फाशीची शिक्षा किंवा देहान्त शिक्षा म्हणजे कायद्यातर्फे एखाद्या गुन्हेगार व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावणे होय. गळफास देऊन किंवा विद्युत खुर्चीत बसवून विद्युत प्रवाहामार्फत त्या व्यक्तीचे जीवन संपुष्टात आणून ही शिक्षा अमलात आणली जाते. ही शिक्षा अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठीच दिली जाते. गुन्हा घडल्यावर शिक्षा करावयाची ती अशासाठी की, तसल्या प्रकारचा गुन्हा परत घडू नये, गुन्हेगाराला अद्दल घडावी आणि इतरांनाही जरब बसून त्यांनी तसल्या गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावे, हा हेतू असतो.

फाशीची शिक्षा वा देहान्त शिक्षा ह्याविषयी चर्चची भूमिका अशी : फाशीच्या शिक्षेसंबंधी चर्चच्या भूमिकेत काळानुसार बदल घडत गेलेला आहे. सुरुवातीच्या काळात फाशीच्या शिक्षेला चर्चची अनुमती होती. कॅथलिक ख्रिस्तसभेचा नवा श्रद्धाग्रंथ  ह्या अधिकृत शिकवणूक ग्रंथात सांगितले होते : ‘समाजाचे सार्वजनिक हित अबाधित ठेवायचे असेल, तर हिंसक व्यक्तीला नि:शस्त्र करणे अत्यावश्यक आहे. ह्या नियमाला धरून ख्रिस्तसभेमध्ये अशा व्यक्तींना योग्य ती शिक्षा होणे महत्त्वाचे मानले आहे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असेल, तर ही शिक्षा मृत्युदंडापर्यंतसुद्धा करता येते; परंतु चर्चच्या फाशीविषयीच्या ह्या भूमिकेत आज आमूलाग्र बदल झालेला आहे.

२०१८ साली कॅथलिक ख्रिस्तसभेचा नवा श्रद्धाग्रंथामध्ये चर्चची फाशीविषयीची नवी भूमिका मांडण्यात आली. ह्या नव्या भूमिकेनुसार ‘शुभवर्तमानाच्या प्रकाशात फाशीची शिक्षा म्हणजे व्यक्तीची अबाधता व दर्जा ह्यांवर केलेला हल्ला’ असल्यामुळे फाशीची शिक्षा संपूर्ण जगातून बंद व्हावी, असे प्रतिपादन केले गेले.

काही कॅथलिक धर्मवेत्त्यांच्या मते फाशीची शिक्षा योग्य नाही; कारण मानवी जीवन हे पवित्र आहे व गर्भधारणेपासून नैसर्गिक रीत्या मृत्यू येईपर्यंत व्यक्तीचे जीवन सुरक्षित ठेवायलाच हवे. कारण ‘परमेश्वर माणसावर त्याची योग्यता व पुण्याई असो वा नसो, अगाढ प्रेम करत असतो’.

द इंटरनॅशनल कमिशन अगेन्स्ट डेथ पेनल्टी या २०१५ सालच्या संमेलनाला उद्देशून पोप फ्रान्सिस ह्यांनी घोषित केले की, ‘‘गुन्हा कितीही गंभीर असला, तरी आजच्या युगात फाशीची शिक्षा अस्वीकारणीय आहे. समाजाने स्वत:चे संरक्षण करायला हवे, ह्या कारणासाठी फाशीच्या शिक्षेचे समर्थन करता येणार नाही. त्याचप्रमाणे न्यायाधीशांच्या हातून निर्णय देण्यात चूक होऊ शकते. त्यामुळे ‘फाशीच्या शिक्षेचा कायदेशीरपणा’ लोप पावला आहे. फाशीची शिक्षा हा ‘व्यक्तीची अबाधता व दर्जा ह्यांवर केलेला हल्ला आहे’, तो हल्ला मानवजात व समाज ह्यांसाठी जी देवाची योजना आहे त्याविरुद्ध आहे. शिवाय अत्याचारी व्यक्तीस फाशी दिल्यामुळे अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्तीला न्याय मिळत नाही, तर उलट सूडबुद्धीला खतपाणी मिळते.

ख्रिस्तसभेच्या फाशीविषयीच्या ह्या नव्या भूमिकेविषयी कॅथलिक ख्रिस्तसभेच्या नव्या श्रद्धाग्रंथामध्ये नमूद केले गेले आहे की, आतापर्यंत ख्रिस्तसभेमध्ये अतिशय गंभीर गुन्ह्यांसाठी न्यायाची नि:पक्षपाती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सामाजिक हित जपण्यासाठी फाशीची शिक्षा ग्राह्य मानली गेली होती; परंतु आजच्या काळात अधिकाधिक जाणीव झालेली आहे की, गंभीर गुन्हा केल्यानंतरही गुन्हेगाराची मानवी प्रतिष्ठा लोप पावत नसते. शिवाय शासनातर्फे गुन्हेगारांवर जो कायदेशीर दंड लादण्यात येतो त्याच्या महत्तेविषयी नवी समज निर्माण होत आहे. शेवटी अटकाव करण्याच्या अतिशय प्रभावी पद्धती तयार करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांचे योग्य ते रक्षण होण्याची शाश्वती दिली जाते व त्याचबरोबर अपराधी व्यक्ती स्वत:चा उद्धार करण्याच्या संधीपासून वंचित राहात नाही. फाशीच्या शिक्षेविषयी चर्चची भूमिका विशद करताना पोप जॉन पॉल द्वितीय म्हणतात : ‘‘कुठल्याही अटीविना जीवनरक्षणाची (Pro-life) बाजू घेणाऱ्या ख्रिस्ताच्या शिष्यांना सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रसार करण्याचे व जीवनाच्या शुभवर्तमानाचा सन्मान व सेवा करण्याचे आवाहन नवीन खिस्त प्रसार प्रणालीने केलेले आहे. एखाद्या व्यक्तीने कितीही गंभीर गुन्हा केला, तरीही त्या व्यक्तीचा मानवी दर्जा कधीही हिरावून घेतला जात नाही, ही वाढती जाणीव हे आशेचे चिन्ह आहे”.

चर्चला फाशीची शिक्षा अमान्य आहे व फाशीची शिक्षा संपूर्ण जगातून बंद केली जावी ह्यासाठी चर्च निर्धारपूर्वक कार्य करीत आहे.

संदर्भ :

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया