्ट केला. यामुळे मुहंमदांना साक्षात्काराच्या प्रक्रियेचा अंत मानण्यात आले. मुहंमदांच्या मृत्युनंतर अन्य अरब टोळीप्रमुखांकडून वारंवार होत असलेले साक्षात्काराचे दावे, हेसुद्धा या प्रक्रियेचा अंत मानण्याचे महत्त्वाचे कारण आहे. या निर्णयामुळे मुस्लिमांमध्ये जरी नबी वा रसूल ही पदवी धारण करण्यावर लगाम लावण्यात आला, तरी कुराणचा अर्थ नव्याने समजून घेण्यावर पाबंदी कधीच घातली गेली नाही. कुराणाचा अर्थ नव्याने लावत असताना प्रेषितांच्या काळात जे त्यांचे सोबती होते (ज्यांना सहाबा म्हटले जाते), त्यांनी प्रत्येक आयतीचा (वाक्याचा) जो अर्थ प्रेषिताकडून समजून घेतला त्याच्याशी तो एकरूप आणि पूरक असावा लागतो, विसंगत अर्थ अमान्य होतो.
रसूल नवीन शरीअत आणतो. तो ग्रंथ धारक असतो. तो नबीही (खबरदार करणारा, शुभवार्ता देणारा) असतो. प्रत्येक रसूल हा नबी असतोच असतो; परंतु प्रत्येक नबी हा रसूल नसतो. हजरत इब्राहीम, हजरत मूसा आणि हजरत मुहंमद हे निश्चितपणे रसूल होते आणि नबीपण होते. एका रसूलांनी आणलेली शरीअत दुसऱ्या रसूलांच्या काळात त्यातील काही बाबींत बदल होईपर्यंत चालू असते. मुहंमदांच्या प्रेषितत्वापूर्वी जेरूसलेममधील ‘बैतुल मकदिस’कडे तोंड करून प्रेषित मुहंमद नमाज पढत असत. नंतर कुराणात आज्ञा आली आणि आताच्या काबागृहाकडे, (जे पूर्वीच्या ‘बैतुल मकदिस’च्या अगदी विरुद्ध दिशेला आहे), तोंड करून नमाज पढणे सुरू झाले.
अल्लाह किंवा ईश्वर, इस्लामनुसार अशी अदृष्य शक्ती आहे की, मानव जातीत जन्मलेला कोणताही माणूस, प्रेषित, संत-महात्मा ईश्वराला आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. पृथ्वीवरील पहिला माणूस आदम जे स्वतः प्रेषित होते, त्यांच्यापासून प्रेषित मुहंमदांपर्यंत कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. ज्यांचा दावा आहे की, एखाद्या प्रेषिताने, संत-महात्म्याने ईश्वराला पाहिलेले आहे, तो दावा इस्लाम खोटा ठरवतो, अमान्य करतो. माणसाला पाहण्याची मर्यादित शक्ती ईश्वराने दिलेली आहे. त्या मर्यादित शक्तीने तो ‘अमर्याद शक्ती’ म्हणजे ईश्वराला पाहू शकत नाही. थोडक्यात कोणत्याही रसूल/नबी यांनी ईश्वराला पाहिलेले नाही.
संदर्भ :
- Ahmad Moulavi, N. Religion of Islam, 1979.
- Nadwi, AbulHasan Ali, Islamic Concept of Prophethood, lucknow, 1995.
- Roberts, S. Islam : A westerner’s Guide, London, 1981.
- Sayyid Abul Ala Maududi, Towards understanding Islam, 1940.
- Taylor, Richard C. Ed. The Routledge Companion to Islamic Philosophy, Routledge, 2016.
समीक्षक – गुलाम समदानी