अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी नेव्हाडा राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. या नदीची लांबी सुमारे ४८० किमी. असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४३,६१५ चौ. किमी. आहे. नेव्हाडा राज्यातील ही सर्वांत मोठी नदीप्रणाली असून तिने प्रामुख्याने उत्तर-मध्य नेव्हाडाचे जलवाहन केले आहे. उत्तर अमेरिकेतील ग्रेट बेसिन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विस्तृत प्रदेशात ही नदीप्रणाली आहे. उत्तर-मध्य नेव्हाडातील एल्को परगण्यात ईस्ट फॉर्क व नॉर्थ फॉर्क या दोन नद्यांच्या संगमानंतरचा संयुक्त प्रवाह हंबोल्ट या नावाने ओळखला जातो. हंबोल्ट नदीच्या शीर्षप्रवाहांचा तसेच तिच्या अनेक उपनद्यांचा उगम रूबी, जर्बिज, इन्डिपेन्डेन्स आणि ईस्ट हंबोल्ट या पर्वतश्रेण्यांमध्ये होतो. यातील बहुतांश पर्वतीय प्रदेश ‘हंबोल्ट-टॉइयाबी नॅशनल फॉरेस्ट’मध्ये आहे. हंबोल्ट नदी अनेक नागमोडी वळणांनी प्रथम पश्चिमेस, विनमका शहरापासून नैऋत्येस व त्यानंतर दक्षिणेस वाहत जाऊन हंबोल्ट सरोवराला मिळते. अधूनमधून कोरड्या पडणाऱ्या व हंबोल्ट सिंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सरोवरातून बाहेर पडणारा प्रवाह नाही.

हंबोल्ट नदी कार्लन शहराजवळ कार्लन कॅन्यनमधून, तर उत्तर युरीका परगण्यात ती पॅलसेड कॅन्यनमधून वाहते. भौगोलिक दृष्ट्या पॅलसेड कॅन्यन व एमग्रंट कॅन्यनवरून नदीचे तीन टप्प्यांत वर्गीकरण केले जाते. त्यांपैकी पॅलसेड व एमग्रंट कॅन्यन यांदरम्यानचा मधला टप्पा मानला जातो; परंतु नदीतील पाण्याच्या प्रमाणावरून हंबोल्ट नदीखोरे दोन भागांत विभागले जाते. पॅलसेडपासून उगमापर्यंतचे वरचे खोरे, तर पॅलसेडपासून हंबोल्ट सरोवरापर्यंतचे खालचे खोरे मानले जाते. बिशप क्रीक, मेरीझ, लमॉइल, नॉर्थ फॉर्क हंबोल्ट, साउथ फॉर्क हंबोल्ट, सूसी

राइ पॅच धरण

क्रीक व मागी क्रीक या हंबोल्टच्या वरच्या खोऱ्यातील, तर पाइन क्रीक, रीस व लिटल हंबोल्ट या खालच्या खोऱ्यातील प्रमुख उपनद्या आहेत. पर्वतीय प्रदेशांतील बर्फ वितळून हंबोल्ट नदीला व तिच्या उपनद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ऋतुनुसार तिच्या पाण्याच्या पातळीत फरक पडतो. या नदीवर इ. स. १९३६ मध्ये बांधलेल्या आणि १९७६ मध्ये विस्तार करण्यात आलेल्या राइ पॅच धरणामुळे राइ पॅच जलाशयाची निर्मिती झालेली आहे. लव्हलॉक शहराच्या उत्तरेस ४२ किमी.वर हे धरण आहे. जलसिंचन, जलवाहतूक, उद्योग व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने हे धरण आणि ही नदी उपयुक्त ठरली आहे. एल्को, कार्लन, बॅटल मौंटन, विनमका, लव्हलॉक ही या नदीच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.

हंबोल्ट नदीला वेगवेगळ्या कालखंडात अज्ञात नदी, पॉल्झ, मेरीझ, सेंट मेरीझ, स्वँपी, बॅरन, ऑग्डेन्स अशा विविध नावांनी ओळखले जात असे. इ. स. १८४५ मध्ये अमेरिकन लष्करी अधिकारी, राजकारणी व समन्वेषक जॉन सी. फ्रेमाँट यांनी जर्मन समन्वेषक व निसर्गवैज्ञानिक अलेक्झांडर फोन हंबोल्ट यांच्या नावावरून या नदीला सांप्रतचे हंबोल्ट हे नाव दिले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस फरयुक्त प्राण्यांची पारध करण्यासाठी यूरोपीय अमेरिकन वसाहतकारी या प्रदेशात यईपर्यंत बाहेरच्या लोकांना या प्रदेशाविषयी विशेष माहिती नव्हती. ब्रिटिश–कॅनडियन फर व्यापारी, हडसन्स बे कंपनीचा अधिकारी आणि समन्वेषक पीटर स्केन ऑग्डेन यांनी इ. स. १८२८ मध्ये पहिल्यांदा या नदीखोऱ्याचा प्रदेश पाहिला. ऑग्डेन यांनी या प्रदेशाचे समन्वेषण करून या प्रदेशाचा पहिला नकाशा तयार केला. त्यांनीच या नदीचा ‘अज्ञात नदी’ असा उल्लेख केला. ग्रेट बेसिनमधील हा एकमेव नैसर्गिक वाहतूक मार्ग असून इतिहासकाळात पश्चिमेकडे स्थलांतर करणाऱ्यांसाठी हा मार्ग विशेष उपयुक्त ठरला आहे. त्याचप्रमाणे नदीच्या प्रवाहमार्गाला अनुसरून काढलेला रस्ता व लोहमार्ग हे पूर्वीपासून वाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे ठरले आहेत. विशेषत: इ. स. १८४८ मध्ये कॅलिफोर्नियात लागलेल्या सोन्याच्या खाणींच्या शोधापासून तर या मार्गांचे महत्त्व अधिकच वाढले. येथून जाणारा आंतरखंडीय लोहमार्ग इ. स. १८६९ मध्ये पूर्ण झाला.

समीक्षक : वसंत चौधरी