टिलिख, पॉल : (२० ऑगस्ट १८८६ — २२ ऑक्टोबर १९६५). विसाव्या शतकातील जर्मन-अमेरिकन अस्तित्ववादी तत्त्वचिंतक आणि ख्रिस्ती प्रॉटेस्टंट धर्मशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म जर्मनीतील ब्रांडनबुर्ग प्रांतातील स्टारझेडेल (सध्या पोलंडमध्ये) या गावात झाला. त्यांचे वडील योहानेस टिलिख हे धार्मिकवृत्तीचे असून प्रशियन प्रादेशिक चर्चमध्ये बिशपाधिकारी म्हणून ते काम करीत होते. पॉल टिलिख हे केनिग्जबर्ग-न्यूमार्क येथील मानवतावादी माध्यमिक शाळेत शिकत असताना त्यांना मुक्त विचारांच्या अभिजात आदर्शाची ओळख झाली. तो आदर्श त्यांनी उत्साहाने स्वीकारला. १९०० साली जेव्हा त्यांच्या वडिलांची बर्लिन येथे बदली झाली, तेव्हा त्यांनी महानगरीय समृद्ध जीवनशैलीचा आनंदाने स्वीकार केला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी बर्लिन, ट्यूबिन्गेन, हॉल व ब्रेस्लाऊ या विद्यापीठांत शिक्षण घेतले. १९११ साली त्यांनी ब्रेस्लाऊ विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात पीएच. डी. मिळविली; तर १९१२ साली हॉल विद्यापीठातून धर्मशास्त्रात अनुज्ञप्ती मिळविली.

आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या सामान्य/लौकिक भाषेतील, शिव, प्रेम, क्षमाशील, दयाळू इ. शब्द आपण जेव्हा एखाद्या मनुष्याच्या संदर्भात वापरतो आणि तेच शब्द ईश्वराच्या संदर्भात वापरतो, तेव्हा ते एकाच अर्थाने वापरले जातात की भिन्न? ‘ईश्वर दयाळू आहे’, ‘ईश्वर सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करतो’ अशा प्रकारच्या धार्मिक विधानांचा अर्थ आपल्या दैनंदिन व्यवहारातील सामान्य/लौकिक भाषेतील अर्थाप्रमाणेच असतो की अन्य प्रकारे लावला जातो? थोडक्यात, त्यांचा शब्दार्थ महत्त्वाचा की लाक्षणार्थ? हा अधिधर्मशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. २०व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेल्या विश्लेषक चळवळीमुळे (Analytic Movement) पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील विविध शाखा आणि उपशाखांमध्ये उत्तरोत्तर भाषिक विश्लेषणावर अधिकाधिक भर देण्यात आला. नैतिक, सौंदर्यशास्त्रीय आणि धार्मिक भाषासुद्धा याला अपवाद नाही. परिणामत: नीतिशास्त्राच्या संदर्भात ‘अधिनीतिशास्त्र’, तर धार्मिक भाषेच्या संदर्भात ‘अधिधर्मशास्त्र’ किंवा ‘विश्लेषणात्मक धर्मशास्त्र’ या नवीन शाखा उदयास आल्या. अधिधर्मशास्त्राच्या माध्यमातून विविध धर्ममार्तंडांनी आणि समकालीन तत्त्वचिंतकांनी धार्मिक भाषेचे स्वरूप, अर्थ, कार्य आणि प्रामाण्याच्या संदर्भात वेळोवेळी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. या संदर्भात अलीकडे म्हणजे साधारणतः २०व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या संशोधनामध्ये धर्मशास्त्रज्ञांनी धार्मिक रूपकांवर (Metaphor) अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसते. या संदर्भात अमेरिकन ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ सॅली मकफेग, कॅनेडियन धर्मशास्त्रज्ञ जानेट सोसकाइस, अमेरिकन तत्त्वज्ञ विल्यम आल्स्टन, इंग्रज तत्त्वज्ञ रिचर्ड स्विन्बर्न आणि २१व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश तत्त्वज्ञ अँथनी केनी यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे; परंतु ‘धार्मिक भाषा ही प्रतीकांची भाषा असते’ ही पॉल टिलिख यांची उपपत्ती या संदर्भातील प्रारंभीच्या काळातील म्हणजे १९५१ मधील अभिव्यक्ती होय.

पॉल टिलिख हे मूळचे जर्मनीचे होत. जर्मनी आणि अमेरिकेमधील विविध विश्वविद्यालयांमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी हिटलरवर टीका केल्याने १९३३ मध्ये त्यांच्यावर कठोर निर्बंध लादून जर्मनी येथे विश्वविद्यालयात वा अन्यत्र कोठेही काम करण्यास त्यांना प्रतिबंधित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील युनियन सेमिनरी (१९३३–५५), हार्वर्ड विश्वविद्यालय (१९५५–६२) आणि शिकागो विश्वविद्यालय (१९६२–६५) येथे तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या विचारावर सरेन किर्केगॉर, मार्टिन हायडेगर, फ्रीड्रिख नित्शे या अस्तित्ववादी तत्त्वचिंतकांचा प्रभाव होता. पॉल टिलिख हे अत्यंत प्रभावशाली असे वक्ते होतेच; परंतु त्यांनी लिहिलेल्या द करेज टु बी (१९५२) आणि डायनॅमिक्स ऑफ फेथ (१९५७) या ग्रंथांना जर्मनी आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी केवळ तत्कालीन बौद्धिक वर्तुळातच नव्हे, तर जनसामान्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग लाभला आणि अपार लोकप्रियता मिळाली. ‘श्रद्धा’ (Faith) या विषयावरील त्यांचा एक दशकाहून अधिक वर्षांचा तर्कशुद्ध विचार, सूक्ष्म व गहन चिंतनाचा परिपाक म्हणजे त्यांचा सिस्टिमेटिक थिऑलॉजी (१९५१–६३) हा त्रिखंडात्मक ग्रंथ होय. या ग्रंथातील त्यांचा नावीन्यपूर्ण सिद्धांत म्हणजे ‘सहसंबंध पद्धती’ (Method of Correlation) होय. या ग्रंथनिर्मितीबरोबरच त्यांनी साधारणपणे शंभराहून अनेक संशोधनपर लेख लिहिले आहेत.

त्यांच्या धर्मशास्त्रीय विचारातील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत म्हणजे धार्मिक भाषेचे स्वरूप प्रतीकात्मक/सांकेतिक (Symbolic) असते, हा होय. या सिद्धांताचे प्रतिपादन त्यांनी आपल्या ‘थिऑलॉजी अँड डायनॅमिक्स ऑफ फेथ’, ‘द रिलिजस सिंबॉल’, ‘रिलिजस सिंबॉल अँड अवर नॉलेज ऑफ गॉड’, ‘थिऑलॉजी अँड सिंबॉलिझम’, ‘रिलिजस सिंबॉल’ या अनेक संशोधनपर लेखांमध्ये केलेले दिसून येते.

चिन्ह (Sign) आणि प्रतीक (Symbol) यांमधील भेद : ‘धार्मिक भाषा प्रतीकात्मक असते’ हा आपला सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी पॉल टिलिख यांनी सर्वप्रथम ‘चिन्ह’ आणि ‘प्रतीक’ यांमध्ये स्पष्ट आणि काटेकोर भेद केलेला आहे. त्यांच्या मते चिन्ह आणि प्रतीक दोन्ही स्वतःच्या बाहेर अन्य कशाचातरी निर्देश करतात. ज्या कशाचा चिन्ह निर्देश करते, ते एकतर आपल्या रूढी-परंपरांच्या चौकटीत, लोकव्यवहारामध्ये वा विशिष्ट व्यवस्थेमध्ये एक संकेत म्हणून (Arbitrary Convention) स्वीकारलेले असते. उदा., लाल रंग वाहकास थांबण्याचा इशारा देत असतो. लाल, हिरवा व केशरी या रंगांचा जो अर्थ होतो, तो सामान्यतः सामाजिक व्यवस्थेमध्ये रूढ वा प्रचलित असल्याने तो तसा स्वीकारलेला असतो. कोणत्याही चिन्हाने ध्वनित होणारा अर्थ आणि ते चिन्ह यांमध्ये कोणताही आंतरिक संबंध नसतो, तर त्यांच्यातील संबंध हा पूर्णतः बाह्य स्वरूपाचा असतो. याउलट, समाजसंमत प्रतीके आणि त्यांच्या अर्थामध्ये एक प्रकारचा आंतरिक संबंध असतो. अर्थात, कोणत्याही प्रतीकाद्वारे ध्वनित होणाऱ्या अर्थामध्ये तसेच त्याने ज्याचा निर्देश होतो त्या पदार्थामध्ये त्या प्रतीकाचा अंतर्भाव असतो. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी टिलिख यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिलेले आहे. त्यांच्या मते कोणत्याही राष्ट्राचा झेंडा (flag) हा त्या राष्ट्राची शक्ती, सामर्थ्य आणि प्रतिष्ठा यांचा निर्देश करतो. अर्थात, झेंडा ज्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो, त्या राष्ट्राचे सामर्थ्य, शान आणि प्रतिष्ठा यांचा त्यात अंतर्भाव असतो. एखादी सत्ता, वस्तू वा वस्तुस्थितीशी प्रतीकांचा अशाप्रकारे आंतरिक संबंध असल्यामुळे प्रतीके चिन्हांप्रमाणे रूढी-परंपरांच्या चौकटीत वा एखाद्या समाजव्यवस्थेत नाममात्र वा सांकेतिक रीत्या स्थापित केलेली नसतात, तर आपल्या वैयक्तिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनातून नकळतपणे, उत्स्फूर्तपणे उगम पावलेली असतात. परिणामतः त्यांच्या असण्याचे ठरावीक कालखंड (Span of life) असतात. काही प्रतीकांचा उगम तसेच अंत वा ऱ्हास (Decay/Death) होण्याचा कालही असतो.

विश्वातील अंतिम सत्याचे वास्तविक ज्ञान साक्षात्काराच्या माध्यमातून होणे, ही आपल्या समग्र धार्मिक जीवनाची फलश्रुती आणि उद्दिष्ट होय; परंतु जेव्हा ते आपल्यासाठी सामान्यतः खुले नसते आणि त्याचे ज्ञान आपणास अन्यथा (Otherwise) होणेही शक्य नसते अशा परिस्थितीत त्याचे ज्ञान आपणास प्रतीकांमुळे होते, असे प्रतिपादन टिलिख करतात. अर्थात, सत्तेच्या विभिन्न स्तरांचे ज्ञान आपणास प्रतीकांमुळे दृग्गोचर होते. त्याचवेळी साक्षात्कारामध्ये प्रतीत होणाऱ्या अंतिम सत्याच्या नवनवीन पैलूंना समांतर असे आत्म्याचे विविध घटक आणि पैलूही आपणास दृग्गोचर होण्याची शक्यता खुली होते.

पॉल टिलिख यांच्या मते धर्माची किंवा श्रद्धेची भाषा ही प्रतीकात्मक असते; रूपकात्मक असते. अंतिम सत्ता आपण केवळ प्रतीकात्मक भाषेद्वाराच व्यक्त करू शकतो. अंतिम सत्ता मग ती ईश्वर असेल वा अन्य काही त्याबद्दल आपण जे काही ठामपणे बोलतो, कथन करतो त्याला निःसंशय प्रतीकात्मकच अर्थ असतो. यासंदर्भात टिलिख स्पष्ट करतात की, अंतिम सत्ता ज्याला धर्मामध्ये ‘ईश्वर’ असे म्हणतात त्याच्या संदर्भात ‘ईश्वर स्वयंभू आहे’ (Being in itself) या आणि केवळ याच विधानास शब्दशः अर्थ आहे. या विधानाव्यतिरिक्त ईश्वराच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या अन्य कोणत्याही विधानाचा शब्दशः अर्थ गृहीत धरावयाचा नसून ती सर्व विधाने प्रतीकात्मक असतात; कारण वरील अपवाद वगळता ईश्वर या अंतिम सत्तेबद्दल बोलताना जे कोणतेही ठाम विधान आपण करतो, ते आपल्या सांत वा मर्यादित अनुभवावर बेतलेले असते.

‘ईश्वर सनातन आहे’, ‘ईश्वर चांगला आहे’, ‘ईश्वर निर्मिक आहे’ तसेच त्याच्या ‘निर्मितीवर त्याचे प्रेम आहे’ ही आणि यांसारखी सर्व विधाने प्रतीकात्मक आहेत; परंतु आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ही विधाने आपल्या सांत/मर्यादित अनुभव, विचार आणि भावना यांवर बेतलेली असतात. त्यामुळे स्वयंभू, अनंत आणि अमर्याद अशा शब्दांचा ईश्वराच्या संदर्भात प्रयोग करताना त्यांचा योग्य अन्वयार्थ विचारात घेणे अतिशय महत्त्वाचे असते.

प्रतीके ज्याचा निर्देश करतात त्यात त्यांचा अंतर्भाव होत असल्याने ते स्वतःच्या पलीकडे निर्देश करतात. धार्मिक प्रतीकांचा अंतिम सत्तेमध्ये अंतर्भाव असल्याने ते आपल्या सांत/मर्यादित अनुभवविश्वाच्या पलीकडे जातात. प्रतीकांच्या माध्यमातून ईश्वराबद्दलच्या ठाम विधानासाठी आपले सांत अनुभवविश्व हे माध्यम/साधन बनतात.

हे विचारात घेऊन वरील विधानांचा योग्य अन्वयार्थ लावताना त्यांचा शब्दशः अर्थ पूर्णतः विचारात न घेता त्याचा अंशतः त्याग करून त्याचवेळी अंशतः स्वीकारही केला जातो आणि हीच बाब प्रतीकात्मक अभिव्यक्तीला त्याच्या बाहेर निर्देश करण्यास पुरेसा आधार प्रदान करते, असे टिलिख यांचे मत आहे. तेव्हा प्रतीकात्मक अभिव्यक्तीच्या संदर्भात शब्दशः अर्थापेक्षा तिचा लक्षणार्थच महत्त्वाचा असतो. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने टिलिख यांच्या मते धार्मिक श्रद्धेची समाधानकारक रीत्या अभिव्यक्ती आणि स्पष्टीकरण होऊ शकत नाही.

पॉल टिलिख यांचा मित्र आणि सहकारी जॉन हर्मन रँडल यांच्या मतेही धार्मिक प्रतीकांना, अभिव्यक्तींना बोधनिक (Cognitive) अर्थ नसतो. समाजव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक व्यक्तींच्या श्रद्धेचा तो भाग असल्याने त्यांचा स्वीकार करणे आवश्यक असले, तरी ती सत्य नसतात. त्याचप्रमाणे भारतीय दार्शनिक परंपरेतील अद्वैत वेदांतामध्येही ‘तत् त्वं असि’, ‘अहं ब्रह्मास्मि׀’ [तू (जीवात्मा) तोच (परमात्मा) आहेस, मी ब्रह्मरूप आहे] यासारख्या महावाक्यांचा अन्वयार्थ लावताना अशा प्रकारे शब्दशः अर्थापेक्षा लक्षणार्थ महत्त्वाचा मानलेला दिसतो.

समकालीन तत्त्वचिंतकांनी पॉल टिलिख यांच्यावर असा आक्षेप घेतला आहे की, टिलिख यांच्या मते प्रतीके ज्यांचा निर्देश करतात त्यात त्यांचा सहभाग/अंतर्भाव असतो; परंतु ते ‘सहभागीत्व’ (Participation) या त्यांच्या सिद्धांतातील अत्यंत महत्त्वाच्या, मध्यवर्ती अशा संकल्पनेचा नेमका अर्थ, व्याख्या वा स्पष्टीकरण देत नाहीत. उदा., ‘ईश्वर चांगला आहे’ हे प्रतीकात्मक विधान स्वयंभू अशा अंतिम सत्तेमध्ये ज्या पद्धतीने कोणत्याही राष्ट्राचा झेंडा त्या राष्ट्राच्या शक्ती, सामर्थ्य आणि प्रतिष्ठेमध्ये सहभागी असतो? अगदी त्याच पद्धतीने सहभागी असते का? हे टिलिख स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे धार्मिक प्रतीके नेमक्या कोणत्या अर्थाने समान असतात, हेही स्पष्ट होत नाही. त्याचप्रमाणे जे काही अस्तित्वात आहे, ते सर्व स्वयंभू अशा अंतिम सत्तेमध्ये सहभागी असते असे असेल, तर इतर वस्तूंचे त्यामधील सहभागीत्व आणि प्रतीकांचे त्यामधील सहभागीत्व यांमध्ये नेमका काय फरक आहे, हेही टिलिख यांनी स्पष्ट केलेले नाही. असे असले तरीही टिलिख यांचा धार्मिक भाषेच्या प्रतीकात्मकतेचा सिद्धांत यासंदर्भातील ‘सादृश्यमान’ सिद्धांतास उत्तम पर्याय म्हणून केवळ स्वीकारलाच जात नाही, तर लोकप्रियही आहे.

पॉल टिलिख यांच्या धार्मिक भाषेच्या प्रतीकात्मकतेखेरीज अजूनही काही सिद्धांत आणि संकल्पना अभ्यासणे आवश्यक आहेत, त्या खालीलप्रमाणे :

  • चिंता/समस्या (Anxiety) : आधुनिक मानवाचे धार्मिक प्रश्न ज्यांचा उगम हा मानवी समस्यांमध्ये/चिंतेमध्ये आहे. त्या तीन प्रकारच्या आहेत – मृत्यू, अर्थहीनता आणि अपराधीपणा.
  • धार्मिक प्रश्न : अर्थपूर्ण धार्मिक प्रश्न हे योग्य रीतीने ‘मानवी परिस्थितीमध्ये’ अंतर्भूत असलेल्या समस्यांसंदर्भात उपस्थित केले जातात. शिवाय ख्रिश्चन सिद्धांत हे केवळ सैद्धांतिक कोड्यांना दिलेली उत्तरे नसून व्यावहारिक समस्यांचे निराकरण आहे.
  • ईश्वर : टिलिख यांनी व्यक्तिगत ईश्वराची संकल्पना स्वीकारली नसली, तरी इतर धार्मिक शिकवणींप्रमाणे अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा त्या अंतिम सत्याच्या प्रतीकात्मक स्वरूपात स्वीकार केला आहे.
  • श्रद्धा : श्रद्धा म्हणजे मानवी अनुभव आणि क्रियाकलाप यांचे सुसंबद्ध संघटन किंवा आयोजन करण्याचा एक मार्ग याअर्थाने, ‘अंतिम आस्था’ या स्वरूपात विचार आणि विस्तार केलेला आहे. श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीप्रती असलेली बिनशर्त शरणागती आणि त्याला सार्वभौम अधिकारी म्हणून ओळखण्याची इच्छा. ज्याच्या प्रत्यक्ष अनुभवाने सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त होईल अशी अपेक्षा, केवळ त्याच्या संबंधाने आपल्या आयुष्याला असलेल्या अर्थपूर्णतेचा शोध, त्याच्या पावित्र्याचा अनुभव आणि त्याच्याप्रती असलेल्या विस्मय, गूढ अशा संमिश्र भावना.

हृदयविकाराच्या झटक्याने पॉल टिलिख यांचे शिकागो येथे निधन झाले.

 

संदर्भ :

  • Hick, John, Philosophy of Religion, New Delhi, 2000.
  • Tillich, Paul, Dynamics of Faith, New York, 2001.
  • Tillich, Paul, Systematic Theology : Reason and Revelation, Being and God, Vol. I, Chicago, 1951.
  • जोशी, ज. वा., धर्माचे तत्त्वज्ञान, पुणे, १९७५.
  • वर्मा, वेदप्रकाश, धर्मादर्शन की मूल समस्याए, दिल्ली, २०१२.

समीक्षक : संदीप कदम