
सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मृदा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने पर्यावरण दूषित बनते. प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास अशी पर्यावरण स्थिती सजीवांना अपायकारक बनते. प्रदूषण बहुतकरून मानवी कृतींमुळे घडून येते.
ऐतिहासिक काळापासून हवेतील प्रदूषण आणि मानवी संस्कृती यांचा परस्परांशी संबंध आहे. इतिहासपूर्व काळात मानवाला अग्नीचा शोध लागल्यानंतर त्याने अग्नीचा वापर सुरू केला आणि तेव्हापासून प्रदूषणाला सुरुवात झाली असे म्हणता येईल. प्राचीन गुहांच्या छतांवर आढळलेले काजळीचे थर याची साक्ष देतात. त्यानंतर मानवाने धातू वितळविण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे बाहेरील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली. तेव्हापासून प्रदूषणात निरंतरपणे वाढ होत राहिली आहे. जगातील मोठमोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढल्याने लाकूड व दगडी कोळसा यांचा इंधन म्हणून वापर वाढला. तसेच वाहतुकीसाठी घोड्यांचा होत असलेला वापर यांमुळे शहरे प्रदूषणमय व ओंगळ झाली. औद्योगिक वाढीमुळे असंस्कारित रसायने व अपघटके स्थानिक जलप्रवाहात सोडली जाऊ लागली. अणुविज्ञानाच्या विकासानंतर अणुतंत्रज्ञानावर आधारित संयंत्रे विकसित झाली आणि त्याबरोबर किरणोत्सारी प्रदूषके वातावरणात मिसळण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर अणुचाचण्या आणि अण्वस्त्रांच्या परिणामांचे अहवाल ज्ञात झाल्यानंतर प्रदूषणाची तीव्रता लोकांना लक्षात येऊ लागली. मागील काही दशकांत आंतरराष्ट्रीय आपत्ती ठरणाऱ्या तेलगळतीच्या व वायुगळतीच्या घटना घडल्यामुळे लोक सजग झाले आहेत.

प्रदूषण हे मुख्यत: रासायनिक पदार्थांच्या रूपात असते. वातावरणात रसायने आणि धूलिकण मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होते. या रसायनांमध्ये उद्योग आणि मोटारी यांद्वारे निर्माण झालेले कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, क्लोरोफ्ल्युओरोकार्बन संयुगे, नायट्रोजनाची ऑक्साइडे इ. वायूंचा समावेश होतो. मृदेमध्ये सोडलेली रसायने किंवा सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतून झालेली गळती यांमुळे मृदा प्रदूषित होते. तसेच हायड्रोकार्बने, जड धातू, कीडनाशके, तणनाशके, क्लोरीनयुक्त हायड्रोकार्बने इत्यादींमुळे मृदा प्रदूषित होते. औद्योगिक क्षेत्रातून सोडलेले सांडपाणी, कोणतीही प्रक्रिया न करता मोकळ्यावर सोडलेले सांडपाणी, प्रक्रिया केल्यानंतर सोडलेले क्लोरीनयुक्त पाणी इ. जलस्रोतात मिसळल्याने जल प्रदूषण होते (पहा कु.वि. भाग २: जल प्रदूषण). तसेच पर्यावरणात प्लॅस्टिक साचून राहिल्यास त्याचा वार्इट परिणाम तेथील सजीव, त्यांचा अधिवास आणि मानवी जीवन यांवर होत असतो. मोकळ्या जागेवर फेकलेले अन्न, मलमूत्र, रसायने, तुटलेल्या वस्तूंचे ढिगारे, इलेक्ट्रॉनिक कचरा इ. जैविक आणि अजैविक अपशिष्टांमुळे प्रदूषणाच्या जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अणुऊर्जानिर्मिती व अण्वस्त्रनिर्मिती यांकरिता केले जाणारे संशोधन यांमुळे पर्यावरणात किरणोत्साराचे प्रमाण वाढले आहे.
प्रदूषण हे केवळ रासायनिक पदार्थांच्या रूपात नसून ध्वनी, उष्णता किंवा प्रकाश अशा ऊर्जेच्या रूपात देखील असते. या ऊर्जांच्या बाबतीत, त्यांच्या सामान्य पातळीपेक्षा अतिरिक्त वाढ झाली तर प्रदूषण होते. रस्त्यांवरील वाहने, आकाशात भरारी घेणारी विमाने, औद्योगिक क्षेत्र, बांधकाम इत्यादींमुळे ध्वनी प्रदूषण होते (पहा कु.वि. भाग २: ध्वनी प्रदूषण). ध्वनी प्रदूषणाला मुख्यत: मोटारी कारणीभूत असून सु. ९०% अनावश्यक आवाज निर्माण होत असतो. औष्णिक विद्युत् केंद्रासाठी जलस्रोतांचे पाणी वापरल्यामुळे पाण्याच्या तापमानात बदल होऊन औष्णिक प्रदूषण होते. अतिप्रकाश आणि खगोलीय व्यतिकरणामुळे प्रकाशाचे प्रदूषण होते. एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या विजेच्या टांगत्या तारा, जाहिरातींचे मोठे फलक, ओबडधोबड जमीन इ. बाबी नजरेला खटकतात व परिसराचे सौंदर्यमूल्य घटते. याला दृक् प्रदूषण म्हणता येईल. तसेच प्रदूषण केवळ पर्यावरणात नाही तर घरात देखील असू शकते.
ज्या पदार्थामुळे किंवा अतिरिक्त ऊर्जेमुळे पर्यावरण दूषित होते अशा कारकाला ‘प्रदूषक’ म्हणतात. प्रदूषके पर्यावरणातील प्रक्रियांतून निर्माण झालेली असतात आणि ती स्थायू, वायू किंवा द्रव अवस्थेत असतात. अशा प्रदूषकांची तीव्रता तीन बाबींनुसार निश्चित होते : (१) प्रदूषकांचे रासायनिक स्वरूप, (२) प्रदूषकांची संहती म्हणजे परिसरात असलेले प्रदूषकांचे प्रमाण, (३) प्रदूषकांचे सातत्य म्हणजे परिसरात प्रदूषके किती काळ निर्माण होतात आणि टिकून असतात याचा कालावधी.
पर्यावरणात प्रदूषके किती प्रमाणात शोषली जाऊ शकतात यावरून त्यांचे दोन प्रकार केले जातात : (१) काही प्रदूषकांच्या बाबतीत पर्यावरणाची शोषणक्षमता खूप कमी असते किंवा मुळीच नसते. उदा., कृत्रिम रसायने, जड धातू, अजैविक अवनत-अक्षम प्रदूषके. अशी प्रदूषके पर्यावरणात खूप काळ साचून राहतात आणि त्यांच्यापासून जादा प्रदूषके निर्माण होत राहतात. त्यांमुळे पर्यावरणाची हानी वाढतच राहते. या प्रदूषकांना ‘साठा प्रदूषके’ म्हणतात. (२) काही प्रदूषके पर्यावरणामध्ये शोषली जातात. अशा प्रदूषकांना ‘निधी प्रदूषके’ म्हणतात. मात्र पर्यावरणाच्या शोषणक्षमतेपलीकडे अशा प्रदूषकांचे प्रमाण वाढले तर पर्यावरणाला बाधा पोहोचते. उदा., पर्यावरणात तयार झालेला कार्बन डायऑक्साइड वायू प्रकाशसंश्लेषण क्रियेत वनस्पतींकडून शोषला जातो. तसेच महासागरांमार्फत जैविक आणि रासायनिक प्रक्रियांद्वारे तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पाण्यात विरघळला जातो. त्यामुळे त्याची पातळी स्थिर राहते. ज्या प्रदेशांत वनस्पती कमी प्रमाणात असतात तेथे कार्बन डायऑक्साइड वाढून तेथील पर्यावरणास घातक ठरू शकतो. काही निधी प्रदूषकांचे रूपांतर कमी घातक असलेल्या पदार्थांमध्ये होत राहते.
प्रदूषण समाजाच्या दृष्टीने खर्चिक असते, हे आता मान्य झाले आहे. उदा., एखाद्या कारखान्यात निघणाऱ्या उत्पादनांमुळे त्या परिसरातील नदी दूषित होऊ शकते. नदीमुळे शेतीसाठी सुपीक जमीन उपलब्ध होते. तसेच हॉटेल, वाहतूक, बोटिंग, इत्यादींद्वारा रोजगार उपलब्ध होतात. नदी प्रदूषित झाल्यास शेतीचे नुकसान होते व स्थानिक नगरपालिकांचा महसूल घटतो. याखेरीज नदी स्वच्छ करून परिसर सुशोभित करण्यासाठी खर्च करावा लागतो. अशा खर्चाला ‘बाह्य परिव्यय’ म्हणतात, कारण कारखान्याने वस्तुनिर्मिती करताना प्रदूषणाचा खर्च विचारात घेतलेला नसतो. कारखाने सामान्यपणे यंत्रे, उपकरणे, कामगार व कच्चा माल यांवरील खर्च म्हणजे फक्त ‘खाजगी परिव्यय’ विचारात घेतात. समाजाला पडतो तो खर्च खाजगी परिव्यय आणि बाह्य परिव्यय यांनी मिळून होणारा सामाजिक परिव्यय असतो. जागतिक अर्थशास्त्रामध्ये सामाजिक परिव्यय ही महत्त्वाची कल्पना गेल्या काही वर्षांत पुढे आली आहे आणि त्यामुळे प्रदूषणाचे आर्थिक उपद्रव मूल्यही स्पष्ट झाले आहे.
प्रदूषणाचे स्रोत : हवा प्रदूषणाचे स्रोत नैसर्गिक तसेच मानवी असतात. मात्र ज्वलन, बांधकाम, खाणकाम, कृषी उद्योग आणि युद्धसाहित्य निर्मिती इ. मानवी कृतींमुळे हवेच्या प्रदूषणात भर पडत आहे. चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, भारत, मेक्सिको आणि जपान हे देश हवा प्रदूषणाच्या उत्सर्जनात आघाडीवर आहेत. याखेरीज रासायनिक कारखाने, कोळशावर चालणारे विद्युत् केंद्र, तेल शुद्धीकरण केंद्र, अणुकेंद्रकीय अपशिष्ट निर्मूलन प्रक्रिया, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन इ. मोठे व्यवसाय, प्लॅस्टिक उद्योग, धातुनिर्मिती केंद्र व अन्य जड उद्योग हवा प्रदूषणाचे स्थायी स्रोत आहेत. मागील ५० वर्षांत झालेल्या जागतिक तापनवाढीला मानवी कृती कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.
मृदेचे प्रदूषण तिच्यात मिसळलेले धातू (विजेरीत असलेले क्रोमियम व कॅडमियम धातू, रंग आणि हवाई इंधनात मिसळलेले शिसे, जस्त, आर्सेनिक इ. धातू), ईथर गटातील संयुगे आणि बेंझीन यांमुळे होत असते. औद्योगिक क्षेत्रातील जोडउत्पादितांचे पुनर्चक्रीकरण करून खते तयार केल्याने या प्रदूषणात वाढ होते, असे दिसून आले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांमुळे प्रदूषण होत असते. उदा., चक्री वादळामुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने पिण्याचे स्रोत दूषित होतात किंवा तेलवाहू जहाजे व मोटारी यांतून सांडलेल्या तेलामुळे पाणी दूषित होते. अणुऊर्जानिर्मिती केंद्र किंवा तेलवाहू वाघिणी यांचे अपघात झाल्यास घातक पदार्थ पर्यावरणात सोडले जातात. याशिवाय नैसर्गिक घटनांमुळे प्रदूषणात थेट वाढ होते. उदा., वणवा, ज्वालामुखीचा उद्रेक, वाऱ्याने होणारी धूप, हवेत पसरलेले परागकण, नैसर्गिक किरणोत्सारिता इत्यादी. मात्र या घटना वारंवार घडत नाहीत.
पर्यावरणीय ऱ्हास : जल, हवा व मृदा यांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घटते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या अतिरिक्त वाढीमुळे धूर व धूके एकत्रित होऊन धुरके निर्माण होते. त्यामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचण्यात व प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो. लंडन शहरात धुरक्यामुळे सु. ४,००० लोक १९५२ मध्ये मृत्युमुखी पडले होते. हवेत मिसळलेले सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड इ. वायूंमुळे आम्लवर्षा होते. हवेची गुणवत्ता घटल्यास मनुष्याला श्वसनाचे वेगवेगळे विकार होतात. छातीत वेदना होणे, छाती भरून येणे, घसादाह होणे, हृदयविकार इ. विकार हवा प्रदूषणामुळे होतात. जल प्रदूषण व तेलगळती या कारणांमुळे अनेक सजीव मृत्युमुखी पडतात. जल प्रदूषणामुळे त्वचारोग, तसेच मृत्यूस कारणीभूत ठरणारे अनेक आजार उद्भवतात. ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा येतो, ताण वाढतो आणि निद्रानाश जडतो.
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे खासकरून कार्बन डायऑक्साइडमुळे जागतिक तापन होते. उद्योग व वाहने यांची वाढ, प्रचंड प्रमाणात केली जाणारी वृक्षतोड यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होऊन कार्बन डायऑक्साइड वायूची भर पडत आहे. त्यामुळे धुव्रीय हिमनग वितळत आहेत. सागरजल पातळीत वाढ होऊन काही किनारी प्रदेशांतील लोक आणि परिसंस्था यांना धोका निर्माण झाला आहे. वातावरणात मिसळलेली विविध रसायने विशेषेकरून क्लोरोफ्ल्युओरोकार्बन वायूंच्या वापरामुळे ओझोन स्तराचा अवक्षय होत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होतो. कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर वाढल्यामुळे वनस्पतींची वाढ अपुरी होते किंवा योग्य होत नाही. औद्योगिक क्षेत्रातून सोडलेल्या अपशिष्टांमुळे मृदेची गुणवत्ता कमी होत आहे.
प्रदूषण नियंत्रण : प्रदूषण कमी करण्यासाठी अपशिष्टांचे केलेले व्यवस्थापन म्हणजे प्रदूषण नियंत्रण. मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांची गुणवत्ता प्रदूषण नियंत्रणावर अवलंबून असते. प्रदूषण नियंत्रण सामान्यपणे पुढील प्रकारांनी करता येते : प्रदूषण करणारे उद्योग कमी करणे, औद्योगिक क्षेत्रांतून प्रदूषके कमीत कमी बाहेर पडतील अशा आधुनिक पद्धती वापरणे, प्रदूषकांची संहती कमी करण्यासाठी ती मोठ्या क्षेत्रात पसरविणे, अपशिष्टे पर्यावरणात सोडण्यापूर्वी त्यांवर प्रक्रिया करून ती सौम्य करणे. यांखेरीज वापरलेल्या वस्तूंचे पुनर्चक्रीकरण, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर, अपशिष्टांची किमान निर्मिती, प्रदूषण रोखणे अशा कृतींद्वारा प्रदूषण कमी करता येते. जगातील अनेक देशांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न केले जात आहेत. हवा व जल यांचे प्रदूषण आणि क्लोरोफ्ल्युओरोकार्बन वायूंचा वापर कसा कमी करता येईल यांसंबंधी वैज्ञानिक संशोधन करीत आहेत. इंधन बचत करण्यासाठी विजेवर चालणारी वाहने तयार केली जात आहेत. औद्योगिक अपशिष्टांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन पद्धती शोधल्या गेल्या आहेत. कृषिक्षेत्रात कमी खते व कीटकनाशके वापरून अधिक उत्पादन देणाऱ्या जैवतंत्रज्ञानाद्वारे वनस्पतींच्या जाती शोधून काढण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून चक्रीय पीकपद्धतीचा स्वीकार केला जात आहे.
भारतातील प्रदूषण-उपशमन : प्रदूषणाची तीव्रता कमी करणे व त्याचा पर्यावरणातील प्रभाव मर्यादित राखून प्रदूषकांची विल्हेवाट लावणे याला ‘प्रदूषण-उपशमन’ म्हणतात. पर्यावरणातील हवा, जल, मृदा इत्यादींचे प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारने १९९२ मध्ये प्रदूषण-उपशमन धोरण स्वीकारले आहे. या धोरणांतर्गत प्रदूषण नियंत्रणाचे उपाय आणि धोरण प्रभावी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वाहनांतून उत्सर्जित होणाऱ्या वायूंवर नियंत्रण, वायू प्रदूषण व जल प्रदूषण यांवर नियंत्रण, ध्वनी प्रदूषकांचे उपशमन व निवारण इत्यादींबाबत निरनिराळे उपाय सुचविण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवर प्रदूषित क्षेत्रांची यादी करणे, पर्यावरण सुधारण्यासाठी योजना आखणे इ. बाबी या धोरणामध्ये समाविष्ट आहेत. २००६ मध्ये राष्ट्रीय पर्यावरण धोरण ठरविण्यात आले असून त्याअंतर्गत राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्रीय प्रदूषण मंडळ मार्गदर्शन करते. हे मंडळ हवा प्रदूषण व जल प्रदूषण उपशमनाबाबत सरकारला सल्ला देते. सर्व राज्यांनी राज्य प्रदूषण मंडळांची स्थापना केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या उपयोजनाद्वारे प्रदूषण-उपशमन करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात. प्रदूषणाला प्रतिबंध कसा करावा आणि व्यवस्थापन कसे करावे यांसंबंधी काही संस्था व संघटना अभ्यास करीत आहेत. प्रत्येक नागरिकांनी देखील वैयक्तिक पातळीवर प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी प्रयत्नशील असणे महत्त्वाचे आहे.
(पहा: अंतर्गेही प्रदूषण; औष्णिक प्रदूषण; जल प्रदूषण; जागतिक तापन; ध्वनी प्रदूषण; मृदा प्रदूषण; हवा प्रदूषण)
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
खुपच छान सर
खुपच छान सर
अशी मला अधिक माहिती हवी
ग्रुप ला जॉईन करा
Mo.8888406031