ताड (बोरॅसस फ्लॅबेलिफर)

नीरा या पेयासाठी आणि ताडगोळा या फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. ताड हा वृक्ष अ‍ॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसस फ्लॅबेलिफर आहे. शिंदी, खजूर, माड (नारळ) या वनस्पतींही अ‍ॅरॅकेसी कुलातील आहेत. ताड हा दूरवरून नारळासारखा दिसतो. तो मूळचा दक्षिण आशियातील असून इंडोनेशिया ते पाकिस्तान या देशांत आढळतो. भारतात पश्चिम बंगाल व बिहार या राज्यांत ताड मोठ्या प्रमाणात असून इतर राज्यांतही तो आढळतो. महाराष्ट्र राज्यात ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत ताडाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात त्याला ताडगोळा वृक्ष असेही म्हणतात.

ताड हा वृक्ष सु. ३० मी. उंच वाढतो. खोडाचा घेर तळाशी सु. २ मी. असून ते राखाडी व दंडगोलाकार असते. खोड मध्यभागी किंचित फुगीर असते. खोडाच्या जमिनीलगत असलेली अनेक फुगीर मुळे खोडाला घट्ट धरून ठेवतात. खोड लहानपणी वाळलेल्या पानांनी आच्छादलेले असते, तर मोठेपणी त्यावर पडून गेलेल्या पानांचे वण (किण) दिसतात. सुरुवातीला ताडाची वाढ सावकाश होते, तर वय झाल्यावर ते भरभर वाढते. खोडाच्या टोकाला ३० ते ४० पानांचा झुबका असतो. पाने एकाआड एक, विभाजित व पंख्याच्या आकाराची असून पाते अर्धवर्तुळाकार, १–१.५ मी. रुंद, चिवट, चकचकीत व थोडेसे विभागलेले असते. पानांचे देठ लांब, दणकट, ६–१२ सेंमी. लांब असून त्यांच्या कडांवर काटे असतात. पानांची कळी उमलण्यापूर्वी पात्यास चुण्या पडून ते कळीत सामावलेले असते. फुलोरे दोन प्रकारांचे असून ते दोन वेगवेगळ्या झाडांवर येतात. त्यांना स्थूलकणिश म्हणतात. कणिश मोठे व शाखित असून अनेक छदांनी वेढलेले असते. त्यावर लहान, गुलाबी किंवा पिवळी व असंख्य नर-फुले असतात. मादी-फुले मोठी, हिरवी आणि अनेक शाखीय स्थूलकणिशावर येतात. फळ आठळीयुक्त, मोठे, गोल, करड्या व पिवळ्या रंगाचे असून त्यांत एक ते तीन बिया असतात. भ्रूणपोष पांढरा व मऊ असून मध्ये पोकळी असते. कच्च्या बियांना ताडगोळे म्हणतात. त्यातील भ्रूणपोष लोक आवडीने खातात. त्यापासून थंडावा मिळतो.

ताडगोळा फळे व त्यातील भ्रूणपोष

ताड महत्त्वाचा आणि उपयुक्त वृक्ष आहे. त्यापासून शर्करायुक्त रस जमा करतात. त्याला शुगर पाम असेही म्हणतात. फुलोरे छदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून बाहेर पडणारा गोड रस मडक्यात जमा करतात. या ताज्या रसाला ‘नीरा’ म्हणतात. नीरा काही काळ आंबल्यानंतर त्याची ताडी बनते. ताडी एक मादक पेय आहे. ताजा रस (नीरा) उकळून त्यापासून गूळ आणि इतर गोड पदार्थ बनवितात. ताडीच्या ऊर्ध्वपातनापासून मिळविलेल्या दारूस ‘अर्राक’ म्हणतात. ताडीपासून कमी प्रतीचा व्हिनेगर (शिर्का) तयार करतात.

ताडाचे खोड खांब, वासे व फळ्या बनविण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी मऊ खोड पोखरून व नळीसारखे करून पाणी वाहून नेण्यासाठी वापरतात. पाने व खोडापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग झाडू, कुंचले, दोर, पायपोस बनविण्यासाठी करतात. ताडगोळे शामक व पौष्टिक असतात. नीरा उत्तेजक, थंड, मूत्रल आणि ‘’जीवनसत्त्वयुक्त पेय म्हणून प्रसिद्ध आहे.