गिर्ट्झ, क्लिफर्ड : (२३ ऑगस्ट १९२६‒३० ऑक्टोबर २००६). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाला. त्यांनी ओहायवो येथील ॲरिओक महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए.ची पदवी आणि हार्व्हर्ड विद्यापीठातून सामाजिक मानवशास्त्रातील पीएच्.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यांना केंब्रिज, हार्व्हर्ड आदी पंधरा विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरविले. इ. स. १९७० ते २००० या काळात प्रीन्स्टन येथील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडी येथे त्यांनी सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच ते सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक ग्रंथ आणि शोधनिबंध लिहिले. त्यांतील इंटरप्रिटेशन ऑफ कल्चर आणि लोकल नॉलेज हे दोन ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत.

गिर्ट्झ यांनी सामाजिक शास्त्रातील विचारप्रवाहांचा चिकित्सक अभ्यास केला होता. त्या विचारांमधील उणिवांची आणि मर्यादांची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी सामाजिक शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे असा आग्रह धरला. अर्थात, क्षेत्रीय पद्धतीच्या विशिष्ट प्रकारच्या स्वरूपामुळे संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता आणण्यात मर्यादा पडतात, याची त्यांना जाणीव होती. मानवशास्त्राला क्लिष्ट शास्त्रीय प्रारूपाकडून अन्वयार्थ आणि अर्थनिर्णयपद्धती शास्त्रीय प्रारूपाकडे वळविण्याचे श्रेय गिर्ट्झ यांच्याकडे जाते.

गिर्ट्झ यांनी आपल्या संशोधनाला जावा, बाली आणि मोरोक्को येथून सुरुवात केली. या भागांत त्यांनी क्षेत्रकार्य केले. त्यांनी केलेल्या या क्षेत्रकार्यामुळे त्यांचा संस्कृतिविषयक दृष्टिकोन तयार झाला होता. म्हणूनच त्यांचे असे मत होते की, संस्कृतीचा अभ्यास करणे म्हणजे तिच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे असे नाही; तर संस्कृतीचा अन्वयार्थ लावणे म्हणजे संस्कृतीचा अभ्यास करणे होय. कारण व्यक्तीचे आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक विचार आणि आचार हे ती ज्या संस्कृतीमध्ये वाढलेली असते, त्या संस्कृतीच्या चौकटीतच अर्थपूर्ण ठरतात. म्हणून संस्कृतीचा अभ्यास करताना त्या कृतीमागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. अशा तऱ्हेने संस्कृतीविषयी त्यांचे वेगळे विचार असल्यामुळे, तसेच संस्कृतीचा अन्वयार्थक अभ्यास करणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी मानवशास्त्राचे तसेच मानवशास्त्रीय क्षेत्रपद्धतीचे (Ethnography) स्वरूप वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. मानवशास्त्रातील त्यांचे हे कार्य समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे संस्कृती, मानवशास्त्रीय क्षेत्रपद्धती तसेच मानवशास्त्र यांविषयीचे विचार काय होते, हे समजून घेणे योग्य ठरेल.

गिर्ट्झ यांचे संस्कृतिविषयक विचार : पारंपरिक मानवशास्त्रामध्ये संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करताना संस्कृतीला Organic Whole, Super Organic Whole अशा उपमा दिलेल्या दिसतात. गिर्ट्झ यांना संस्कृतीचे सांगितलेले हे स्वरूप मान्य नाही. त्यांच्या मते संस्कृती समाजातील व्यक्तींच्या परस्परांमधील कृतींच्या जाळ्यातून निर्माण होते. व्यक्तीची कृती ही अर्थपूर्ण प्रतीक असते. संस्कृती ही अशा अर्थपूर्ण प्रतीकांचे जाळे असते. म्हणून संस्कृतीचा अभ्यास करताना या प्रतीकांच्या पलीकडे जाऊन त्यांचा अन्वय लावण्याची आवश्यकता आहे. गिर्ट्झ यांनी येथे कृतीला प्रतीक म्हणणे हे भाषेच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भाषेच्या तत्त्वज्ञानामध्ये चिन्ह (Sign) आणि प्रतीक (Symbol) यांच्यात फरक केला जातो. चिन्हाला अनुसरून बाह्यजगात वस्तू असते म्हणून चिन्हांना विशिष्ट अर्थ असतो. याउलट, प्रतीकांना अनुसरून वस्तू असतेच असे नाही, तर प्रतीकांना संदर्भानुसार अर्थ प्राप्त होतो. म्हणून एकच प्रतीक वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वापरले गेले असले, तरी त्याचा अन्वयार्थ वेगळा असतो. उदा., स्त्रीने कुंकू लावणे ही सामाजिक कृती घेतली, तर त्या कृतीचा संस्कृतीनुसार अर्थ वेगवेगळा असतो.

गिर्ट्झ संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करताना संस्कृतीला संहितेची उपमा देतात. ते म्हणतात, “एखादी व्यक्ती संहितेचा समीक्षात्मक अभ्यास करताना, तिचा अन्वयार्थ लावताना, ती संहिता ज्या काळात लिहिली गेली, त्या काळातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचा विचार करते; त्याप्रमाणे अभ्यासकानेही संस्कृतीचा अभ्यास करताना संस्कृतीचे वाचन करणे आवश्यक आहे. असे वाचन करणे म्हणजे संस्कृतीचा अर्थनिर्णयशास्त्राय अभ्यास करणे होय.”

गिर्ट्झ संस्कृतीची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात : “प्रतीकांमध्ये अंतर्भूत असलेल्या अर्थपूर्ण आकारबंधाचे ऐतिहासिक वहन म्हणजे संस्कृती.” संस्कृती ही अर्थपूर्ण प्रतीकांच्या विणीतून तयार झालेली एक प्रणाली असते. व्यक्ती व्यवहार करते आणि स्वत:चा जीवनविषयक दृष्टिकोन बनविते.

संस्कृतीविषयी त्यांचे असे मत असल्यामुळेच संस्कृतीचा अभ्यास हा मूलभूत विज्ञानातील अभ्यासापेक्षा वेगळा असतो, असे ते म्हणतात. मूलभूत विज्ञानामध्ये आपण सार्वत्रिक नियम शोधत असतो. असे नियम संस्कृतीच्या अभ्यासकाने न शोधता, प्रतीकांचा अर्थ शोधण्यासाठी त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे काम त्याने केले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

गिर्ट्झ यांनी संस्कृतीविषयी चिन्हमीमांसाशास्त्रीय संकल्पना मांडली. चिन्हमीमांसाशास्त्रामध्ये वस्तूचे प्रतिनिधित्व करणारे चिन्ह आणि प्रतीक यांचा त्या वस्तूशी काय संबंध आहे, याचा अभ्यास केला जातो. संस्कृतीच्या संदर्भात विचार करताना आपल्याला असे दिसते की, प्रतीकांचा अर्थ कायम नसतो, तो संदर्भानुसार, संस्कृतीनुसार तसेच वक्त्याच्या स्वभावानुसार बदलत जातो. गिर्ट्झ यांच्या मते प्रत्येक संस्कृतीला संदर्भ असतो. या संदर्भाच्या चौकटीत परस्परांमध्ये विणल्या गेलेल्या चिन्हांची प्रणाली समजून घेता येते. अशा पद्धतीने संस्कृती समजून घेणे म्हणजेच संस्कृतीचे आशयघन वर्णन (Thick Description) होय. गिर्ट्झ यांच्या मते अभ्यासकाने व्यक्तीच्या जीवनव्यवहारानुसार तिच्या कृतीचा अर्थ उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांची संस्कृती समजून घेणे म्हणजे संस्कृतीचे स्वरूप तिचे वैशिष्ट्य न हरवता उलगडून दाखविणे होय.

गिर्ट्झ यांचे मानवशास्त्रविषयक विचार : गिर्ट्झ यांनी सांगितलेले मानवशास्त्राचे स्वरूप हे अन्वयार्थक मानवशास्त्राचे स्वरूप आहे. त्यांच्या मतानुसार मानवशास्त्रामध्ये जेव्हा आपण संस्कृतीचे विश्लेषण करतो, तेव्हा ते विश्लेषण एखादा सार्वत्रिक नियम करण्यासाठी करू नये; तर त्या संस्कृतीचा अर्थ समजून घेण्यासाठी केलेले ते अन्वयार्थिक विश्लेषण असले पाहिजे. या विश्लेषणाचे स्वरूप ते आशयघन वर्णनाच्या आधारे खालीलप्रमाणे स्पष्ट करतात :

आशयघन ही संकल्पना गिर्ट्झ यांनी गिल्बर्ट राइल या ब्रिटिश तत्त्वज्ञाकडून घेतलेली आहे. सामाजिक मानवशास्त्र हे संस्कृतीच्या अभ्यासावर आधारित असते. संस्कृती ही प्रतीकांमधून आविष्कृत होत असल्यामुळे व्यक्तीच्या सामाजिक जीवनामध्ये प्रतीकांची भूमिका किंवा सहभाग काय आहे, यावरून प्रतीकांना अर्थ प्राप्त होत असतो; कारण व्यक्तीची कृती आणि संस्कृती यांचे स्वरूप परस्परांमध्ये गुंतलेले असते. म्हणून संस्कृतीचे विश्लेषण करून संस्कृतीचे आशयघन वर्णन करता येते. या वर्णनाच्या आधारे त्या संस्कृतीमधील रहिवासी कोणत्या पद्धतीचा विचार करतात, याची सविस्तर नोंद करता येते. आशयघन वर्णन म्हणजे संस्कृतिबाह्य व्यक्तीने संस्कृतीमध्ये राहणारी व्यक्ती कोणत्या पद्धतीने विचार करते, याचा लावलेला अन्वयार्थ होय. याला अन्वयार्थ यासाठी म्हणायचे की, अभ्यासकाला पूर्णपणे अपरिचित असलेल्या संस्कृतीचा तो अन्वयार्थ लावत असतो. म्हणूनच गिर्ट्झ म्हणतात की, मानवशास्त्रीय संशोधन हे प्रथम स्वरूपाचे (First Order) संशोधन नसून दुय्यम स्वरूपाचे (Second Order) संशोधन असते. त्या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे, तिच्या संस्कृतीचे आकलन प्रथम स्वरूपाचे असते; पण त्या संस्कृतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या माहितीचा अन्वयार्थ मानवशास्त्रज्ञ सांगत असल्यामुळे त्याचे संशोधन दुय्यम स्वरूपाचे असते.

आशयघन वर्णनाचे स्वरूप गिर्ट्झ डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप (Blink) आणि डोळ्यांच्या पापण्या मिचकावणे (Wink) यांतील फरकाच्या आधारे आधिक स्पष्ट करतात. पापण्याची उघडझाप ही डोळ्यांची नैसर्गिक क्रिया आहे, तर पापण्या मिचकावणे ही कर्त्याने हेतुपुरस्सर केलेली क्रिया आहे. दोन्ही ठिकाणी डोळ्यांची हालचाल एकाच प्रकारची आहे; पण त्यांचा अर्थ मात्र भिन्न आहे. ‘Wink’ या शब्दाला खास संप्रेषणाचा आकार (Form) आहे. जाणीवपूर्णक, विशिष्ट व्यक्तीला अनुसरून, विशिष्ट व्यक्तीला संदेश देण्यासाठी सामाजिक संकेतांना अनुसरून केलेली ती कृती आहे. डोळ्यांची उघडझाप, डोळे मिचकावणे, डोळा मारणे असे त्याचे विविध अर्थ होऊ शकतात. अशी कृती करताना समूहातील लोकांना ‘Wink’ करणारी व्यक्ती तसेच जिला उद्देशून ‘Wink’ केलेले असते, अशा व्यक्तीबद्दल अभ्यासकाला अज्ञान असते.

‘Wink’चा अन्वयार्थ लावत असताना मानवशास्त्रज्ञाने त्या कृतीच्या पलीकडे गेले पाहिजे, असे गिर्ट्झ यांचे म्हणणे होते. ‘Wink’च्या आशयघन वर्णनामध्ये त्याच्या मागचा अर्थ लक्षात घेण्याचा तसेच समाजामध्ये त्याचा प्रतीकात्मक अर्थ काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न असतो.

आशयघन वर्णनाचा उद्देश अधिक स्पष्ट करायचा झाल्यास आपल्याला असे म्हणता येईल की, गिर्ट्झ यांच्या मते संस्कृतीचा अभ्यास करताना एखादी संकल्पनात्मक चौकट त्या संस्कृतीवर लादण्यापेक्षा त्या संस्कृतीतील व्यक्तीची कृती कोणत्या पद्धतीने व का केली जाते, याचा अन्वयार्थ लावणे योग्य आहे. आशयघन वर्णनामध्ये नेमके हेच केले जाते. म्हणून आशयघन वर्णन हे केवळ संस्कृतीविषयीचे माहितीसंकलन नसते, तर ते माहितीचे अन्वयार्थक संकलन असते. माहितीसंकलन हा तर मानवशास्त्रीय अभ्यासपद्धतीचा अविभाज्य घटक आहे. पण असे असले तरी हे माहितीसंकलन अन्वयार्थक असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता; कारण असे संकलन असेल, तरच ती संस्कृती यथार्थपणे समजून घेता येते. या अर्थानेही मानवशास्त्रीय संशोधन हे दुय्यम पातळीवरचे असते.

गिर्ट्झ यांचे मानवशास्त्रातील महत्त्व : संस्कृती, मानवशास्त्र, आशयघन वर्णन यांच्या आधारे मानवशास्त्र आणि संस्कृती यांचा नव्याने अर्थ सांगण्याचा प्रयत्न गिर्ट्झ यांनी केलेला दिसतो. असा प्रयत्न करीत असताना आपल्या मानवशास्त्रीय लिखाणांमध्ये रिकर, व्हिट्गेन्श्टाइन, सुसन लँगर, कॅसिरर, राइल आदी तत्त्वज्ञांचे संदर्भ देऊन मानवशास्त्रीय लिखाणाला तत्त्वज्ञानाची बैठक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याशिवाय मानवशास्त्रीय लिखाणामध्ये मानवशास्त्राव्यतिरिक्त इतर ज्ञानशाखांचा विपुल संदर्भ देणारे गिर्ट्झ हे कदाचित पहिले सामाजिक शास्त्रज्ञ असावेत.

याशिवाय मानवशास्त्रातील गिर्ट्झ यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी संस्कृतीकडे बघण्याच्या अमेरिकन मानवशास्त्राच्या पद्धतीत बदल केला. याचे उदाहरण म्हणजे त्यांनी प्रतीकांकडे संस्कृतीचे वाहक म्हणून बघितले. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या कृतीकडे कृती म्हणून न बघता ती व्यक्ती कृती करण्यासाठी त्या परिस्थितीचा कसा अन्वयार्थ लावते, हे पाहिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. कर्त्याची कृती ही त्यांच्या मानवशास्त्रीय अभ्यासाचा केंद्रबिंदू होती, असे म्हटले तर ते गैर होणार नाही.

हृदयावरील शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचे फिलाडेल्फिया येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Banton, Michael, Ed. Anthropological Approaches to the Study of Religion, London, 1966.
  • Geertz, Clifford, Local Knowledge : Further Essays in Interpretive Anthropology, New York, 1983.
  • Geertz, Clifford, The Interpretation of Cultures, New York, 1973.

                                                                                                                                                              समीक्षक – मीनल कातरणीकर