पॅलेड, जॉर्ज एमील : (१९ नोव्हेंबर १९१२ – ७ ऑक्टोबर २००८).
रूमानियात जन्मलेले अमेरिकन पेशी जीवशास्त्रज्ञ. त्यांनी ऊती तयार करण्याचे तंत्र आणि प्रगत केंद्रोत्सारक तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक (electron microscope) हाताळण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला, त्यामुळे पेशी आणि पेशींच्या पृथक्करणातील सुधारणेसाठी मदत झाली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना ॲल्बर्ट क्लोड (Albert Claude) व क्रिश्चन आर्. डी ड्यूव्हे (Christian de Duve) यांच्याबरोबर १९७४ चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. पॅलेड यांनी आधुनिक पेशी-जीवशास्त्राचा पाया रचला. पेशीतील अंत:प्राकल जालकातील (एन्डोप्लास्मिक रेटिक्युलम; endoplasmic reticulum) रिबोसोम (ribosome) हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा शोध आहे.
पॅलेड यांचा जन्म यासी (रूमानिया) येथे झाला. त्यांनी बूकारेस्ट विद्यापीठाची एम.डी. पदवी मिळविली (१९४०) व तेथेच त्यांनी १९४६ पर्यंत अध्यापन केले. १९५२ साली त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. फ्रांसिसीक रेनर आणि आंद्रे बोईवीन या अनुक्रमे शरीरशास्त्र आणि जीवरसायनाशास्त्राचे प्राध्यापक यांच्या प्रभावामुळे पॅलेड यांनी शरीरशास्त्रात काम करायचे ठरविले. न्यूयॉर्क विद्यापीठात काम करत असताना पॅलेड यांची प्रा. ॲल्बर्ट क्लोड यांच्याशी भेट झाली. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकावर भाषण द्यायला ते तेथे आले होते. प्रा. ॲल्बर्ट क्लोड यांनी त्यांना रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च (Rockefeller Institute for Medical Research) या संस्थेत त्यांच्याबरोबर काम करायला बोलाविले. १९५८ मध्ये ते रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी होगेबूम आणि स्चनेइडेर यांच्याबरोबर काळजाच्या पेशींची पृथक्करणाची पद्धत विकसित केली. पुढे पेशींच्या संशोधनाचे महत्त्व वाढले आणि जर्नल ऑफ सेल बायॉलॉजी (Journal of Cell Biology) आणि द अमेरिकन सोसायटी फॉर सेल बायॉलॉजी (The American society for cell biology) हे नियतकालिक सुरू करण्यात आले. रॉकफेलर इन्स्टिट्यूट सोडल्यानंतर त्यांनी येल विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागात काम केले (१९७२). ह्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना पेशी जीवशास्त्र यासारख्या नवीन क्षेत्रात काम करून शरीरशास्त्र, रोगोपचारासारख्या (क्लिनिकल मेडिसिन) पारंपरिक विषयाबरोबर संवाद हवा होता. त्यानंतर १९९० साली ते सॅन डिएगो मधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (UCSD) येथील स्कूल ऑफ मेडिसीन येथे संचालक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी पेशी-जीवशास्त्राकरिता विशेष उपक्रम राबविले.
पॅलेड हे प्रथिनांच्या संश्लेषण व विमोचन पद्धती या संदर्भातील कामाबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांनी पेशी मधील सुत्रकणिका (मायटोकाँड्रीया; mitochondria), हरितकणु (क्लोरोप्लास्ट; chloroplasts), गॉल्जी पिंड (Golgi apparatus, Golgi body) आणि इतर अंगकांवर सखोल अभ्यास केला. त्यांचा महत्त्वाचा शोध म्हणजे मायक्रोसोम (microsome). पूर्वी मायक्रोसोमला सुत्रकणिकेचे तुटलेले भाग समजले जायचे, परंतु मायक्रोसोम हे अंत: प्राकल जालकाचा (endoplasmic reticulum) एक भाग असून त्यामध्ये रिबोन्यूक्लिक अम्लाचे प्रमाण जात असते, असे समजले. नंतर त्याला रिबोसोम असे नाव देण्यात आले. त्यांनी पेशींची अंतर्गत रचना समजण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला.
पॅलेड यांना मूलभूत वैद्यकीय संशोधनाबद्दल ॲल्बर्ट लास्कर पुरस्कार (१९६६) आणि अमेरिकेचा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार (नॅशनल मेडल ऑफ सायन्सेस; १९८६) देण्यात आले. त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे सभासद आणि रॉयल सोसायाटीचे परदेशीय सभासद म्हणून नेमले गेले.
पॅलेड यांचे डेल मार, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1974/palade-bio.html
- https://en.wikipedia.org/wiki/George_Emil_Palade
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1974/
- https://www.britannica.com/biography/George-E-Palade
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2575727/
समीक्षक – रंजन गर्गे
#पेशी #जीवशास्त्रज्ञ #नोबेलपारितोषिक #इलेक्ट्रॉनमायक्रोस्कोप #एन्डोप्लास्मिकरेटिक्युलम #रिबोसोम #अंत:प्राकलजालक #endoplasmicreticulum #ribosome #electronmicrosope #cell #biologist #physiologyormedicine #वैद्यक