कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा विचार न करता समग्र धर्मसंस्थेचा विचार चिकित्सकपणे करणाऱ्या शास्त्राला धर्माचे तत्त्वज्ञान म्हटले जाते. जीव-जगत्-ईश्वर (जगदीश) यांचा परस्परांशी असणारा संबंध प्रत्येक धर्म स्पष्ट करतो. तो स्पष्ट करत असताना कित्येक कथा, दृष्टांत, चमत्कार, वचने, दाखले देत, भक्तांना साद घालत विशिष्ट मानवसमूहास एकत्रित आणतो, तो धर्म. प्रत्येक  धर्म एक विशिष्ट जीवनपद्धती आखून देतो. आचार-विचार, आहार-विहारांचे नियम सांगतो. प्रत्येक धर्माची किंवा धर्मपंथांची उपासनेची रीत असते.  प्रार्थनामंदिरे असतात. तीर्थयात्रास्थळे असतात. व्रत-वैकल्य, पूजा-अर्चा, प्रार्थना, विधी यांविषयी सांगोपांग माहिती दिली जाऊन सर्वतोप्रकारे धार्मिक जीवन जगण्यास साहाय्य केले जाते. धर्माचे तत्त्वज्ञान अशा धार्मिक जीवनाकडे डोळसपणाने पाहते. कोणत्याही धार्मिक बाबींचा स्वीकार आंधळेपणाने न करता त्याकडे चिकित्सक वृत्तीने पाहते. धर्म म्हणजे काय?, धर्माची अंतर्बाह्य रूपे कोणती?, धर्म व नीती तसेच धर्म व कला, धर्म व विज्ञान यांचा परस्परसंबंध कसा असतो/असावा? यांविषयीचे विवेचन धर्माच्या तत्त्वज्ञानात नि:पक्षपातीपाणे केले जाते. पूजा, प्रार्थना, कर्मकांड सश्रद्ध वृत्तीने करण्यास आडकाठी निश्चितच नसते; परंतू त्यामागील कारणमीमांसा समजून घेऊन सर्व धार्मिक क्रियांची सयुक्तिकता व फोलपणा (वैयर्थ्य) उलगडून दाखविले जाते. विशिष्ट धर्माच्या चौकटीत विचार न करता धार्मिकतेचा येथे ऊहापोह केला जातो. ईश्वरी अस्तित्व सिद्ध करण्याकरिता जे युक्तिवाद केले जातात, त्यांची वैधता तपासली जाते. ईश्वर सर्वत्र असूनही, त्याच्या वत्सल नजरेतून काहीही सुटत नसूनही व तो सर्वशक्तिमान असूनही भक्तांचे सोसणे संपत नाही, या विषयीच्या निरनिराळ्या युक्तिवादांचा परामार्श येथे घेतला जातो. मृत्योत्तर अस्तित्वाचा विविध शक्यतांचा साधकबाधक विचार केला जातो. गेली कित्येक शतके जगभर यावर जे विचारमंथन झाले आहे, त्याची दखल घेऊन एकोणिसाव्या शतकात कोणती भूमिका ग्राह्य ठरते, याचा विचार पूर्वग्रहविरहित दृष्टीने केला जातो. म्हणून धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे कोणत्याही एका धर्मावर रोख न राखता संपूर्ण धर्मसंस्थेविषयी किंवा एका विवक्षित अंगाविषयी केलेले मूलगामी चिंतन. धर्मव्यवहारात ढवळाढवळ न करता केलेली ही धर्ममीमांसा द्विस्तरीय क्रिया (Second-Order-Activity) असते. धर्मसंस्थेत राहून त्यात कालानुरूप जे बदल केले जातात, ती आद्य-क्रिया (First-Order-Activity) मानली जाते. त्यात सहभागी न होता समग्र धर्मसंस्थेचा किंवा धर्मघटकांचा अलिप्तपणे वेध घेते व मार्मिक भाष्य करते, ते धर्माचे तत्त्वज्ञान. ते धार्मिक तत्त्वज्ञानाहून निराळे असते. धार्मिक तत्त्वज्ञान विशिष्ट धर्माचे असते. ते ज्या धर्माचे असते, त्याचे समर्थन करते; धर्माचे तत्त्वज्ञान समर्थन करत नाही व खंडनही करत नाही. ते धर्ममतांची चिकित्सा करते व धर्मास बुद्धिप्रामाण्य देऊ पाहते.

याच प्रकारे विज्ञानाचे, कलेचे, पर्यावरणाचे, शिक्षणाचे, कायद्याचे, गणिताचे, संगीताचे, समाजाचे, राज्याचे, भाषेचे, मनाचे किंवा जाणिवेची, चित्रपटांचे, माध्यमांचे, क्रीडेचे, शेतीचे तत्त्वज्ञान त्या त्या क्षेत्रांतील मूलभूत तत्त्वांची मीमांसा करतात.

धर्माचा विचार जसा मानसशास्त्र, राज्यशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, साहित्य अशा अनेक ज्ञानशास्त्रांमध्ये केला जातो. मात्र धर्माच्या तत्त्वज्ञानांत खालील प्रश्नांची चर्चा होते :

  • धर्म, तत्त्वज्ञान, धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे काय? त्याचे स्वरूप व व्याप्ती कशी असते?
  • धर्माच्या तत्त्वज्ञानाचा धर्मशास्त्राशी तसेच ईश्वरशास्त्राशी नि विज्ञान, कला, नीती या क्षेत्रांशी कशा प्रकारचा सबंध असतो?
  • ईश्वराचे अस्तित्व कसे सिद्ध करता येते? ईश्वर कसा असतो? तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व कृपाळू असतो, तरी भक्तांचे सोसणे का संपत नाही?
  • श्रद्धा, साक्षात्कार, चमत्कार तसेच पूजा, प्रार्थना, व्रतवैकल्य कशा स्वरूपाची असतात?
  • परमेश्वराचे चराचराशी असणारे नाते नेमके कसे असते?
  • आत्म्याचे अमरत्व कशाच्या आधारे प्रतिपादन केले जाते?
  • धार्मिक भाषेचे स्वरूप व कार्य कोणते?
  • आधुनिक काळात धर्माला आव्हाने देणाऱ्या मतांचा परामर्श कसा घेता येतो?
  • निरीश्वरवाद, अज्ञेयवाद, मानवतावाद तसेच विज्ञान धर्मविरुद्व आहेत का?
  • फ्रॉइड, मार्क्स, द्यूरकेम व फ्रॉम, फोरबाख यांचे धर्मचिंतन कालबाह्य झाले आहे का?
  • जगभर एकच धर्म-विश्वधर्म- हे स्वप्नरंजन आहे का?
  • ईश्वराचे अस्तित्व मानल्याने मानवी स्वातंत्र्याचा संकोच होतो का?
  • अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून त्यांची चर्चा करणे व्यर्थ आहे का?
  • धार्मिक संकल्पनांचे तात्त्विक विवेचन केल्याने काय साधते? दृष्टिकोन व्यापक कसा होतो?

‘बुद्धी’ हे माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांचे साधकबाधक परीक्षण करणे त्यामुळे माणसास आवडते. धर्माचे क्षेत्र व सत्ता यातून एरवी वगळली जाते. ‘संशयात्मा विनष्यति’ मानून संशयाला, चिकित्सेला धर्मप्रांतात थारा दिला जात नाही. श्रद्धायुक्त अंतःकरणाचे मोल जाणून ‘श्रद्धावानं लभते ज्ञानंम्’ अशी ग्वाही प्रत्येक धर्म देतो; मात्र आधुनिक काळात माणसाला जे प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे विचारात घेतल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही. म्हणूनच धर्माचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे ठरते.

गॅलोवे, ब्राईटमन, जॉन हिक, निनिअन स्मार्ट व सर्वपल्ली राधाकृष्णन आदि तत्त्वज्ञांनी धर्माचे तत्त्वज्ञान साकारले. अपूर्णतेकडून पूर्णतेकडे, सान्ततेकडून अनन्ताकडे नेते व आपले चराचरांशी, परमात्म्याशी असणारे नाते धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे धर्माद्वारा तत्त्वज्ञान स्पष्ट करते. असाही धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ रूढ आहे.

संदर्भ :

  • Collins, James, The Emergence of Philosophy of Religion, New Haven, 1967.
  • Cottingham, John, Philosophy of Religion : Towards A More Humane Approach, New York, 2014.
  • Davies, Brian, An Introduction to the Philosophy of Religion, Oxford, 1993.
  • Galloway, George, The Philosophy of Religion, London, 2015.
  • Ghosh, Subodhkumar, Handbook of Philosophy of Religion, Kolkata, 1971.
  • Hick, John, Philosophy of Religion, New Jersey, 1963.
  • Hoffding, Herald; Meyer, B. E. The Philosophy of Religion, Montana, 2010.
  • जोशी, ज. वा. धर्माचे तत्त्वज्ञान, पुणे, १९७५.

समीक्षक – वत्सला पै