स्पॅनिश रिओ चॅग्रेस, पनामा देशातील तसेच पनामा कालवा प्रणालीतील एक प्रमुख नदी. तिचा बराचसा प्रवाहमार्ग पनामा कालव्याला अनुसरून वाहत असून ती पनामा कालव्याचा अविभाज्य भाग आहे. या नदीची एकूण लांबी १९३ किमी. असून तिचे पाणलोट क्षेत्र ३,२६२ चौ. किमी. आहे. तिचा उगम देशाच्या ईशान्य भागात असलेल्या कॉर्डिलेरा दे सॅन ब्लास या पर्वतात होतो. उगमानंतर माडेन धरणापर्यंत ती सामान्यपणे दक्षिणेस वाहत जाते. येथे तिच्यावर जलवाहतूक, पूरनियंत्रण व जलविद्युतशक्ती निर्मितीच्या उद्देशाने इ. स. १९३५ मध्ये माडेन धरण बांधण्यात आले. या धरणामुळे ५७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे माडेन (अलाज्वेला) सरोवर निर्माण झाले आहे. माडेन धरणातून बाहेर पडल्यानंतर काही अंतर पश्चिमेस व त्यानंतर सामान्यपणे दक्षिणेस वाहत जाऊन गॅम्बोआ येथे ती पनामा कालव्याला मिळते. गॅम्बोआपासून पनामा कालव्याचा भाग म्हणूनच प्रथम पश्चिमेस व त्यानंतर वायव्येस गाटून धरणापर्यंत ती वाहत जाते. इ. स. १९१२ मध्ये बांधलेल्या गाटून धरणामुळे गाटून सरोवराची निर्मिती झाली आहे. पनामा कालव्यातील जलवाहतूक, जलविद्युत निर्मिती, तसेच पनामा सिटी व कोलोन या शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हे धरण महत्त्वाचे ठरले आहे. गाटून धरणाच्या पुढे चॅग्रेस नदी पनामा कालवा सोडून तिच्या नैसर्गिक प्रवाहाने वायव्येस वाहत जाऊन फोर्ट सॅन लरेन्झो येथे कॅरिबियन समुद्रात मिळते. त्याचप्रमाणे ही नदी पनामा कालव्यातील जलपाशांच्या माध्यमातून पनामा कालव्यामार्गे वाहत जाऊन लीमॉन उपसागरास मिळते. अशाप्रकारे दोन समुद्रांना मिळणारी ही जगातील एकमेव नदी म्हणावी लागेल.

चॅग्रेस नदीचा वरचा टप्पा पर्वतीय उताराचा आणि ओबडधोबड आहे. तेथे तिच्या पात्रात अनेक धावत्या आढळतात. वरच्या टप्प्यातील तिच्या पीएद्रस, लिंपीओ, चीको, इंडिओ, सॅन ह्वान, बोकरॉन या प्रमुख उपनद्या माडेन सरोवरात मिळतात. नदीच्या वरच्या खोऱ्यात उष्णकटिबंधीय दाट वने असून हा संपूर्ण भाग चॅग्रेस राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट करण्यात आला आहे. येथील वनांचे, तसेच त्यांतील परिसंस्थांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने १९८५ मध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. जैवविविधतेच्या दृष्टीने या उद्यानाला विशेष महत्त्व आहे. विविध प्रकारच्या पशु-पक्ष्यांचे ते आश्रयस्थान आहे. त्याचप्रमाणे १९८० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सोबेरानिया राष्ट्रीय उद्यानातूनही नदी वाहते.

पनामा कालव्यातून जलवाहतूक सुकर करण्याच्या दृष्टीने आणि त्या अनुषंगाने कालव्यात आवश्यकतेनुसार पुरेसा पाणीपुरवठा करणारा चॅग्रेस नदी हा प्रमुख स्रोत आहे. मूलतः या नदीच्या पात्रात सर्वत्र द्रुतवाह आढळतात. त्यामुळे केवळ कालवा भागाच्या पात्रातूनच जलवाहतूक होते. नदीखोऱ्यातील जंगलतोड नियंत्रण आणि नदीपात्रातील शुद्धता टिकविणे ही मोठी आव्हाने आहेत. जंगलतोडीमुळे उघड्या पडलेल्या उतारांवर मुसळधार पावसाचे पाणी विशेष झिरपू शकत नाही. तसेच जमिनीच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धूपीमुळे पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे सरोवरांत संचयन होऊन सरोवराची खोली कमी होत आहे.

क्रिस्तोफर कोलंबस यांनी इ. स. १५०२ मध्ये या नदीस लागोर्ट्स हे नाव दिले. स्पॅनिश कमांडर द्देगो क्वेतो व त्यांचा सुकाण्या (चालक) पेद्रो दे अंब्रिया यांनी इ. स. १५०६ मध्ये या प्रदेशाला भेट दिली. इ. स. १५२७ मध्ये एर्नांदो दे ला सेर्ना यांनी चॅग्रेस नदीचे समन्वेषण करून तिच्या मुखाजवळ सॅन लरेन्झो हा किल्ला बांधला. सध्या तेथे किल्ल्याचे केवळ अवशेष पाहावयास मिळतात.

समीक्षक : वसंत चौधरी