नमाज म्हणजे इस्लामची उपासनापद्धती. कुणी याला ‘नमाज’ म्हणतात, तर कुणी ‘सलात’ म्हणतात. कारण दोन्ही शब्द समानार्थी आहेत. फरक इतकाच आहे की, सलात हा शब्द अरबी भाषेतील आहे, तर नमाज पर्शियन भाषेतील आहे. इस्लामी धर्मश्रद्धेचे पाच महत्त्वाचे घटक आहेत. त्याला इस्लामचे पाच स्तंभ म्हणतात (Five Pillars of Islam). अल्लाहशिवाय कोणीच उपास्य नाही आणि मुहंमद पैगंबर हे अल्लाहचे प्रेषित आणि दास आहेत, अशी ग्वाही देणे; पाच वेळची रोजची नमाज; दानधर्म (जकात); रमजान महिन्यातील रोजे (उपवास) आणि शक्य असेल त्याने मक्केची तीर्थयात्रा करणे, असे हे पाच स्तंभ आहेत. त्यांपैकी नमाज हा एक महत्त्वाचा घटक आहे.
‘नियमित नमाज अदा करा. सूर्य मावळल्यापासून रात्रीचा काळोख पडेपर्यंत निर्धारित वेळेवर नमाज पढा. तसेच पहाटेच्या वेळेस नमाजीमध्ये कुराण-पठण करण्याविषयी विशेष काळजी घ्या; कारण त्या वेळेस देवदूत तुमचे साक्षीदार म्हणून उपस्थित असतात’, अशा शब्दांत कुराणात नमाजाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. [कुराण अध्याय‒१७‒४८. शिवाय २.१०, २.१७७, ११.११४, १७.७, ७८.१३ अशा अनेक श्लोकांतून (आयतींतून) नमाजविषयीचे संदर्भ आले आहेत].
उगम आणि विकास : मक्का आणि जवळजवळ सर्व अरेबियातील सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय आणि न्यायिक क्रांतिकार्य मक्केच्या विजयानंतर पूर्ण झाले होते. त्यामुळे मुहंमद पैगंबर आणि त्यांच्या अनुयायांनी नव्या धर्मातील इतर काही महत्त्वाच्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले. खाली नमूद केलेल्या काही गोष्टी यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
- नमाजीचे संस्थात्मक स्वरूप.
- तिची दिशानिश्चिती.
- नमाज अदा करण्यासाठी किंवा पढण्यासाठी आवश्यक असलेली इमारत (जिला काळाच्या ओघात मशीद किंवा मस्जिद असे नामाभिधान प्राप्त झाले).
इस्लाममध्ये नमाजचे स्वरूप प्राधान्याने सामूहिक असल्यामुळे त्याची जाणीव ठेवूनच मशिदीचे स्थापत्य आणि वास्तुशास्त्रीय स्वरूप काळाच्या ओघात निश्चित होत गेले. इतकेच नव्हे, तर वास्तुशिल्पाचे नमुने म्हणून अनेक देशांतील मशिदी आपल्या सौंदर्याची साक्ष देत अजूनही उभ्या आहेत. या खासियतीमुळेच मशिदीच्या अंतर्भागात चौकोनी किंवा आयताकृती सभागृहाला अग्रस्थान प्राप्त झाले.
मशिदीच्या अंतर्भागातील स्थापत्यवैशिष्ट्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. मशिदीच्या चार भिंतींपैकी पश्चिमेकडच्या भिंतीच्या मध्यभागी साधारण तीन फूट रुंद, सहा फूट उंच व दोन फूट खोल अर्धवर्तुळाकार पोकळी असलेले बांधकाम असते. त्याला ‘कुब्बा’ म्हणतात. त्यासमोर इमाम उभे राहून नमाजीचे नेतृत्व करत असतात. समोरच्या अर्धवर्तुळाकार पोकळीत इमामांचे मंत्रोच्चार परावर्तित होऊन मागे जातात व त्यामुळे ते इमामांच्या मागे उभे असलेल्या सर्व नमाजींना ऐकू येतात.
मशिदींच्या बांधकामात पूर्वी ध्वनिवर्धकाअभावी आवाजपरिवर्तनाकरिता म्हणून जी गोलाकार रचना केली जात असे, ती आता कालबाह्य होत आहे आणि दुसरे असे की, वर नमूद केल्याप्रमाणे नमाजीचे संस्थापक स्वरूप आणि दिशानिश्चिती कायम असली, तरी नमाज अदा करण्यासाठी मशिदीची आवश्यकता ही ख्रिस्ती आणि यहुदी धर्मीयांसाठी, अनुक्रमे चर्च आणि सिनॅगॉग यांसारखी अनिवार्य नाही. नमाज ही कोणत्याही खुल्या-मोकळ्या जागेत, समुद्री जहाजात, हवेत असलेल्या विमानात, शेतात अदा केली जाऊ शकते.
प्रेषित मुहंमदांच्या विशेष बाबींपैकी एक ही की, ते फक्त आपल्या अरब प्रदेशातील लोकांच्या मार्गदर्शनाकरिता म्हणून पाठविले गेले नव्हते, तर संपूर्ण मानवजातीच्या मार्गदर्शनाकरिता अंतिम प्रेषित म्हणून पाठविले गेले आणि दुसरी महत्त्वाची बाब ही की, त्यांच्याकरिता संपूर्ण पृथ्वीला ‘मस्जिद’ ठरविण्यात आले. ही बाब आपण समजून घेणे आवश्यक आहे. इस्लामी शिकवणीनुसार नमाज सामुदायिकपणे एकत्रित अदा करण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. विशेषेकरून आठवड्यात एकदा ‘जुमअ’ची नमाज (शुक्रवारी दुपारी जोहरऐवजी) सामुदायिकपणे एकत्रित अदा करणे सक्तीचे केले गेले आहे. मुस्लिमांमध्ये समभाव, एकोपा व समानता निर्माण करणारी ही बाब आहे. ती मुस्लिमांना एकवटून त्यांचा मजबूत संघ निर्माण करते. ते सर्व मिळून एकत्रितपणे एकाच ईश्वराची उपासना करतात, एकत्रितपणे उठत व बसत असतात, तेव्हा त्यांची मने आपोआपच परस्परांशी जुळत असतात आणि आपण सर्व बंधू आहोत, ही जाणीव त्यांच्या मनात निर्माण होते. यामुळे त्यांच्यात एकाच नेत्याचे आज्ञापालन करण्याची प्रवृत्ती वाढत असते व ती त्यांना शिस्तबद्ध करत असते. यामुळेच त्यांच्यात आपापसांबद्दल सहानुभूती निर्माण होते. तसेच त्यांच्यात समानता व एकात्मता निर्माण होते. श्रीमंत व गरीब, लहान आणि मोठा, उच्चपदाधिकारी आणि कनिष्ठ दर्जाचा शिपाई हे सर्व नमाजीत एकत्र उभे राहतात. त्यांच्यात कोणी नीच नसतो आणि कोणी मोठा नसतो. ही उपासना सामुदायिक स्वरूपाची असल्याने लोकांना जोडण्याचे, ऐक्यनिर्मितीचे आणि एकोपा वाढीस नेण्याचे काम करते.
नमाजीचा विधी : नमाजीच्या विहित विधींमध्ये काही विधी निश्चित क्रमानुसार करणे अनिवार्य असते. या विधींशी प्रत्यक्ष संबंध नसला, तरी अजान किंवा बांग हाही नमाजीच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग असतो. रोजची पाच वेळची नमाज नियोजित वेळी अदा करायची असल्यामुळे व त्या काळी सार्वत्रिक संपर्काची अद्ययावत साधने अस्तित्वात नसल्यामुळे बांगीने (मुअज्जन) मशिदीच्या मनोऱ्यावरून किंवा उंच जागेवरून अजान देऊन त्यामार्गे सर्वांना नमाजीच्या नियत वेळेची सूचना देण्याची पद्धत रूढ झाली.
१. वजू : नमाजीला जाण्यापूर्वी शुचिर्भूत (पवित्र) होणे आवश्यक असते. वजू म्हणजे चेहरा, कोपरापासून हात व गुडघ्यापासून पाय पाण्याने स्वच्छ धुऊन शुचिर्भूत होणे. अर्थात, या पद्धतीला इस्लामच्या जन्मकाळी अरबस्तानातील भौगोलिक परिस्थितीची पार्श्वभूमी होती. तेथील वाळवंटी प्रदेशामुळे पाण्याचे दुर्भिक्ष हा घटक सर्वांत महत्त्वाचा होता. त्यामुळेच शुचिर्भूत होण्यासाठी हा काटकसरीचा मार्ग स्वीकारण्यात आला.
२. नीयत : (उद्देश किंवा प्रयोजन). नमाज अदा करण्याकरिता आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा उद्देश किंवा प्रयोजन स्पष्ट आणि प्रामाणिक असले पाहिजे, अशी अपेक्षा असते; कारण त्यामुळेच नमाजीसाठी आवश्यक असलेली मानसिक व बौद्धिक एकाग्रता त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकते.
३. अशी शारीरिक व मानसिक पूर्वतयारी झाल्यानंतर कुराणाच्या पहिल्या अध्यायाच्या पठणाने नमाजीची सुरुवात होते. कुराणाचा हा अध्याय सात ओळींच्या सात आयातींचा (श्लोकांचा) आहे. पण या सात ओळींत कुराणाचे आध्यात्मिक व भौतिक जीवनाचे सार आले आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी या अध्यायाला कुराणाचे प्रवेशद्वार म्हटले आहे. केवळ या अध्यायाचे रोज पठण केल्यास संपूर्ण कुराण-पठण केल्याचे पुण्य लाभते, असे त्यांनी आपल्या तर्जुमन-अल्-कुराण या भाष्यग्रंथात म्हटले आहे.
या पूर्वतयारीनंतर नमाजीच्या प्रत्यक्ष विधीला सुरुवात होते. या प्रक्रियेत ‘रकात’ हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. एका अर्थी रकात म्हणजे नमाज अदा करण्याचे चार उपघटक असलेले मापक (Unit) असते, असे म्हणता येईल. ही चार उपघटक/टप्पे खालीलप्रमाणे दिली आहेत :
- ‘नीयत’ म्हणजे नमाज अदा करण्याचे प्रयोजन आपल्या मनोमनी किंवा प्रगटपणे व्यक्त करून एकाग्र अवस्था प्राप्त करणे. हा या विधीतील पहिला टप्पा असतो.
- दुसऱ्या टप्प्याला ‘रुकु’ म्हणतात. या क्रियेत दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून काही क्षण ओणवे व्हायचे व नंतर पूर्ववत उभे राहायचे.
- तिसऱ्या अवस्थेला ‘सजदा’ म्हणतात. या अवस्थेत नमाजी व्यक्ती पाय गुडघ्यात पाठीमागे वळवून जमिनीवर बसते व हाताचे पंजे डोक्याच्या दोन्ही बाजूंना पालथे ठेवून आणि डोकेही काही क्षण जमिनीवर ठेवते व काही क्षणांनंतर पूर्ववत बसते. ही क्रिया दोनदा करायची असते.
- त्याचप्रमाणे शेवटी आपला चेहरा उजवीकडे व डावीकडे वळवून पैगंबर व देवदूत यांना सलाम करावयाचा असतो. इथे एक ‘रकात’ वा एका रकातीचे आवर्तन संपले, असे म्हटले जाते. प्रत्येक नमाजीची रकातसंख्या भिन्नभिन्न असल्यामुळे त्याविषयीची माहिती असणे आवश्यकच असते.
रोजची पाच वेळची नमाज; फर्ज आणि सुन्नत : रोजची पाच वेळची नमाज प्रत्येक मुसलमानासाठी बंधनकारक असते. मुले सात वर्षांची झाली की, रोजची नमाज त्यांचे कर्तव्य आहे. दिवसभराच्या पाच नमाजीच्या वेळा व इतर तपशीलही निश्चित करण्यात आला आहे. इस्लामी कालगणनेप्रमाणे सूर्यास्तानंतर नवा दिवस सुरू होतो. अशी कालगणनेची पद्धत असल्यामुळे सूर्य मावळल्यापासून रात्रीचा काळोख पडेपर्यंत नियमित नमाज अदा करा, असा नमाजाचा आदेश आहे (१७.७८).
नमाजीची आणखी एका तऱ्हेने म्हणजेच ‘फर्ज’ आणि ‘सुन्नत’ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. फर्ज म्हणजे बंधनकारक, तर सुन्नत म्हणजे ऐच्छिक असा या वर्गवारीचा अर्थ. पैगंबरांच्या हयातीत रोजची पाच वेळची अनिवार्य नमाज अदा केल्यानंतरसुद्धा पैगंबर आणखी काही वेळ नमाज पढत असत. त्यावरून ऐच्छिक नमाज पढण्याची प्रथा रूढ झाली. पैगंबरांच्या आचार-विचारांना किंवा कृतींना ‘सुन्ना’ म्हटले जाते. त्यावरून अशा ऐच्छिक नमाजीला सुन्नत (नमाज) असे नाव दिले गेले.
पाच वेळच्या दैनंदिन नमाजींचा तपशील :
अ. क्र. | नमाजीचे नाव | वेळ | रकातींची संख्या | शेरा |
१. | फजर | पहाटे सूर्योदयापूर्वी | ४ | २ फर्ज, २ सुन्नत |
२. | जोहर | दुपारी १.०० वा. | १२ | ४ सुन्नत, ४ फर्ज, २ सुन्नत, २ नफिल |
३. | असर | दुपारी ४.०० वा. | ८ | ४ सुन्नत, ४ फर्ज |
४. | मगरीब | सूर्यास्तानंतर ६.०० वा. | ७ | ३ फर्ज, २ सुन्नत, २ नफिल |
५. | ईशा | सूर्यास्तानंतर ७.४५ वा. | १७ | ४ फर्ज, ७ नफिल, ६ सुन्नत |
धर्मकृत्य म्हणून बंधनकारक नव्हे, पण अधिक पुण्य लाभावे म्हणून केलेल्या कृत्याला नफिल म्हणतात.
रोजच्या पाच वेळच्या अनिवार्य नमाजींव्यतिरिक्त इतर नमाज :
- शुक्रवारची नमाज : रोजच्या पाच अनिवार्य नमाजींप्रमाणे शुक्रवारची नमाजही महत्त्वाची मानली जाते व ती मशिदीतच अदा केली जाते. शुक्रवारच्या नमाजीला नेहमीपेक्षा अधिक लोक येत असतात. म्हणून गावातील किंवा शहरातील मोठ्या मशिदीत ती अदा केली जाते. म्हणून अशा मशिदींना जामे मस्जिद म्हणतात. दिल्लीची ‘जामे मस्जिद’ या दृष्टीने प्रसिद्ध आहे.
- तरावीहची नमाज : रमजान महिन्याच्या प्रतिपदेपासून, चंद्रदर्शन झाल्यापासून, शव्वाल महिन्याच्या प्रतिपदेपर्यंत रोज रात्री २० रकात.
- रमजान ईदची नमाज (ईद-उल-फित्र) दोन रकात दोन सुन्नत.
- बकरी ईदची नमाज (ईदुज जुहा किवा ईदुल अजहा).
- जनाजीची नमाज : मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात या नमाजीचा अंतर्भाव होतो. प्रेतयात्रा घरातून निघाली की, सर्वप्रथम ती जवळच्या मशिदीत नेली जाते. तिथे तो मृतदेह जनाजासहित ठेवला जातो व चिरशांतीसाठी प्रार्थना केली जाते. ही नमाज उभ्यानेच अदा करायची असते.
संदर्भ :
- Engineer, Asghar Ali, Islam and Modern Age, Vol. 9, Mumbai, 1998.
- आझाद, मौलाना, तर्जुमन्-अल्-कुराण, मुंबई, २००३.
समीक्षक : गुलाम समदानी