शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदुर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शविले जातात.
शत्रूला आपल्यापासून दूर ठेवणे आणि त्यापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी जगभरातील मानव जातीचा लढा पाषाण युगापासून आजपर्यंत विविध प्रकारे चालूच आहे. पाषाणयुगानंतर मानवाने याचे उत्तर शोधून त्याने उत्तर शोधून त्याने स्वत:ला मजबूत अडथळ्यामागे आणले. बांबू किंवा लाकडी कठड्यापासून सुरुवात करणारा माणूस हळूहळू दगडांच्या कडेला आश्रय घेऊ लागला. ही प्रक्रिया अचानक झालेली नसून कालानुरूप विकसित होत गेली. पाषाण युगातील मानव हा शिकार करण्यात आणि अन्न संकलनात व्यस्त होता. नैसर्गिक आपत्ती व वन्य प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे ही त्याची मूलभूत गरज होती. जंगली प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी मानवाने अग्नीचा उपयोग केला. संरक्षण मिळविण्यासाठी झाडे, खडक आणि लाकूड यांचा वापर करून कृत्रिम आश्रयस्थान तयार केले. पुढे नवाश्म युगामध्ये मनुष्य एके ठिकाणी स्थायिक झाला व पाळीव प्राणी आणि शेतील सुरुवात झाली. स्वत:च्या व इतरांच्या दरम्यान संरक्षणात्मक अडथळे निर्माण करण्यास सुरवात केली. हे अडथळे म्हणजे फक्त माती, लाकूड किंवा दगडांपासून बनवलेली भिंतीसदृश रचना होती. तटबंदीच्या उत्पत्तीची पाळेमुळे या स्वरूपाच्या बांधकामात दिसून येतात. यूरोपात नवाश्मयुगीन कालखंडात सर्वांत प्राचीन किल्ल्याचे, तटबंदी किंवा नगराच्या भिंतीचे अवशेष मिळाले आहेत. नवाश्मयुगीन कालखंडानंतर तटबंदी विकसित झालेल्या दिसतात. त्यानंतर तटबंदी विकसित होण्याचा वेग खूप जास्त होता. हडप्पा संस्कृतीपासून ताम्रपाषाणयुग, आरंभिक ऐतिहासिक, ऐतिहासिक, मध्ययुगीन आणि अखेरच्या मध्ययुगीन कालखंडांच्या टप्प्यांतून तटबंदी, बुरूज आणि दरवाजे अशी बांधकामे दिसू लागली.
किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आला आहे. ज्या काळी अनपेक्षित परचक्राची भीती असे, त्या काळी घरे, मंदिरे, नगरे इ. तटबंदी वा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती होती. शत्रूचा हल्ला आल्यास नागरिकांना त्वरित संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे व्हावे, म्हणून बहुतेक नगरे किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच वसवीत. नगराप्रमाणे कधी देशाच्या सीमेवरही तटबंदी करीत. चीनची भिंत हे त्याचेच प्रसिद्ध उदाहरण होय. किल्ल्यात पाणीपुरवठा, गुप्त खजिने, धान्यगुदामे, शस्त्रागारे, दारूची कोठारे, गुप्त मार्ग इत्यादींची अत्यंत चातुर्याने व काळजीपूर्वक आखणी करावी लागे. किल्ला अभेद्य रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक वगैरेंची रचना करीत. एवढेच नव्हे, तर युद्धप्रसंगी शस्त्रास्त्रे सहजसुलभतेने हाताळता यावीत म्हणूनही काही खास योजना आखण्यात येत.
प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा. किल्ल्यांच्या स्थानावरून आणि बांधणीच्या पद्धतीवरून अमिलाषितार्थचिंतामणी ह्या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर ह्याने किल्ल्यांचे नऊ प्रकार पाडलेले आहेत; ते म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग, अश्मदुर्ग, इष्टिकादुर्ग, मृत्तिकादुर्ग, वनदुर्ग, मरूदुर्ग, दारूदुर्ग व नरदुर्ग होत. ह्या प्रत्येकाची बांधणी काही एका विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत केलेली असे आणि किल्ल्यांसाठी स्थलसंशोधन करताना दुर्गमता व विपुल जलसंचय यांवर विशेष भर दिला जात असे. बहुतेक भुईकोट किल्ल्यांची रचना सपाट जमिनीवर किंवा कृत्रिम छोट्या पठारवजा टेकडीवर केलेली असते. किल्ल्यांचा आकार चौकोनी, गोलाकार, षट्कोनी किंवा अष्टकोनीही असतो. किल्ल्याभोवतीचा तट दगडविटा, चुना व माती यांचा वापर करून मजबूत केलेला असतो. काही ठिकाणी तटाबाहेर सभोवती खंदक खणून व त्यात पाणी खेळवून विषारी वनस्पती लावण्यात येते. कधी अल्प अंतरावर दोन किंवा तीन खंदकही असत. पुष्कळदा तटाच्या आतही आणखी एखादी साहाय्यक तटबंदी असे. गिरीदुर्गांच्या बांधकामामध्ये तुटलेल्या नैसर्गिक कड्याचा उपयोग किरकोळ बांधकाम करून तटासारखा करण्यात येई आणि बांधकामासाठी मुख्यत्वे दगडाचाच उपयोग अधिक करीत. हे दगड डोंगरावरच उपलब्ध असल्याने खर्च कमी होत असे. तीच गोष्ट जलदुर्गाच्या बाबतीत आढळते. मात्र जलदुर्गाचे तट अधिक रुंद व उंच असून अधिक मजबूत करण्यात येत. बहुधा सतत धडकणाऱ्या पाण्याच्या लाटांपासून किल्ल्याच्या तटांना तडा जाऊ नये, हा त्यामागील उद्देश असे. एकूण वरील प्रकारे किल्ल्यात पाण्याची टाकी, तलाव, तटबंदी, बुरूज, मेट, चिलखत (बुरुजामागील संरक्षक फळी-भिंत), पडकोट (बाहेरील भिंत), मनोरे ह्यांबरोबरच गढी, माची (संरक्षणाचा एक भाग, खलबतखाना (गुप्त गोष्टींची खोली), अंबारखाना (धान्य कोठार), सदर, बालेकिल्ला वगैरे महत्त्वाच्या वास्तू आणि घटक असत. किल्ल्यांच्या दरवाजांना व बुरुजांना किल्ल्याच्या बांधणीत अनन्यसाधारण महत्त्व असे. कारण संरक्षणाच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत.दरवाजे लाकडी व लोखंडी पट्ट्यांनी मजबूत केलेले असत व त्यांवर अणकुचीदार मेखा किंवा खिळे लावलेले असत. दरवाजे एक किंवा अधिक असत व शिवाय चोरदिंड्या किंवा दिंडी दरवाजे असत. आत आडणे (अडसर) असत. दरवाजांना दिशासूचक नावे दिलेली असत. शिवाय विघ्नहारक व यशदायक अशा सूर्य, चंद्र, गणपती इत्यादींच्या आकृती दरवाज्यांच्या गणेशपट्टीवर मध्यभागी बसविलेल्या असत. खेरीज विहिरी, बाजारपेठ, राहण्याची घरे, राजवाडा, मंदिर, सभागृह, तुरुंग इ. लहानमोठ्या वास्तू असत. किल्ल्याच्या बांधणीत चुना, दगड, वीट, माती, लोखंड व लाकूड ह्यांचा सर्रास वापर केलेला दिसतो. दरवाजासाठी आणि इतर बांधकामात लाकडाचा उपयोग करीत. बाण व बंदुका यांसाठी बुरूज व तट छिद्रे ठेऊन तयार करीत. या छिद्रांना जंग्या आणि चर्या म्हणत. जंग्यामध्ये बंदुका व तोफा खोचून शत्रूवर मारा केला जाई. धनुष्यबाणाचा मारा चर्यामधून केला जाई. बुरुजांना देखील नावे दिली जात. गिरिदुर्गाच्या बांधणीत दगडाचाच उपयोग अधिक दिसतो. एकंदरीत बदलत्या कालमानाप्रमाणे आणि शस्त्रास्त्रांतील सुधारणांबरोबर किल्ल्यांचे स्वरूप बदलून ते सचिवालय, राजवाडे, करमणुकीची पटांगणे आणि क्रीडांगणे, अतिथिगृहे, बागा, प्रेक्षागृहे, हमामखाने अशा विविध सुखसोयींनी सज्ज करण्यात आले.
किल्ल्यांची बांधणी जगात प्रथम केव्हा सुरू झाली, ह्याचा इतिहास ज्ञात नाही. ईजिप्शियन संस्कृतीच्या (३५०० ते ६०० इ. स. पू.) काळात राजवाडे तटबंदीने, बुरुजांनी व त्याभोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले असत. बाराव्या राजवंशाच्या वेळी (२०००—१७८६ इ. स. पू.) सेम्ना हा किल्ला बांधण्यात आला. तीच परंपरा पुढे चालू राहिली. ॲसिरियात (इ. स. पू. आठवे-सातवे शतक) तर शहरांना तटबंदी करीत. खोर्साबाद हे त्यातील प्रसिद्ध शहर होय. बॅबिलोनियातही (१८००—५०० इ. स. पू.) ह्याच पद्धतीने तटबंदी करून शहरे बसविली जात. ग्रीकांचा (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक) टायरिन्झ हा बालेकिल्ला, तसेच अक्रॉपलिस हा अथेन्समधील किल्ला प्रसिद्ध आहे. पुढे रोमन काळात किल्ल्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले व राजवाडे म्हणजे लहानमोठे भुईकोट किल्लेच तयार होऊ लागले. यूरोपमधील बहुतेक किल्ल्यांच्या बांधणीत ग्रीको-रोमन तसेच गॉथिक वास्तुशैली मुख्यत्वे आढळते. यूरोपात १००० ते १५०० या कालखंडात किल्ल्यांचे प्रमाण वाढले; ते नॉर्मनांच्याच प्रोत्साहनामुळे झाले. शिवाय ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरंजामशाही व धर्मयुद्धे. त्यामुळे हेडिंगहॅम, कोल्चेस्टर, पेम्ब्रोक, डील, केनिलवर्थ, कॉन्वे,ॲरंडल, डोव्हर, एडिनबर, विंझर (इंग्लंड), कूसी-ल-शातो, दे शाँबॉर (फ्रान्स), ब्रॉनफेल्स (जर्मनी), म्युरेन (नेदर्लंड्स), सांत आंजीलो (इटली), आल्काथार (स्पेन), रूमेली हिस्सार (तुर्कस्तान), क्रॅक डेस शिव्हॅलिअर्स (सिरिया), कौंतस ऑफ फ्लेंडर्स (बेल्जियम), कल्मार (स्वीडन) ह्यांसारखे प्रसिद्ध किल्ले ह्या युगात बांधले गेले. ह्यांतच पुढे काही सुधारणा करण्यात आल्या आणि आयलिन डोनान, ॲरंडल, ब्लार्ना, कर्नारव्हन, गेलर्ड वगैरे काही किल्ले; तसेच मेझन्स, लाफीत, शनाझो, आझे-ल-रिदो वगैरे प्रबोधनकाळातील किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली. पहिल्या महायुद्धात काही किल्ले जमीनदोस्त झाले. अद्यापि ह्यांतील अनेक किल्ल्यांचे अवशेष पहावयास सापडतात. रशियातील क्रेमलिन हे अशा बालेकिल्ल्यांचे उदाहरण म्हणावे लागेल.
किल्ल्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्मयात आढळतो. ऋग्वेद, मनुस्मृति, कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारत (शांतिपर्व), पुराणे ह्यांसारख्या ग्रंथांतून दुर्ग, त्यांचे प्रकार आणि महत्त्व ह्यांचे विवेचन आढळते. प्राचीन भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात हडप्पा ह्या शहरास तटबंदी होती व शहराच्या मध्यभागी बालेकिल्ला बांधला होता, असे तेथील अवशेषांवरून दिसते. पुढे वेदकाळात, तसेच ब्राह्मणकाळात शहरांभोवती तटबंदी उभारून सभोवती खंदकांची योजना केली जात असे. ऋग्वेदात ह्याचा ‘पुरʼह्या शब्दाने उल्लेख केलेला आढळतो. ऐतरेय ब्राह्मणात अनेक किल्ल्यांचा उल्लेख असून तीन अग्नी हे तीन किल्ले असून असुरांपासून यज्ञाचे संरक्षण करीत आहेत, असे वर्णन केले आहे.मौर्यकाळात कौटिलीय अर्थशास्त्रातील किल्ल्यांच्या स्थापत्यविषयक वर्णनावरून असे दिसते, की किल्ल्यांची बांधणी एका विशिष्ट पद्धतीने करण्यात येई. पाटलिपुत्र शहराच्या अवशेषांवरून असे दिसते, की त्याभोवती खंदक होता आणि त्याची तटबंदी भक्कम असावी. गुप्त, वाकाटक, राष्ट्रकूट ह्यांच्या काळात किल्ल्यांस विशेष महत्त्व आलेले नसले, तरी त्यांचे राजवाडे व शहरे तटबंदीने युक्त असत. मुसलमानपूर्व काळात चालुक्य, शिलाहार, यादव ह्या वंशांच्या वेळी गिरिदुर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले. एकूण किल्ल्यांपैकी ह्या काळात बांधलेले किल्ले–त्यांचे मूळ स्वरूप आज दिसत नसले तरी–संख्येने सर्वाधिक भरतील. देवगिरी (दौलताबाद), साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, अंजनेरी, मार्कंडा, त्रिंबक, रांगणा, पावनगड, पन्हाळा, विशाळगड हे मुसलमानपूर्वकाळातील किल्ले होत. पुढे मुसलमान काळात अनेक किल्ले बांधण्यात आले.दिल्लीचा लाल किल्ला, आग्रा किल्ला, अहमदनगरचा किल्ला, विजापूरचा किल्ला, बंगलोरचा किल्ला ही तत्कालीन भुईकोट किल्ल्यांची प्रसिद्ध उदाहरणे होत. तत्कालीन राजपुतांनी चितोड, आंबेर, जोधपूर, ग्वाल्हेर इ. डोंगरी किल्ले बांधले. सतराव्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले आणि काही जुने किल्ले डागडुजी करून इमारती, तळी, तटबंदी यांची योजना करून लढाऊ बनविले. राजगड, रायगड, पुरंदर, तोरणा, विशाळगड, पन्हाळा, प्रतापगड इ. डोंगरी किल्ले व सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग, अर्नाळा, कुलाबा, जंजिरा, पद्मदुर्ग, जयगड इ. जलदुर्ग होत. पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचीच डागडुजी करण्यात आली. मात्र ह्यावेळी यूरोपीय वसाहतवाद्यांनी भारताच्या भूमीवर पाय रोवले होते. त्यांनी स्वसंरक्षणासाठी फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड, आग्वाद त्रांकेबार वगैरे किल्ले बांधले. ह्या काळात गोवळकोंडा, त्रिचनापल्ली, पेनुगोंडे, चंद्रगिरी येथील किल्ल्यांनाही महत्त्व प्राप्त झाले.
वरील काळात राजधानीच्या शहराव्यतिरिक्त जहागीरदार-वतनदारांच्या गावात, त्या त्या वतनदारांनी बांधलेल्या गढ्या या किल्ल्यांच्या छोट्या प्रतिमाच होत. भारतातील किल्ल्यांच्या बांधणीत नॉर्मंडी येथे बांधलेल्या किल्ल्यांच्या रचनेची तसेच सॅरसेनिक वास्तुशैलीची छाप आढळते व तीच पुढे महाराष्ट्रातील किल्ल्यांवर पडलेली दिसते.
विसाव्या शतकात शस्त्रास्त्रांच्या व वाहनांच्या आधुनिकीकरणाबरोबर किल्ल्यांचे महत्त्व संपुष्टात आले. दुसऱ्या जागतिक महायुद्धात १९३८ मध्ये जर्मनीने सिगफ्रीड लाइन व फ्रान्सने मॅझिनो लाइन ह्यांसारख्या अवाढव्य तटबंद्या बांधल्या. सांप्रतरणगाडे, अणुबाँब ह्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून तळघरात किल्ले बांधले जाण्याची शक्यता आहे.
संदर्भ :
- Toy, Sidney, The Castles of Great Britain, London, 1953.
- Toy, Sidney, The Fortified Cities of India, London, 1965.
- Tuusle, Armin, Castles of the Western World, London, 1959.
- खरे, ग. ह. स्वराज्यातील तीन दुर्ग, मुंबई, १९६७.
- गोगटे, चिं. गं. महाराष्ट्र देशांतील किल्ले, भाग १ व २, पुणे, १९०७.
- बेंद्रे, वा. सी. गड-कोट-दुर्ग, मुंबई, १९६५.
समीक्षक – सचिन जोशी