सहस्रबुद्धे, पुरूषोत्तम गणेश : (१० जून १९०४-४ मार्च १९८५). मराठी गंथकार आणि विचारवंत. जन्म पुणे येथे. मुंबई विदयापीठाचे एम्.ए. (१९३१) आणि मराठीचे पीएच्.डी. (१९३९). पुण्याच्या नूतन मराठी विदयालयात शिक्षक म्हणून १९२८-४६ दरम्यान त्यांनी अध्यापन केले. सर परशुरामभाऊ महाविदयालयात ( पुणे ) मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी १९४६-६४ या दरम्यान अध्यापन केले आणि पुढे पुणे विदयापीठातही ते मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्तीपर्यंत (१९६७) कार्यरत होते.

मराठी साहित्याबरोबरच इतिहास, धर्म, संस्कृत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इ. विषयांचा त्यांचा मोठा व्यासंग होता. ह्या अनेक विषयांच्या व्यासंगातून आणि चिंतनातून स्वत: काढलेले निष्कर्ष समाजापुढे निर्भयपणे मांडण्याच्या हेतूने त्यांनी लेखन केले आणि  विष्णुशास्त्री चिपळूणकर,  लो. टिळक,  गो. ग. आगरकर,  स्वातंत्र्यवीर सावरकर,  शं. द. जावडेकर,  श्री. म. माटे ह्यांसारख्या निबंधकारांची परंपरा चालू ठेवली व समृद्ध केली. त्यांचे बरेचसे गंथलेखन प्रबंधांच्या स्वरूपाचे व मुख्यत्वे समीक्षात्मक आहे. त्यातील काही विशेष उल्लेखनीय गंथ असे : भारतीय लोकसत्ता (१९५४), लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान (१९६२), भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म (१९६५), हिंदुसमाज : संघटना आणि विघटना (१९६७), इहवादी शासन (१९७२), केसरीची त्रिमूर्ति (१९७४) आणि महाराष्ट्र-संस्कृति (१९७७).

भारतीय लोकसत्तेच्या विकासाचे ऐतिहासिक पद्धतीने केलेले विवेचन भारतीय लोकसत्ता ह्या गंथात आहे. लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान ह्या प्रबंधात भारतीय समाजातील अनेक दोषांची मीमांसा त्यांनी केलेली असून भारतीय जनतेची मानसिक कांती होण्याची आवश्यकता प्रतिपादिली आहे. त्यासाठी चारित्र्यसंपन्न, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, नि:स्वार्थी आणि विज्ञाननिष्ठ अशा लाखो तरूणांची संघटना उभी राहून तिने लोकशिक्षणाचे कार्य शिरावर घेतले पाहिजे, असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. सोव्हिएट रशिया आणि चीन ह्या देशांनी लोकशाहीऐवजी दंडसत्तेचा मार्ग स्वीकारला आणि आपले स्वातंत्र्य व सरहद्दी अबाधित राखल्या तथापि दंडसत्तेलाही यशस्वी होण्यासाठी लोकशिक्षणाची गरज असतेच, हेही त्यांनी नमूद केले आहे. महाभारतातील धर्मशास्त्र, समाजकारण, व्यवहारनीती (राजनीतिशास्त्र) आणि प्रवृत्तिधर्म ह्यांचे विवेचन भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्ममध्ये केले असून, महाभारतातील राष्ट्रधर्माच्या सिद्धांतांचा अभ्यास व त्यांचे पालन राष्ट्राच्या अभ्युदयासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा निर्वाळा दिला आहे. भारताचा इ. स. १००० पासूनचा इतिहास हा हिंदूंच्या पराभवांचा आणि पारतंत्र्याचा इतिहास का झाला, ह्याची कारणमीमांसा हिंदुसमाज : संघटना आणि विघटनामध्ये केली आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, समाजसुधारक आगरकर आणि लो. टिळक ह्यांच्या कार्याचे विवेचन व मूल्यमापन केसरीची त्रिमूर्ति मध्ये आहे. महाराष्ट्र संस्कृती ह्या गंथात इ.स.पू. २३५ ते इ.स. १९४७ ह्या दीर्घ कालखंडातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण ह्यांच्या संदर्भांत केले आहे.

त्यांच्या निबंधसंग्रहांत राजविदया (१९५९), पराधीन सरस्वती (१९६२), वैयक्तिक व सामाजिक (१९६३) आणि माझे चिंतन (१९७३) ह्यांचा समावेश होतो. ह्यांखेरीज लोकहितवादींच्या या शतपत्रांचे त्यांनी संपादन केले (१९७७). त्यांच्या भारतीय लोकसत्ता (१९५४) या गंथाला मुंबई विदयापीठाचे तर्खडकर पारितोषिक मिळाले (१९५४). कथा, प्रहसन, नाटक असे काही ललित लेखनही त्यांनी केले आहे.

पुणे येथे त्यांचे निधन झाले.