रविदास : (जन्म इ. स. १७२७ -मृत्यू इ. स. १८०४). रविराम. रवि (साहेब). रविभाण संप्रदायाचे संतकवी. गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील आमोद तालुक्यातील तनछा गावात जन्म.वडिलांचे नाव मनछराम. आई इच्छाबाई. ज्ञाती विषा श्रीमाळी वणिक. इ. स. १७५३ मध्ये त्यांचा रामकबीर संप्रदायाचे भाणसाहेब यांचेशी संपर्क आला तेंव्हापासून ते त्यांचे शिष्य झाले.भाणसाहेबांच्या बरोबर शेरखी गावात ते राहिले. मोरारसाहेब,गंगसाहेब असे त्यांचे १९ शिष्य होते. ज्ञान, योग आणि भक्ती या तत्वांचा समन्वय असणाऱ्या रविदासांच्या कृतीत साधुशाई हिंदीत लिहिलेल्या रचनांचे प्रमाण अधिक आहे; आणि त्यांच्या गुजराती कृतीतही हिंदीचा प्रभाव अधिक आहे. चोपाई, ढाळ, दुहो सारखी अशा रचनाबंधात २१ कडव्यात रचलेली भाणगिता/रवीगीता आणि ७ अध्यायात रचलेली मन:संयम/तत्त्वसारनिरूपण या कृतीतून त्यांचा धर्मविचार आणि संप्रदायाची विशिष्ट विचारसरणी समजण्यास मदत होते. याशिवाय ज्ञान-योग साधना तसेच आध्यात्मिक अनुभव यांचा आनंद व्यक्त करणाऱ्या १०७, १०९ काडीच्या २ बारमासी रचना, साखी-चोपाईंच्या ४३ कडींची बोधचिन्तामणी ही रचना, ३७ कडींची सिद्धांत-कक्को ही कृती, साधुशाई हिंदी व गुजरातीत रचलेली २५७ छप्पाची कविता छप्पय व अनेक हिंदी रचना त्यांच्या नावावर आहेत.
संदर्भ :
- झाला,ओघडभाई, रवि भाण संप्रदाय के प्रमुख संतो की बानियां, सौराष्ट्र विद्यापीठ, २००९.