इटलीच्या उत्तर भागातून वाहणारी पो नदीची उपनदी. लांबी ३१३ किमी. नदीखोर्‍याचा विस्तार ७,९७९ चौ. किमी. स्वित्झर्लंडच्या सरहद्दीजवळ रीशन आल्प्स पर्वतात स. स. पासून २,३३५ मी. उंचीवरील काही सरोवरांतून तिचा उगम होतो. तिच्या मूळ प्रवाहात पाण्याचे प्रमाण कमी असते; परंतु बॉर्म्यो नगराजवळ तिला काही प्रवाह येऊन मिळतात. तेथपासून तिच्या पाण्यात वाढ होते. नदीच्या वरच्या भागाला व्हाल्टेलीना प्रदेश म्हणून ओळखले जाते. बॉर्म्योच्या पुढे प्रथम ती दक्षिणेस व त्यानंतर व्हाल्टेलीना या सुपीक प्रदेशातून पश्चिमेस वाहत जाते. तिरानो नगराच्या पुढे तिला उजवीकडून पॉस्क्याव्हीनॉ ही उपनदी मिळते. त्यानंतर साँद्रिओ येथे उजवीकडून येणार्‍या मालेरो आणि आद्दा या नद्यांचा संगम होतो. येथपर्यंतचा आद्दाचा प्रवाहमार्ग म्हणजे उत्तर इटलीतून पूर्व-पश्चिम वाहणारी ही एकमेव सर्वांत मोठी नदी आहे.

साँद्रिओच्या पुढे आद्दा नदी कॉमो सरोवरातून वाहते. किंबहुना या सरोवराची निर्मितीच मुख्यत: या नदीमुळे होते. कॉमो सरोवराच्या उत्तर टोकाशी ती सरोवरात येते. याच सरोवराच्या आग्नेयकडील लेको फाट्यातून बाहेर पडल्यानंतर लाँबर्डी मैदानातून वाहत असताना ब्रेम्बॉ व सेरीऑ या उपनद्या डावीकडून येऊन मिळतात. त्यानंतर सुमारे २४० किमी. वाहत गेल्यानंतर क्रेमोना नगरापासून १३ किमी. वरच्या बाजूस ती पो नदीला मिळते.

आद्दा नदीवर ट्रेत्सॉ सूलाद्दा पूल

आद्दा नदीवर पादेर्नो  येथे ७२ मी. लांबीचा ट्रेत्सॉ सूलाद्दा हा लोखंडी कमानीवर उभारलेला नाविन्यपूर्ण पूल आहे. इ. स. १३७७ मध्ये हा बांधला असून बांधकामासाठी धातूचा वापर सुरू होण्यापूर्वीच्या काळात तो उभारला आहे. त्या काळातील अशा प्रकारच्या पूल उभारणीचे हे वैशिष्ट्य होते. पाँते सान मिचेल हा नदीवरील दुसरा पूल.

आद्दा नदीच्या काठावर अनेक महत्त्वपूर्ण लढाया लढल्या गेल्या आहेत. उदा., लॉडी येथील १७९६ च्या युद्धात नेपोलियनने ऑस्ट्रीयनांचा पराभव केला होता. नदीकाठावरील कसानो दाद येथे आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरातही काही लढाया लढल्या गेल्या आहेत. आद्दा नदीच्या काठावर लेको, लॉडी, साँद्रीओ, बॉर्म्यो, ब्रीव्यॉ, बेलाजॉ, तिरानो ही नगरे आहेत. यांपैकी बोलजॉ व लेको ही दोन नगरे कॉमो सरोवराच्या काठावर आहेत. खालच्या टप्प्यातील ८० किमी. च्या प्रवाहातून जलवाहतूक चालते. व्हाल्टेलीना प्रदेशात जलविद्युत निर्मितीसाठी, तर लाँबर्डी मैदानावरील जलसिंचनासाठी या नदीचा उपयोग केला जातो.

समीक्षक : अविनाश पंडित