महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जलदुर्ग व पर्यटनस्थळ. वैतरणा नदीच्या मुखावर समुद्रकिनाऱ्यापासून पाव किमी.वर तो समुद्रात बांधला आहे. उत्तर कोकणातील वसई किल्ल्याच्या खालोखाल हा अतिशय बळकट किल्ला समजला जातो.

वसई मोहिमेच्या वेळी पेशव्यांनी अनेक लहानमोठे किल्ले उत्तर कोकणात बांधले. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई, बेलापूर, जिवधन (विरार जवळील), पारसिक, टकमक, गंभीरगड, सेगवा, काळदुर्ग, असावा, तांदुळवाडी, मनोर, माहीम, केळवे, पाणकोट इत्यादी किल्ले जिंकून घेतले. तसेच अर्नाळा, वज्रगड, ठाणे, भवानीगड इत्यादी किल्ले नव्याने बांधले.

छ. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रात खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे पाच किल्ले बांधले. त्याला अनुसरून मराठ्यांनी अर्नाळा हा अभेद्य किल्ला उत्तर कोकणात बांधला. त्याला एकूण तीन दरवाजे असून महादरवाजा उत्तराभिमुख आहे. कमानीच्या मध्यभागी पहिले बाजीराव पेशवे यांनी दरवाजाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख असणारा शिलालेख आहे. या कमानीवर सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेल्या हत्तींच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात.

१८१८ साली इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनुसार या किल्ल्याचे क्षेत्रफळ ७०० चौ. फूट असून तटबंदीची उंची साधारणतः २५ ते ३० फूट आहे. तटबंदीमध्ये भैरव, भवानी आणि बावा या नावाचे तीन बुरूज आहेत. पेशव्यांनी हा किल्ला पूर्णपणे नव्याने बांधला. किल्ल्यामध्ये त्र्यंबकेश्वर व भवानी देवीचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर बांधीव अष्टकोनी तलाव आहे. याव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीरदेखील बांधलेली दिसते. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एकूण दहा बुरूज बांधलेले आहेत. अर्नाळा बेटाचा इतिहास मध्ययुगीन कालखंडापासून सुरू होतो. या बेटावर गुजरातच्या सुलतानाने १५१६ मध्ये एक छोटी गढी बांधली होती. पोर्तुगीजांनी हल्ला करून १५३० मध्ये हे बेट काबीज केले. या बेटावरील गढी व इतर इमारती पाडून उद्ध्वस्त केल्या व हे बेट एका पोर्तुगीज अधिकाऱ्याला इनाम दिले. त्या अधिकाऱ्याने बेटावर काही बांधकामे केली आणि शिबंदी ठेवली. पुढे अनेक वर्षे हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पेशव्यांना हे बेट मराठी साम्राज्यात असावे, असे मनापासून वाटत होते. याचे मुख्य कारण म्हणजे हे बेट ताब्यात असते, तर वैतरणा खाडीतून चालणाऱ्या व्यापारावर वर्चस्व मिळवता आले असते आणि त्यामुळे स्वराज्याच्या महसुलामध्ये मोठी वाढ झाली असती.

अर्नाळा बेटावर हल्ला करण्याचे काम पारंपरिक गनिमी कावा पद्धतीने करण्याचे ठरल्यानंतर पेशव्यांचे सरदार शंकराजीपंत फडके यांनी गोविंदजी कासार यांच्यामार्फत अर्नाळा बेटावरील लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची हमी दिली. बोळींज येथील गौराजी पाटील याने काही अटींवर गलबते बनवून देण्याचे मान्य केले. शंकराजीपंतांनी गंगाजी नाईक अणजूरकर, बाजीराव बेलोसे, सयाजीराव सुर्वे इ. चारशेजणांना अर्नाळ्याच्या मोहिमेवर पाठविले. २८ मार्च १७३७ रोजी अर्नाळा बेट काबीज झाले. या मोहिमेत विशेष चकमक झाल्याचे किंवा माणूस दगावल्याचे कोणतेही उल्लेख मराठी व पोर्तुगीज कागदपत्रांत मिळत नाहीत. बेटावर पोर्तुगीजांची फारशी शिबंदी नसावी. १३ एप्रिल १७३७ रोजी शंकराजीपंत यांनी चिमाजी आप्पा यांना पत्र लिहून अर्नाळा घेतल्याची माहिती दिली. शंकराजीपंतांनी बाजीराव बेलोसे व चिंतामण शिवदेव यांच्या सोबत तीनशे माणसे अर्नाळ्याला पाठविली आणि मूळ किल्ल्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली. त्यासाठी वसई आणि विरारपरिसरातील खाणींमधून दगड काढून वापरला गेला. नवीन किल्ल्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला जुलै १७३७ मध्ये सुरुवात झाली. पण लगेचच काही दिवसांनी चिमाजी आप्पांनी शंकराजीपंत यांना पत्र लिहून कळविले की, सध्या अर्नाळ्यात पक्के बांधकाम करू नये; कारण त्यास पुष्कळ दिवस लागतील. त्यावर शंकराजीपंतांनी कळविले की, पक्के बांधकाम करणे गरजेचे असून ते सुरू झाले आहे. तटबंदीवरील फांजीचे काम चुना नसल्यामुळे थांबले आहे. शंकराजीपंतांच्या मागणीप्रमाणे १४ डिसेंबर १७३७ रोजी आप्पांनी अर्नाळ्याला पाथरवट (दगडफोडे किंवा दगडाचे घडीव काम करणारे) पाठविले; पण किल्ल्याच्या बांधकामास चुन्याची गरज होती. ८० ते १२० टन चुना काढता येईल अशा चुन्याच्या भट्टीची व्यवस्था शंकराजीपंतांनी केली. अर्नाळा किल्ल्याच्या बांधकामासाठी कोळी, गवंडी, लोहार, सुतार इ. माणसे काम करीत होती. २० मार्च १७३८ रोजी मानाजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांची एक बोट पकडली होती. त्यामध्ये २८ तोफा होत्या. यांपैकी १० तोफा अर्नाळा येथे शत्रूपासून रक्षण करण्याकरिता द्याव्यात, अशी मागणी शंकराजीपंतांनी केली. चिमाजी आप्पांनी अर्नाळ्यात काम करणाऱ्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर धान्य पाठविण्याची सोयही केली. किल्ल्यातील कोठी व सदर बांधण्यासाठी पुणे व सुरत येथून सुतार मागविले. ऑक्टोबर १७३७ पासून जानेवारी १७३८ पर्यंत किल्ल्याचे तीन बुरूज बांधले होते. या बुरुजांची भैरव, भवानी आणि बावा अशी नावे आहेत. भैरव आणि भवानी बुरुजांची उंची २० फूट होती. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस पोर्तुगीजांच्या काळातील एक पडका बुरूज होता. त्याचा घेरा २३० फूट आणि उंची ३६ फूट होती. याच्या कामासाठी ८ फूट खोल पाया खणला होता. याची दुरुस्ती करून त्यात जंग्या (बाण व बंदुका यांसाठी बुरूज व तट यांना ठेवलेले भोक) बांधल्या गेल्या. तोफांचा मारा करण्यासाठी १६ खिडक्या ठेवल्या. या बुरुजाची दुरुस्ती झाल्यावर सर्व लोकांना परत किल्ल्यातील कामासाठी पाठविले. भैरव बुरुजापासून ५४० फूट अंतरावर वेताळ बुरुजाचे काम सुरू झाले. ३० मार्च १७३८ रोजी शंकराजीपंत अर्नाळ्यात आले आणि किल्ल्याच्या बांधकामाची प्रगती चिमाजी आप्पा यांना कळविली. अर्नाळ्याचे उरलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी चिमाजी आप्पा यांनी नानासाहेब पेशवे यांना पत्र लिहिले होते.

अशा प्रकारे अनेक अडचणींना तोंड देत पेशव्यांनी अर्नाळा बेटावर एक भक्कम किल्ला शंकराजीपंत फडके यांच्यामार्फत बांधून घेतला.

संदर्भ :

  • Scholberg, Henry, Fortress Portugal in India, 1995.
  • Kantak, M. R. The First Anglo-Maratha War, 1774 -1783 : A Military Study of Major Battles, Bombay, 1993.
  • सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, भाग : ३ आणि ४, नवीन आवृत्ती, पुणे, १९९०.
  • केळकर, यशवंत नरसिंह, वसईची मोहीम, पुणे, १९३९.
  • पारसनीस, द. ब. मराठ्यांचे आरमार, पुणे, १९०४,

समीक्षक – रमेश कांबळे