रमण महर्षि : (३० डिसेंबर १८७९‒१४ एप्रिल १९५०). आधुनिक भारतीय संत व तत्त्वज्ञ. या दक्षिण भारतीय तत्त्वज्ञाने कोणताही नवीन संप्रदाय किंवा पंथ स्थापन न करता वेदान्ताचे सनातन सत्य आणि तत्त्वज्ञान सोप्या भाषेत लोकांना समजावले. तसेच त्यांनी कोणताही विशिष्ट आचार सांगितला नाही किंवा कोणत्याही ग्रंथाचे पारायण करावयास सांगितले नाही. ‘मनात असलेल्या बेड्या तोडल्याशिवाय मानवाचा जीवनविकास होणार नाही’, असा साधा-सोपा-सरळ उपदेश त्यांनी केला. रमण महर्षींनी स्वतः कधी व्याख्याने देऊन अथवा पुस्तके लिहून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला नाही. त्यांना मानणारे भक्त स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन त्यांना जीवनात पडलेले प्रश्न विचारीत. अशा प्रश्नांना महर्षी स्वानुभवातून जी उत्तरे देत त्यातूनच त्यांचे तत्त्वज्ञान उभे राहिले.

रमण महर्षींचा जन्म दक्षिण भारतातील (तमिळनाडू) मदुराई नांगराच्या दक्षिणेस असलेल्या तिरुच्युळी नावाच्या एका छोट्याशा गावी झाला. त्यांचे मूळ नाव वेंकटरामन असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदरम् अय्यर असे होते आणि आईचे अळगम्माळ असे होते. वडील वकील असल्यामुळे घरी शिक्षणाचे वातावरण होते. वेंकटरामन बुद्धिमान होते. फुटबॉल, कुस्ती, पोहणे इत्यादींमध्ये ते प्रवीण होते. वेंकटरामन बारा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते मदुराईला मामाच्या घरी आले. मदुराईला ‘स्कॉट्स मिडलस्कुल’ आणि नंतर ‘अमेरिकन मिशन हायस्कुल’ येथे त्यांचे शिक्षण झाले. मदुराईला असताना मीनाक्षी मंदिरात ते एकाग्रतेने प्रार्थना करीत. प्रार्थना, प्राणायाम यांमुळे चित्त एकाग्रतेची कला त्यांना लहानपणीच अवगत झाली होती. संतांची चरित्रे वाचण्याची त्यांना लहानपणीपासूनच आवड होती. पेरियपुराणम्‌ या शैव संतांच्या चरित्राचा त्यांच्या मनावर खूपच परिणाम झाला होता.

एका कथेनुसार रमण महर्षी सोळा वर्षांचे असताना एका नातेवाईकाकडून ‘अरुणाचल’ हा शब्द ऐकला आणि तत्क्षणी त्यांच्या अंगावर शहारे आले आणि पुढे त्यांनी अरुणाचल (तिरुवन्नामलई) लाच आपली कर्मभूमी बनविले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांच्या मनात विरक्तीची भावना जागृत होऊन सन्यस्त जीवनाची त्यांना ओढ लागली. इथून पुढे त्यांना अद्भुत अशा अनुभूती येऊ लागल्या. एकदा एकाएकी त्यांच्या मनात मृत्यूची भीती निर्माण झाली. परंतु आत्म्याचे अमरत्व ध्यानात आले व त्यातून ती भीती नष्ट झाली. मृत्यूमुळे देहाचा अंत होईलही, पण आत्मा तसाच राहणार हे गीतोक्त वचन व त्याचा साक्षात्कार त्यांना झाला. या साक्षात्कारानंतर या भौतिक जगातील बाबींविषयी त्यांना उदासीनता आली. ऑगस्ट १८९६ च्या सुमारास शाळेची फी भरण्यासाठी भावाकडून मिळालेले ५ रुपये घेऊन निघाले आणि कधी वाहनाने, तर कधी पायी असे करत करत सप्टेंबर १८९६ मध्ये ते तिरुवन्नामलई येथे जाऊन पोहोचले. या ठिकाणी त्यांनी पोहोचल्यावर गत जीवनाची सर्व चिन्हे टाकून देऊन मुंडन केले, जानवे तोडून टाकले, लंगोटी लावली आणि मौन धारण केले. नंतर आयुष्यभर ते तेथेच राहिले.

तिरुवन्नामलईच्या अरुणाचलेश्वराच्या मंदिरामध्ये, पाताळलिंगम् गुहेत आणि अशा अनेक ठिकाणी रमण महर्षी ध्यानस्थ बसत. ध्यानाच्या दरम्यान त्यांना कशाचेही भान राहत नसे. डास, मुंग्या इत्यादींच्या त्रासातही त्यांनी साधना केली. मुलांचा व साधुवेषातील भोंदूंचाही त्रास त्यांनी सहन केला. परंतु पळणीस्वामी, मौनी साधू, शेषाद्रिस्वामी इत्यादींनी त्यांची सेवा-सुश्रुषा केली. अकरा वर्षांच्या मौनानंतर ते मोजके बोलू लागले. लोक त्यांना ‘मौनीसाधू’ म्हणत. आपले प्रश्न विचारत. त्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत. लोकांना त्यांच्या उत्तरातून प्रेरणा आणि जगण्याचे बळ मिळत गेले म्हणून लोक त्यांच्याकडे येत गेले आणि हळूहळू तेथे ‘रमणाश्रम’ तयार झाला. त्यांची आईही १९१६ साली आश्रमात येऊन राहिली. धाकटा भाऊही संन्यास घेऊन तेथे आला. आईच्या निधनानंतर त्यांनी आश्रमाजवळ ‘मातृभूतेश्वर’ मंदिराची स्थापना केली. त्यांचे साधे-सोपे व व्यावहारिक तत्त्वज्ञान सर्वांना आवडत होते. ते आता केवळ वेंकटरमण न राहता रमण महर्षी झाले.

रमण महर्षींना बाहेरगावावरून येण्यासाठी असंख्य निमंत्रणे येत असत. परंतु आश्रम सोडून ते कधीही कोठेही गेले नाहीत. ते त्यांच्या सभागृहात शांतपणे बसत. लोक त्यांना भेटण्यासाठी येत असत. सुप्रसिद्ध श्री. काव्यकंठ गणपतीशास्त्री, योगाचार्य कपिलशास्त्री यांसारखे प्रकांडपंडित विद्वानसुद्धा साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले रमण महर्षी यांच्या सानिध्यात येऊन राहिले.

जगातील विविध ठिकाणांहून त्यांच्या भेटीसाठी जिज्ञासू येत असत. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा चालत. रमण महर्षी तमिळमधून बोलत आणि दुभाषा त्यांच्या बोलण्याचे भाषांतर करी. एफ्‌. एच्‌. हम्फ्री हे त्यांचे पहिले पाश्चात्त्य भक्त्त होत. पॉल ब्रंटन यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे पाश्चात्त्य जगाला रमण महर्षींचा विशेष परिचय झाला. तसेच सॉमरसेट मोघम, झिमर, जुंग हे पाश्चात्त्य विद्वान त्यांच्या सानिध्यात येऊन राहिले.

त्यांच्या भक्तांनी अरुणाचलाच्या पायथ्याला मठ, भोजनशाळा, स्वयंपाकगृह, गोशाळा, पुष्पवाटिका इत्यादी इमारती बांधल्या. त्यांच्या चर्चांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन व विक्री विभाग काढण्यात आला. आश्रमाचे कार्यालय तयार झाले. पाहुण्यांसाठी अतिथिगृह बांधले गेले. पोस्ट, दवाखाना, गुरांचा निवारा इ. सोयी झाल्या. आश्रमात शिस्त व स्वच्छता होती. आश्रमाची दैनंदिनी ठरलेली असे. रमण महर्षी भाजी चिरणे, पत्रावळ्या लावणे इ. कामांतही मदत करीत असत. महर्षींच्या कृतियुक्त तत्त्वज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरील शांती, प्रसन्नता, समाधान यांचा अनुभव घेण्यासाठी लोक आश्रमात नियमित येत असत.

वयाच्या सत्तरीनंतर महर्षींना डाव्या हाताच्या कोपराखाली एक गाठ झाली. भक्तांच्या आग्रहाखातर अनेकदा शस्त्रक्रिया करूनही काही उपयोग झाला नाही. हात काढून टाकावा लागेल असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. तेव्हा त्याला संमती न देता महर्षींनी सांगितले की, “आपले शरीर हाच मुळी एक रोग आहे, त्यामुळे रोगावलेला हात काढून काय साध्य होणार? त्यापेक्षा शरीराला त्याचा नैसर्गिक अंत येऊ देत”. अशातच कर्करोगाचे निमित्त होऊन त्यांनी देह सोडला.

ग्रंथसंपदा : रमण महर्षींनी स्वतः होऊन ग्रंथ लिहिले नाही. त्यांनी क्वचितच लेखन केले. शास्त्रांचे अध्ययनही त्यांनी फारसे केले नाही. स्वानुभवातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा त्यांनी उपदेश केला आणि शिष्यांनी त्यांच्या विचारांना ग्रंथरूप दिले. भक्तांच्या विनवणीखातर ते तमिळ, संस्कृत, तेलुगू आणि मलयाळम् भाषेत जे जे बोलले, ते ते भक्तांनी लिहून ठेवले. पुढे मग ४० श्लोकांची त्यांची ‘उल्लदू नारपडू’ ही ‘अस्तित्व आणि सत’ विषयीची महर्षींची रचना खूप महत्त्वाची म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांनी सांगितलेले वेदान्ताचे तत्त्व उपदेशसारमनामक पुस्तकात आहे. कर्मभूमी अरुणाचलला उद्देशून त्यांनी सूक्ते रचली. त्यांचे श्रीसद्‌दर्शन, रमणगीता, उपदेशसार आणि रमणोपनिषद इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पॉल ब्रंटन यांनी आपल्या इन सर्च ऑफ सीक्रेट इंडिया, द सीक्रेट पाथ आणि मेसेज फ्रॉम अरुणाचल या पुस्तकांमध्ये महर्षींचे विचार आणि त्यांचे जीवन यांविषयी सुंदर मांडणी केलेली आहे. आर्थर ओस्बोर्न यांनी संपादित केलेल्या द कलेक्टेड वर्क्स ऑफ रमण महर्षी या ग्रंथात महर्षींचे विचार त्यांच्याच शब्दात इंग्रजी भाषेत व्यक्त केलेले आहेत.

तत्त्वज्ञान : ‘ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधै: पृथक्…’ असे गीतेत म्हटल्याप्रमाणे कोणताही नवीन विचार, नवीन संप्रदाय किंवा पंथ स्थापन न करता वेदान्ताचे सनातन सत्य आणि तत्त्वज्ञान महर्षींनी सोप्या भाषेत समजावले. ते म्हणत, “ईश्वरार्पित कर्म करणे हेच मुक्तीचे साधन आहे, मनाची एकाग्रता हेच भक्ति, योग आणि ज्ञानमार्ग आहे”. तसेच त्यांनी आपल्या उपदेशातून आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगितला जो स्थूलमानाने अद्वैत वेदान्ताला अनुसरणारा आहे. त्यांच्या शिष्यवर्गात अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत इ. विविध मार्गांच्या व्यक्तींचा अंतर्भाव होता. शिष्यांनी त्यांना ‘भगवान’, ‘महर्षी’ इ. उपाधी दिल्या होत्या, तसेच ते स्कंदाचे अवतार असल्याचेही मानले होते.

संदर्भ :

  • Mahadevan, T. M. P.  Raman Maharashi and His Philosophy of Existence, Madras, 1960.
  • Osborn, A. Ed. The Collected Works of Raman Maharshi, Tiruvannamalai, 1968.
  • जोशी, गजानन ना. भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास खंड ११ : आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक, पुणे, १९९५.
  • थत्ते, यदुनाथ, आधुनिक भारत महर्षी, पुणे, १९६५.
  • भिडे, रा. गो. भगवान रमण महर्षी, १९५३.

                                                                                                                                                                         समीक्षक – संगीता पांडे

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा