गुर्टू, शोभा विश्वनाथ : (८ फेब्रुवारी १९२५ – २७  सप्टेंबर २००४). हिंदुस्थानी संगीतातील एक प्रसिद्ध ठुमरी गायिका. त्या मूळच्या गोव्याच्या. विवाहापूर्वीचे नाव भानुमती शिरोडकर. त्यांचा जन्म शिरोडकर या सांगीतिक परंपरा असणाऱ्या घराण्यात बेळगाव (कर्नाटक) येथे झाला. आई मेनकाबाई शिरोडकर या नृत्य व गायन करीत. त्या उ. भूर्जीखाँ यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याचे संगीत शिकत. शिवाय त्या ठुमरी गाणाऱ्या कलाकारही होत्या, त्यामुळे भानुमतींना लहानपणापासून आईकडून गाण्याचे बाळकडू मिळाले. पुढे जयपूर घराण्याचे नत्थनखाँ यांच्याकडे ख्यालाचे आणि घम्मनखा यांच्याकडे ठुमरी, दादरा, गझल व अन्य उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांचा विवाह बेळगाव पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संगीतातील विद्वान व सतारवादक नारायणराव गुर्टू यांच्या मुलाशी विश्वनाथ गुर्टू यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी शोभा गुर्टू हे नाव स्वीकारले.

शोभाताई या पूरब, पंजाबी, ख्याली अंगाच्या अशा सर्व प्रकारच्या ठुमऱ्या सहजपणे सादर करीत. पूरब आणि बनारसी अंगामध्ये पंजाबी अंगाच्या मुरक्या, हरकती यांचे सौंदर्यपूर्ण मिश्रण करून त्यांनी ठुमरी सादर केली. ताज अहमद खाँ या हार्मोनियम वादक आणि रचनाकारांच्या अनेक रचना त्यांनी सफाईदारपणे सादर केल्या. शब्दांचे अर्थवाही पण नजाकतीचे उच्चारण, नेटकेपणाने केलेली राग मिश्रणे, शब्दातील दर्द, पुकार आणि गायनातील एकूणच प्रगल्भता ही त्यांची गानवैशिष्ट्ये. काहीशा मर्दानी जाड आवाजामुळे हे भावदर्शन उथळ न वाटता संयमित होई. संयमित शारीरिक हालचालींमुळे प्रेक्षकाशी संवाद साधण्याची किमया त्यांच्यापाशी होती. ठुमरी, दादरा, कजरी, सावन, झुला, चैती, फाग, होरी, बारामासा, मांड असे विविध संगीतप्रकार त्या कुशलतेने गात. तसेच गझल व भजन हे गानप्रकारही त्या अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर करीत. सुरुवातीला त्या रागदारीमधील एखादी बंदिशही गात असत.

शोभाताईंनी अनेक रचना केल्या आणि अनेक गझलांना स्वरबद्धही केले. ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया’, ‘पतझड आई सावरिया’, ‘सैय्या निकास गये’ ( संत कमालीचे भैरवीमधील पद) या त्यांच्या रचना विशेष गाजल्या. यमन, जनसंमोहिनी अशा आम रागांबरोबरच बिभास, भटियार अशा खास रागांचाही त्या वापर करीत. बेगम अख्तर यांच्या गायनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. ‘छोटी अख्तरी’ असेही त्यांना संबोधले गेले. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. तांबडी माती ,सहकार सम्राट, धन्य ते संताजी धनाजी, कलावंतीण आणि झाकोळ  या मराठी चित्रपटांकरिता त्यांनी पार्श्वगायन केले. हिंदीमध्ये त्यांनी पाकीजा या चित्रपटाकरिता पहिल्यांदा पार्श्वगायन केले (१९७२). १९७८ साली प्रदर्शित झालेल्या मैं तुलसी तेरे आँगन की या चित्रपटात गायलेली ‘सैय्याँ रूठ गये में मनाऊँ कैसे’ ही ठुमरी विशेष प्रसिद्ध झाली. या गाण्यास फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. त्यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी ठुमरीचे कार्यक्रम सादर केले. १९७९ मध्ये एच.एम.व्ही. (हिज मास्टर्स व्हॉइस) कंपनीने शोभा गुर्टू – ॲट हर बेस्ट  या नावाने ठुमरी, दादरा, चैती इत्यादी गायनप्रकारांचा अंतर्भाव असलेली ध्वनिमुद्रिका काढली. ही खूप लोकप्रियही झाली. याशिवायही त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या सांगीतिक कार्यकर्तृत्वाला अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८७), पद्मभूषण पुरस्कार (२००२), महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आदी पुरस्कार उल्लेखनीय होत. मराठी मनाला त्यांच्या ठुमरी आणि ललित गायनाने भुरळ घातली. त्यांनी पं. बिरजू महाराज यांच्याबरोबर गायनाचे अनेक कार्यक्रम केले.

शोभा व विश्वनाथ गुर्टू यांना तीन मुलगे. त्यांपैकी त्रिलोक गुर्टू हे प्रसिद्ध तबलावादक आहेत. सरला भिडे, शुभा जोशी, धनश्री पंडीत, बिरेश्वर गौतम ही त्यांची शिष्यमंडळी होत.

शोभा गुर्टू यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

समीक्षक – सु. र. देशपांडे

#ठुमरी