पेतँ, आंरी फिलिप : (२४ एप्रिल १८५६ – २३ जुलै १९५१). फ्रान्सचा एक सेनानी व मुत्सद्दी. त्याचा जन्म शेतकरी कुटुंबात कोशी-अ-ला-तूर येथे झाला. तो सेंट-सीर या लष्करी अकादमीतून पदवीधर झाला (१८७८). त्याची एकोल-द-गेर्रे या लष्करी अकादमीत निदेशक म्हणून नियुक्ती झाली. पहिल्या महायुद्धापर्यंत त्याने लष्करातील विविध पदांवर काम केले. पहिल्या महायुद्धाने त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याला ब्रिगेडियर जनरल म्हणून पदोन्नती मिळाली (३१ ऑगस्ट १९१४). त्याने मार्नच्या युद्धात विशेष कौशल्य दाखविले. फ्रान्सच्या एका सेनाविभागाचा प्रमुख या नात्याने पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस त्याने चांगली कामगिरी केली. साहजिकच त्याच्याकडे सेनापतिपद आले. त्याने शर्थ करू जर्मन आक्रमणापासून व्हर्डनचे संरक्षण केले. या विजयासाठी असंख्य फ्रेंच सैनिक मृत्युमुखी पडले; तरी ‘दे शॅल नॉट पास’ हे त्याचे घोषवाक्य इतिहासात अजरामर झाले. नंतर त्याला सरसेनापतिपद व पुढे मार्शल हा किताब मिळाला (२१ नोव्हेंबर १९१८). पेतँने आवश्यक त्या सुधारणा करून फ्रेंच सैनिकांना बंडापासून परावृत्त केले. मित्र राष्ट्रांनी जी जर्मनीवर प्रतिचढाई केली, तिच्या आखणीत आणि कार्यवाहीत पेतँचा सिंहाचा वाटा होता.
पुढे त्याची युद्धमंडळाचा उपाध्यक्ष (१९२०–३०), युद्धमंत्री (१९३४), स्पेनमधील फ्रान्सचा राजदूत (१९३९-४०) इ. पदांवर नियुक्ती झाली. दोन महायुद्धांमधील काळात फ्रान्सचा प्रमुख लष्करी सल्लागार तोच होता. या काळात फ्रान्सने स्वसंरक्षणार्थ मॅजिनो तटबंदी बांधली, लष्करी आक्रमणास आधुनिक काळात हिचा फारसा उपयोग नाही, असे द गॉल, पॉल रेनो यांसारख्या लष्करी सेनानी-मुत्सद्द्यांनी पेतँस बजावले. जर्मनीच्या प्रचंड हवाईदलाबरोबर तसेच रणगाड्यांसमोर मुकाबला करण्यासाठी फ्रान्सजवळ आधुनिक शस्त्रास्त्रे व विमानविरोधी तोफा यांचा साठा असणे आवश्यक आहे, हीही गोष्ट पेतँच्या निदर्शनास आणली; पण पेतँने त्याकडे दुर्लक्ष केले, असा त्यांचा दावा होता.
दुसऱ्या महायुद्धकाळात पेतँकडे मुख्यमंत्रिपद आले (१९४०–४४). या सुमारास जर्मनीच्या फौजा फ्रान्समध्ये घुसल्या होत्या. फ्रान्सचे शासन व्हिशी येथे हलविण्यात आले आणि पेतँने शरणागती पतकरली व जर्मनीशी शस्त्रसंधी घडवून आणला (२२ जून १९४०). जर्मनीने फ्रान्सवर अनेक बंधने लादली. जर्मनीला इंग्लंडवर विजय मिळविता येईना, त्या वेळी हिटरलरने रशियावर स्वारी केली. त्याने फ्रान्सकडे सैनिक व युद्धसामग्री यांची मागणी केली; तथापि पेतँ निमूटपणे हे सर्व सहन करीत हिटलरशी संधान बांधून राहण्याचा प्रयत्न करीत होता. दोस्त सैन्याने फ्रान्समध्ये शिरकाव करताच पेतँ पळून गेला; त्याला प्रथम जर्मनांनी कैद केली व पुढे तो फ्रान्समध्ये स्वखुशीने आला (१९४५). फ्रान्सच्या हंगामी सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप लादून खटला भरला आणि त्यास फाशीची शिक्षा दिली. तिचे रूपांतर पुढे जन्मठेपेत होऊन पॉर झ्वींव्हील ईलद्यू या तुरुंगात त्यास ठेवण्यात आले. तिथेच तो मरण पावला.
पेतँ ही आधुनिक फ्रान्सच्या इतिहासातील एक विवाद्य व्यक्ती होय. त्याची वृत्ती प्रथमपासूनच लोकशाहीविरोधी होती. सर्व सत्ता एखाद्या हुकूमशाहाच्या हातात केंद्रित करावी, या विचारसरणीतूनच त्याचा हिटलर संबंधीचा अनुकूल दृष्टिकोन तयार झाला आणि त्याने घटना तयार करणे लांबणीवर टाकले. त्याची फ्रान्सला युद्धापासून अलिप्त ठेवण्याची इच्छा होती, असे काही इतिहासकारांचे मत आहे. तसेच दुसऱ्या महायुद्धकाळातील सर्वच घटनांना तो जबाबदार नव्हता व त्याची संमतीही नव्हती. म्हातारपण आणि शरीराचा दुबळेपणा यांचा गैरफायदा घेऊन त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याच म्हणून काही योजना फैलावल्या, असेही काहींचे म्हणणे होते. त्यामुळे इतिहासकारांना अद्यापि त्याच्या कार्याचे वस्तुस्थितिदर्शक मूल्यमापन करता आले नाही, असे काहींचे म्हणणे आहे.
संदर्भ :
- Griffiths, Richard, Petain: A Biography of Marshal Philippe Petain of Vichy, New York, 1972.
- Huddleston, Sisley, Petain: Patriot or Traitor, London, 1951.
- Ryan, Stephen, Petain the Soldier, New York, 1969.