गिंडे, कृष्णराव गुंडोपंत (के. जी.) : (२६ डिसेंबर १९२५ – १३ जुलै १९९४). भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रातील भातखंडे परंपरेतील एक निष्ठावंत गायक, संगीतज्ञ व संगीत रचनाकार. ते ‘सुजनसुत’ म्हणूनही परिचित होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात बैलहोंगळ या गावी एका मध्यमवर्गीय संगीत व नाटक प्रेमी कुटुंबात झाला. गिंडे कुटुंबातील हे आठवे अपत्य. त्यांच्या आईचे नाव राधाबाई. कृष्णरावांचे वडील गुंडोपंत यांनी शिष्यवृत्तीवर शालेय शिक्षण बेळगावात पूर्ण करून एल.सी.पी.एस. ही वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली होती.

कृष्णरावांवर बालपणापासूनच संगीताचे संस्कार झाले होते. त्यांचे सर्वांत वडीलबंधू रामचंद्र हे दिलरूबा वाजवीत असत. त्यांनी कृष्णरावांना गायक बनविण्याच्या दृष्टीने त्यांचे मन नाट्यसंगीतात गुंतवले होते. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षांपासून कृष्णराव उत्तम नकला करीत असत. त्यांचे बालपणीचे समानशील मित्र कुमार गंधर्व होत. कृष्णरावांचे प्राथमिक शालेय शिक्षण बैलहोंगल व बेळगाव येथे कन्नड भाषेत झाले. पुढे मराठी चौथी व इंग्रजी पहिलीचे शिक्षण गदग येथे झाले. १९३४-३५ च्या दरम्यान रामचंद्रांनी पं. विष्णु नारायण भातखंडे यांची भेट घेऊन कृष्णरावांना गाणे शिकवण्याची विनंती केली; परंतु भातखंडे यांनी त्यांना आपले शिष्य श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. त्यावेळी रातंजनकर तत्कालीन मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्तानी म्युझिकचे (स्थापना १९२६ – सध्याचे, भातखंडे संस्थान सम-विश्वविद्यालय) प्राचार्य होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते मुंबईत आले असता त्यांनी कृष्णरावांची कसून चाचणी घेतली व त्यांना शिकविण्यास मान्यता दिली आणि त्यांना आपल्याबरोबर लखनौ येथे घेऊन गेले (जुलै १९३६). तेथे कृष्णरावांचे गुरुकुल पद्धतीने संगीताचे शिक्षण चालू असतानाच तेथील सेंटिनल हायस्कूलमध्ये उच्च-माध्यमिक शिक्षणही चालू होते. ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले व त्याचवर्षी ‘संगीत विशारद’ ही परीक्षाही भातखंडे संगीत महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले (१९४२). पुढे लखनौ येथे क्रिश्चन कॉलेजमधून इण्टरमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याचवर्षी ‘संगीत निपुण’ (मास्टर इन म्युझिक) या परीक्षेत सुवर्णपदकही मिळविले.

मॉरिस कॉलेजमध्ये रातंजनकरांचे ज्येष्ठ शिष्य एस. सी. आर. भट व चिदानंद नगरकरही संगीताचे शिक्षण घेत होते. भट यांना शिक्षणाबरोबर प्रथम व द्वितीय वर्षांचे वर्ग घेण्यास रातंजनकरांनी सांगितले होते. त्यांनी कृष्णरावांकडून शिस्तबद्ध रियाज करून घेतला व प्रत्येक चीज/बंदिशी रागांग, तालांग व काव्यांगाच्या दृष्टिकोनातून सौंदर्यात्मक सादरीकरण करण्यासाठी घोटून घेतल्या. त्या काळात रातंजनकरांना भेटण्यास येणाऱ्या गायक/वादक कलाकारांबरोबरच्या संगीतावरील चर्चा गिंडे यांना ऐकायला मिळाल्या व तिथे होणाऱ्या मैफलींमध्ये गुरू फैयाजखाँपासून सर्व घराण्यांच्या गायकांचे/वादकांचे कार्यक्रम ऐकण्याची व गरज असल्यास तंबोऱ्यावर साथ करण्याची संधी त्यांना मिळत असे. त्यामुळे सर्वप्रकारे संगीताचे उत्तम शिक्षण त्यांना १९३६ पासून १९५१ पर्यंत मिळाले आणि रातंजनकरांसारख्या ज्ञानपीठाची अखंड संगत, सोबत व सहवास त्यांना लाभला. लखनौ येथील वास्तव्यात गोविंद नारायण नातू ( राजाभैय्या पूँछवाले यांचे पट्टशिष्य) यांचेही मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

संगीताचे शिक्षण पूर्ण करून गिंडे मुंबईस परतले (१९५१). या सुमारास के. एम. मुन्शी यांनी आचार्य रातंजनकरांच्या मदतीने ‘भारतीय विद्या भवन’मध्ये संगीत शिक्षापीठाची स्थापना केली होती (१९४६). या विद्यालयात फेब्रुवारी १९५२ मध्ये अध्यापक म्हणून गिंडेंची नियुक्ती झाली. मुंबईत अंधेरीतील ‘ज्ञानाश्रम’ या मिशनरी शैक्षणिक संस्थेत संगीताचे वर्ग घेण्याकरिता आणि कार्यशाळा चालविण्यास तज्ञ संगीतकाराची आवश्यकता होती. तेथे गिंडे संगीताचे वर्ग घेऊ लागले आणि त्यानिमित्ताने संस्थेचे प्राचार्य फादर प्रॉक्ष व गिंडे यांचे घनिष्ट संबंध जुळले. फादर प्रॉक्ष यांच्या आमंत्रणावरून जागतिक यूखॅरिस्टिक काँग्रेसच्या सोहळ्यात भाग घेण्यासाठी पश्चिम जर्मनी व इटली-रोम येथे गिंडेंनी भेट दिली (१९६०). या कार्यक्रमाकरिता त्यांनी बायबलमधील कथांवर हिंदुस्तानी राग-संगीतावर आधारित बॅलेच्या (समूह नृत्य-गीतांच्या) रचना केल्या. रोममध्ये ख्रिस्ती धर्मगुरू पोप जॉन पॉल (दुसरे) व कार्डिनल ग्रेशस यांच्यासमोर आणि जर्मनीतील यूखरिस्टिक काँग्रेसच्या सोहळ्यात या बॅलेचे सादरीकरण झाले. त्याबद्दल पदक देऊन पोपने त्यांचा विशेष सन्मान केला. भारतात परतल्यावर ते विद्याभवनातील अध्ययनाबरोबर ज्ञानाश्रममध्येही संगीताचे वर्ग घेत असत.

मुंबईतील श्रीवल्लभ संगीतालयात गिंडेंनी प्राचार्यपद स्वीकारले (१९६१). तेथे १९९२ पर्यंत उल्लेखनीय सांगीतिक कामगिरी करून विद्यालयाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली.  भातखंडे परंपरेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना विद्यादान केले. या शिष्यांमध्ये इंदूधर निरोडी, सुधिंद्र भौमिक, मीरा भागवत, सुनिती गंगोळी, लीला कुलकर्णी-नरवणे, स्वामी श्रीचैतन्यस्वरूपदास, यशवंत महाले यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक-कलाकार सुमती मुटाटकर, सी. आर. व्यास, जितेंद्र अभिषेकी, प्रभा अत्रे व शुभ्रा गुहा (कोलकाता) आदी सुप्रसिद्ध गायकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. अखेरच्या पाच वर्षांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमीतही ते कार्यरत होते.

गिंडे यांनी अनेक संगीत संस्थांतून आणि चर्चासत्रे यांतून संगीत विषयावर तीनशेहून अधिक सप्रयोग व्याख्याने दिली. तसेच संगीतविषयक नियतकालिकांमधून हिंदी व इंग्रजी भाषांमधून लेख लिहिले; विभिन्न रागांत व तालांत धृपद-धमार, ख्याल व तराणे रचले. त्यांना दोन हजारांपेक्षा अधिक बंदिशी मुखोद्गत होत्या. त्यांत विभिन्न रागांतील अनेक विलंबित-द्रुत ख्याल, धृपदे, धमार, ठुमऱ्या, टप्पे, तराणे, चतुरंग, अष्टपदी, झुले इत्यादींचा समावेश होता. त्यांनी रातंजनकरांच्या ८०० बंदिशी ‘एकाच वळणाच्या अक्षरांत’ लिहून त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. सुजनसुतमंजरी या नावाने गिंडे यांच्या ३० बंदिशींचा संग्रह प्रकाशित झाला आहे.

त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांमध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ‘जायंट इंटरनॅशनल’ चा पुरस्कार  (१९८८) तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९०) व महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार यांचा समावेश होतो.

कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

गिंडे यांनी परंपरेने मिळालेली विद्या जिवापाड जोपासली आणि कोणत्याही प्रकारची तडजोड न करता गायकीची शिस्त राखून परंपरेचे प्रतिनिधित्व शेवटपर्यंत केले. प्रगल्भ ग्रहणशक्तीमुळे गायकीचा प्रत्यक्षाविष्कार, लय-तालाची सौंदर्यात्मक चौकट, बंदिशींतील लालित्यपूर्ण शब्दोच्चार, स्थायी अंतऱ्याची डौलदार मांडणी यामुळे केवळ रसिकच नव्हे तर श्रोतृवर्गात बसलेले गुणी गायकसुद्धा त्यांच्या अभिजात कलावैभवाची साक्ष पटून अंतर्मुख होत असत.

https://www.youtube.com/watch?v=3jRprD3FC_k

समीक्षक – सु. र. देशपांडे

 

#विष्णु नारायण भातखंडे #एस.सी.आर. भट#श्रीकृष्ण नारायण रातंजनकर#कुमार गंधर्व