जर्मनीमधून वाहणारी, ऱ्हाईन नदीची प्रमुख उपनदी. जर्मनीच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या या नदीचा उगम झॅउरलँड या डोंगराळ प्रदेशात, विंटरबर्ग या नगराजवळ, सस.पासून ७२४ मी. उंचीवर होतो. नदीची लांबी २३५ किमी. आणि जलवाहन क्षेत्र सु. ४,५०० चौ.किमी. आहे. उगमानंतर ती प्रथम वायव्येस आणि त्यानंतर वृक्षराजीने संपन्न असलेल्या खोल दरीतून अनेक नागमोडी वळणांनी पश्चिमेस वाहत जाऊन रूरॉट आणि ड्युइसबर्ग या शहरांच्या दरम्यान, सस.पासून १७ मी. उंचीवर, उजवीकडून ऱ्हाईन नदीस मिळते. नदीला हिवाळ्यात अधिक तर उन्हाळ्यात कमी पाणी असते. शरद ऋतूत नदीला अचानक पूर येतात. मुखाजवळ तिच्यातील सरासरी प्रवाहमान प्रतिसेकंद सु. ७९ घ.मी. असते. नदीवर बांधलेल्या धरणामुळे अनेक जलाशय निर्माण झाले आहेत. नदीखोऱ्यातील लोकांना पिण्यासाठी तसेच कारखान्यांसाठी या नदीतून पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिला विशेष महत्त्व आहे. व्हिटन शहरापासून खाली जलपाश मालिकांच्या माध्यमातून रुर नदीतून जलवाहतूक केली जाते. रुर नदीखोऱ्याच्या दक्षिण भागात कृषी आणि वनांखालील क्षेत्र अधिक असून ईशान्य भागात नागरीकरण आणि औद्योगीकीकरण अधिक आढळते. व्हिटन, एसेन आणि म्यूलहाईम ही नदीतीरावरील प्रमुख शहरे असून मुखाजवळील ड्युइसबुर्क हे प्रमुख बंदर आहे. मॉन आणि लेन या रुरच्या प्रमुख उपनद्या आहेत.

पश्चिम जर्मनीतील नॉर्थ ऱ्हाईन – वेस्टफेलिया राज्यातील रुर खोऱ्यात प्रमुख औद्योगिक व खाणकाम  विभाग आहे. हा औद्योगिक विभाग जगातील सर्वांत मोठ्या औद्योगिक विभागांपैकी एक असून रुर नदीच्या नावावरूनच हा औद्योगिक विभाग ओळखला जातो. एसेन, ड्यूसेलडॉर्फ आणि डॉर्टमुंड ही या विभागातील प्रमुख औद्योगिक नगरे आहेत. या औद्योगिक विभागाच्या विकासास प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरुवात झाली. एकविसाव्या शतकात या प्रदेशातील परंपरागत अवजड उद्योगाशिवाय पोलाद, बहुविध रासायनिक उत्पादने, इलेक्ट्रॉनिकी वस्तूनिर्माण इत्यादी उद्योगांना सुरूवात झाली. भौगोलिकदृष्ट्या या औद्योगिक विभागाचा विस्तार पश्चिमेस ऱ्हाईन नदीच्या डाव्या तीरापासून पूर्वेस हॅम शहरापर्यंत आणि दक्षिणेस रुर नदीपासून उत्तरेस लिप शहरापर्यंत झालेला आहे. या औद्योगिक पट्ट्यात ऱ्हाईनच्या तीरावरील क्रेफेल्ट आणि ड्यूसेलडॉर्फ शहरांचा तसेच ड्यूसेलडॉर्फपासून पूर्वेस व्हुपरटाल, हागन शहरापर्यंतच्या नागरी पट्ट्याचा समावेश होतो. जर्मनीतील हा सर्वांत दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. रुर नदीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली अंतर्गत जलवाहतूकप्रणाली येथील औद्योगिक विकासाला विशेष अनुकूल ठरली आहे. येथे रस्ते, लोहमार्ग आणि कालव्यांचे दाट जाळे निर्माण झाले असून यूरोपातील लोहमार्गांचे सर्वांत दाट जाळे येथेच आढळते.

नदीकाठावरील एसेन शहर

रुर नदीच्या खोऱ्यातील रुर कोळसा क्षेत्र हे जगातील सर्वांत मोठ्या कोळसा क्षेत्रांपैकी एक आहे. विशेषतः जर्मनीतील बिट्युमेनी प्रकारच्या कोळशाचे सर्वांत मोठे साठे येथे आहेत.

रुर नदीपात्रात असलेल्या अनेक द्रुतवाहांमुळे नदीत पोहणे शक्य होत नसले तरी, ‘वॉटर राफ्टिंग’साठी नदी सोयीची आहे. जर्मनीतील मॉनशाऊ या शहराजवळ आंतरराष्ट्रीय वार्षिक व्हाईट वॉटर राफ्टिंग शर्यती घेतल्या जातात.

पुराणाश्मयुगापासून रुर नदीच्या खोऱ्यात मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळतात. मध्ययुगीन काळापासून येथे कोळसा खाणकाम चालत होते. पहिल्या महायुद्धकाळात लष्करी दृष्ट्या ही नदी विशेष महत्त्वाची होती. १९२३ ते १९२५ या कालावधीत रुर नदीचे खोरे फ्रान्स आणि बेल्जियम यांनी काबीज केले होते. हे खोरे नाझीचे प्रमुख औद्योगिक केंद्र होते. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी या क्षेत्रावर बाँबहल्ला करून त्याचा ताबा घेतला होता. १९५४ मध्ये पुन:श्च या प्रदेशाचा ताबा पश्चिम जर्मनीकडे आला.

१९६० आणि १९७० च्या दशकांत जर्मनीतील बऱ्याच कोळसा खाणींतील अशुद्ध पदार्थ वेगवेगळ्या मार्गांनी रुर नदीच्या पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित होऊन पाण्यात मासे व इतर कोणतेही जलचर प्राणी  जिवंत राहू शकत नव्हते. नंतर काही खाणी बंद झाल्यानंतर आणि सांडपाण्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करण्यात आल्याने पाण्याच्या गुणवत्तेत बरीच सुधारणा झाली. नदीचा खालचा टप्पा अद्याप दूषित आहे. वरच्या टप्प्यातील पाणी मात्र स्वच्छ झाले आहे.  त्यामुळे त्यात ट्राउट आणि इतर तीसपेक्षा अधिक माशांच्या प्रजातींची परत पैदास झाली.

समीक्षक – वसंत चौधरी