फॅबेसी कुलाच्या सिसॅल्पिनीऑइडी उपकुलातील काही वनस्पती कांचन या नावाने ओळखल्या जातात. त्यांपैकी पिवळा कांचन, कांचन, रक्त कांचन आणि सफेद कांचन या जाती महत्त्वाच्या आहेत. या वनस्पतींच्या फुलांच्या रंगांवरून त्यांना मराठी भाषेत वरील नावे पडली आहेत. फुलातील एक किंवा अधिक भडक रंगाच्या पाकळ्या आणि आपट्याच्या पानांसारखी पाने ही या वनस्पतींची समान वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या फुलांतील एक पाकळी ऑर्किडच्या फुलांमधील पाकळीप्रमाणे (ओष्ठ) वेगळी असते. म्हणून इंग्रजी भाषेत या वनस्पतींच्या सामान्य नावांमध्ये ऑर्किड ही संज्ञा लावलेली दिसते. गुलमोहर व चिंच हे वृक्ष देखील फॅबेसी कुलातील आहेत.

पिवळा कांचन (यलो ऑर्किड ट्री) : या वृक्षाचे शास्त्रीय नाव बौहीनिया टोमेण्टोसा आहे. तो मूळचा पूर्व आशियातील असून अनेक देशांमध्ये एक शोभिवंत वनस्पती म्हणून त्याची लागवड करतात.
पिवळा कांचन वृक्ष सु. ४ मी. उंच वाढतो. पाने साधी, एकाआड एक, द्विखंडी व हिरवीगार असतात. फुले एकेकटी, जोडीने किंवा तीनच्या झुबक्यात येतात. फुले मोठी, ५–७ सेंमी., पिवळ्या रंगाची व लोंबती असतात. फुलात १० लहानमोठे पुंकेसर असतात. पाकळ्या सुट्या असून त्यांतील एका पाकळीवर जांभळा किंवा गडद गुलाबी रंगाचा मोठा ठिपका असतो. फळ शेंग प्रकारचे असून शेंगा १०–१२ सेंमी. लांब, चपट्या, टोकदार असतात. शेंगा तडकल्यावर बिया बाहेर पडतात. बिया ८–१२, लहान व चपट्या असतात. बियांपासून रोपे तयार होतात.
पिवळा कांचन वृक्षाचे लाकूड कठीण व चिवट असते. हत्यारांच्या मुठी बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. खोडाच्या सालीतील धाग्यांपासून दोर तयार करतात. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व प्रतिऑक्सिडीकारक म्हणून त्याच्या खोडापासून व पानांपासून काढलेल्या अर्काचा वापर करतात.
कांचन (ऑर्किड ट्री) : या वृक्षाचे शास्त्रीय नाव बौहीनिया व्हेरिगॅटा असून त्याला कोविदार असेही म्हणतात. तो मूळचा भारतातील असून शोभेकरिता त्याची लागवड करतात. तो १०–१२ मी. उंच वाढतो. पाने साधी, १०–२० सेंमी. लांब व रुंद असून आपट्याच्या पानांसारखी दोन भागांत विभागलेली असतात. फुले मोठी व सुवासिक असून फांदीच्या टोकाला झुबक्यात येतात. ती गडद गुलाबी किंवा पांढरी असतात. शेंग १५–३० सेंमी. लांब असून त्यात १०–१५ चपट्या बिया असतात.
रक्त कांचन (पर्पल ऑर्किड ट्री) : या वृक्षाचे शास्त्रीय नाव बौहीनिया पुर्पुरिया आहे. त्याला मराठीत देवकांचन असेही म्हणतात. तो मूळचा दक्षिण-पूर्व आशियातील असून म्यानमार, चीन आणि भारत इत्यादी देशांत आढळतो. भारतात तो कोकणात व दख्खनच्या पानझडी वनांत तसेच आसाम व मेघालय येथेही आढळतो. तो ६–९ मी. उंच, सरळ, ताठ वाढणारा, सदाहरित व शिंबावंत वृक्ष आहे. साल राखाडी असून फांद्या भरपूर असतात. पाने साधी व आपट्याच्या पानांप्रमाणे अर्धवट विभागलेली परंतु त्याहून मोठी असतात. फुले सुवासिक, मोठी व गुलाबी-जांभळी असून त्यांना प्रत्येकी ५ पाकळ्या असतात. शिंबा म्हणजेच शेंगा सु. ३० सेंमी. लांब, चपट्या, कठीण व एकदम तडकणाऱ्या असतात. शेंगेमध्ये पिंगट, चपट्या व लंबगोल १२–१६ बिया असतात.
रक्त कांचन हा वृक्ष बागांमध्ये विशेषेकरून शोभेसाठी लावतात. त्याचे लाकूड हलके व मजबूत असून ते घरबांधणीसाठी तसेच शेतीच्या अवजारांसाठी वापरतात. रक्त कांचन आणि कांचन हे वृक्ष त्यांच्या फुलांच्या गुलाबी रंगामुळे दिसायला सारखे दिसतात. त्यामुळे त्यांच्यात फरक करणे अवघड असते.
सफेद कांचन (ड्वार्फ व्हॉइट ऑर्किड ट्री) : या वृक्षाचे शास्त्रीय नाव बौहीनिया ॲक्युमिनॅटा आहे. तो मूळचा आशियातील असून चीन, भारत, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया इ. देशांत आढळतो. भारतात त्याची लागवड शोभेकरिता करतात. तो २-३ मी. उंच वाढतो. फांद्यांवर बारीक लव असते. पाने साधी व दोन भागांत विभागलेली असून ती जनावरांच्या खुरांप्रमाणे दिसतात; ती ६–१५ सेंमी. लांब व रुंद असून रात्री मिटतात. फुले पांढरी, मोठी व सुवासिक असतात. फुलांमध्ये पाच पाकळ्या असून पिवळी टोके असलेले १० पुंकेसर असतात. शेंग ७–१५ सेंमी. लांब असून लोंबती असते. शेंगेत ८–१२ बिया असतात.
https://www.youtube.com/watch?v=xPaAswPdXhg
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.