जर्नल धारव्यासाठी वापरावयाच्या मिश्रधातूंमध्ये बॅबिट मिश्रधातूंचा गट महत्त्वाचा आहे. मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, रेल्वे वगैरेंच्या पोलादी पाठीचे बॅबिटचे धारवे वापरतात. ही मिश्रधातू मूलतः आयझॅक बॅबिट (१७९९–१८६२) या अमेरिकन संशोधकांनी वाफेच्या एंजिनातील धारव्यांसाठी १८३९ साली शोधून काढली म्हणून त्याला  ‘बॅबिट मिश्रधातू’ असे म्हणतात.

बॅबिटचे कथिल-प्रधान असे दोन प्रमुख उपगट आहेत. (१) कथिल-प्रधान बॅबिट (Tin Rich): यामध्ये कथिल,अँटिमनी व तांबे हे प्रमुख घटक असून उच्च तापमानात कार्यक्षमता टिकवण्यासाठी सूक्ष्म प्रमाणात (०.१५ %) यात आर्सेनिकही मिसळलेले असते. कथिल-प्रधान बॅबिट संक्षारक (रासायनिक विक्रियेद्वारे झीज होईल अशा) परिस्थितीत व उच्च दाबाखाली वापरावयाच्या धारव्यांसाठी जास्त उपयुक्त आहेत.

कोष्टक क्र. १. कथिल – प्रधान बॅबिट मिश्रधातूंतील घटकांचे प्रमाण :

बॅबिट क्रमांक कथिल % तांबे % अँटिमनी % इतर %
९१ ४.५ ४.५
८९ ३.५ ७.५
७५ १२ १० (शिसे)
६५ १५ १८ (शिसे)

 

२) शिसे-प्रधान बॅबिट (Lead Rich Babbit) : यामध्ये शिसे, अँटिमनी व कथिल हे प्रमुख घटक असून हे थोड्या प्रमाणात आर्सेनिक (०.५ %) व तांबे यांचाही यात सामावेश केलेला असतो. शिसे-प्रधान बॅबिट मिश्रधातू कथिल-प्रधान बॅबिट मिश्रधातूंपेक्षा स्वस्त असतात.

कोष्टक क्र. २. शिसे – प्रधान मिश्रधातूंतील घटकांचे प्रमाण
बॅबिट क्रमांक शिसे % अँटिमनी % कथिल % इतर %
८६.० ६.०० ०.०५ (तांबे)
७५.० १५ १०.०० ०.६० (आर्सेनिक)
९५.८ ३.३५ ०.६० (कॅल्शियम)
७३.० १० ११.०० १.५० (कॅडमियम)

 

बॅबिट संरचनेमध्ये मुख्य घटक प्रधान मिश्रधातूंच्या मृदू व आकार्य प्रावस्थेचा – एकजिनसी रासायनिक संघटन असलेल्या व भौतिक दृष्ट्या भिन्न असलेल्या मिश्रधातूच्या घटकाचा – असतो. अशा मृदू प्रावस्थेमध्ये तांबे-कथिल अशा आंतरर्धावतीय संयुगांचे  – दोन धातूंचे अणू ठराविक प्रमाणात संयोग पावून दोन्ही धातूंपेक्षा वेगळ्या संरचनेचे स्फटिक बनून झालेल्या मिश्रधातूच्या घटकांचे – सूक्ष्म परंतु कठीण कण विखुरलेले असतात. या कठीण कणांमुळे मृदू प्रावस्थेची झीज होत नाही.

बॅबिट मिश्रधातूंचे मूलभूत ताणबल व कठिनता कमी असल्याने सहसा त्यांचा भरीव धारवा बनवीत नाहीत. पोलादी पत्र्यावर बॅबिटाचे चूर्ण पसरवून किंवा वितळविलेली बॅबिट त्यावर ओतून पातळ थराचे धारवे बनवितात. बॅबिटचा थर जेवढा पातळ तेवढे धारवे जास्त टिकाऊ असतात. जास्त दाबाने धारवे व आस तापून एकमेकांस चिकटू नयेत म्हणून बॅबिटवर शिसे व कथिलच्या मिश्रधातूचा सूक्ष्म थर विद्युत विलेपनाने देतात.

बॅबिटाच्या धाराव्यास ‘द्विधातवीय धारवा’ असेही म्हणतात. हे धारवे दोन अर्धगोल धारव्यांच्या रूपात असतात.