पिसू (प्युलेक्स इरिटान्स )

एक लहान व पंख नसलेला बाह्य परजीवी कीटक. पंख नसलेल्या आणि ज्यांची मुखांगे त्वचा भेदून रक्त ओढण्यासाठी अनुरूप असतात, अशा कीटकांचा समावेश कीटक वर्गाच्या ‘सायफनॅप्टेरा’ या गणात केला जातो. या गणातील सर्व कीटकांना पिसू असे म्हटले जाते. पिसू ही मुख्यत: कुत्रा, मांजर, उंदीर, माणूस इ. सस्तन प्राण्यांच्या आणि क्वचित पक्ष्यांच्या शरीरावर आढळते आणि त्यांच्या रक्तावर जगते. जगभरात पिसूच्या सु. २,००० जातींची नोंद झाली आहे. झेनोप्सायला केओपिस ही उंदरावरील, टिनोसेफॅलिडिस फेलिस ही मांजरावरील, टिनोसेफॅलिडिस कॅनिस  ही कुत्र्यावरील आणि प्युलेक्स इरिटान्स ही माणसावरील अशा पिसवांच्या काही प्रमुख जाती आहेत.

उंदरावरील पिसूचे शरीर १·५–३·५ मिमी. लांब असते. तिचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असल्यामुळे ती प्राण्यांच्या केसांमधून आणि पक्ष्यांच्या पंखांमधून फिरू शकते. तोंडाचे रूपांतर रक्त शोषून घेणाऱ्या अवयवात झालेले असते. मुखांगातील जबडा लांब व करवतीसारख्या दातांनी युक्त असतो. प्राण्यांच्या शरीरात जबडा खुपसून पिसू रक्त शोषून घेते. सर्वांत मागचे पाय उंच उडी मारण्यासाठी अनुरूप झालेले असतात. ती आकाराने लहान असली, तरी सु. ३३ सेंमी. लांब किंवा सु. २५ सेंमी. उंच उडी मारू शकते.

पिसू हा चपळ कीटक असून याच्या शरीराचा कडकपणा, चकचकीतपणा आणि शरीरावर असलेले लहान राठ केस यांमुळे ती ज्या प्राण्यांच्या शरीरावर राहते त्यांच्या शरीरावर सहज हालचाल करू शकते. कडक शरीरामुळे ती दाब सहन करू शकते. उदा., दोन बोटांमध्ये चिरडले, तरी तिच्यावर काही परिणाम होत नाही. केवळ नखांमध्ये चिरडून तिला मारता येते. तसेच पाण्यात बुडविले असता ती मरते.

पिसूच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा अवस्था असतात; हे पूर्ण रूपांतरणाचे उदाहरण आहे. पिसूची मादी एका वेळी ८–१२ एवढी अंडी अनेकदा घालते. अंडी गोलसर व पांढरट रंगाची असतात. ही अंडी आश्रयीच्या शरीरावर घातली जातात. अंडी चिकट नसल्यामुळे ती प्राण्याच्या शरीरावरून खाली घसरून गादी, जाजम व माती यांवर पडतात. अंड्यातून साधारणत: २–१४ दिवसांच्या कालावधीत अळी (डिंभ) बाहेर पडते. पाळीव प्राण्यांचा वावर असलेल्या जागी ओल किंवा दमटपणा असल्यास तिची वाढ झपाट्याने होते. अळीच्या डोक्यावर एक कडक काटा असून त्याच्या साहाय्याने ती अंड्यातून बाहेर पडते. हा काटा काही काळानंतर नाहीसा होतो. अळी अर्धपारदर्शक व फिकट रंगाची असते. तिला डोळे नसतात. सर्व शरीरावर लहान व राठ केस असतात. ती वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थांवर आणि मोठ्या पिसवांच्या विष्ठेवर जगते. अन्नाची उपलब्धता आणि वातावरण यांनुसार अळीची अवस्था ५–१८ दिवस टिकते. त्यानंतर ती धाग्याच्या साहाय्याने कोश तयार करते. ३–५ दिवसांत या कोशातून प्रौढ पिसू बाहेर पडते. आश्रयीकडून निर्माण झालेली कंपने, उष्णता आणि कार्बन डायऑक्साइड वायू यांद्वारे पिसूला आश्रयीची माहिती होते. एकदा पिसू प्रौढ झाली की प्रजनन करणे, हे तिचे मुख्य काम असते. कोशातून बाहेर पडल्यावर पहिल्या ७-८ दिवसांत अन्न म्हणून तिला कोणाचे तरी रक्त लागते. त्यानंतर ती अन्नाशिवाय २-३ वर्षे जगू शकते.

पिसू एक उपद्रवी कीटक आहे. उंदरावरील पिसवा प्लेगच्या यर्सिनिया पेस्टिस या कारक जीवाणूंच्या वाहक आहेत. सध्या प्लेगची लागण होत नाही. खंदकज्वराचा (ट्रेंच फीवर) कारक जीवाणू रिकेट्सिया टायफी याच्याही वाहक पिसवा असतात. तसेच लहान मुलांमध्ये हायमेनोलेप्सिस नाना या चपटकृमीच्या डिंभाचा प्रसार पिसवांमार्फतच होतो. पिसू फक्त आश्रयीच्या ताज्या रक्तावर जगते. ती चावली की लालसर गोल अशी गांध उठते व त्याजागी सूज येऊन जळजळते. या गांधी बहुधा रांगेत उठतात. तिच्या चावण्यामुळे आणि खाजेमुळे केस गळतात आणि त्यांपासून रक्तक्षय होऊ शकतो. पिसवांच्या लाळेमुळे काही जणांना अधिहर्षता (ॲलर्जी) होते. पिसूच्या जीवनक्रमातील तीन-चतुर्थांश काळ कोणत्या तरी आश्रयीच्या शरीरावर जातो, म्हणून आश्रयीवर उपचार करण्याबरोबर परिसर प‍िसुमुक्त ठेवणे आवश्यक असते.

https://www.youtube.com/watch?v=Q5Wb2kQfkqE

प्रतिक्रिया व्यक्त करा