तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. प्रसिद्ध इंग्लिश तत्त्वज्ञ विल्यम ऑफ ओखम (१२८५‒१३४७) हा तत्त्वज्ञानात प्रसिद्धी पावला, तो त्याच्या नावाने रूढ झालेल्या या वस्तराच्या संकल्पनेमुळे. गृहितांची संख्या निष्कारण वाढू देऊ नये, असे त्याचे म्हणणे आहे. अनावश्यक गृहितांना सिद्धांतापासून वगळून सिद्धांतास सुटसुटीत रूप देण्याचा कटाक्ष येथे अभिप्रेत आहे. साधेसोपे स्पष्टीकरण देणे शक्य असल्यास अवघड स्पष्टीकरण देण्याचे टाळावे, असे सांगणे म्हणजे ‘ओखमचा वस्तरा’ मानणे होय.

वस्तरा ज्याप्रमाणे अनावश्यक केस काढून टाकतो, त्याप्रमाणे अनावश्यक समजूतींना फाटा दिला पाहिजे. तत्त्वज्ञान, विज्ञान, ईश्वरशास्त्र यांसारख्या कोणत्याही ज्ञानक्षेत्रात अवाजवी स्पष्टीकरणांचा पसारा असू नये; अवाजवी स्पष्टीकरणांस कात्री लावावी किंवा त्यावरून वस्तरा फिरवावा, असे म्हणणे ओखमपूर्वी थोर ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल व मध्ययुगातील श्रेष्ठ धर्मशास्त्रज्ञ व तत्त्वचिंतक सेंट थॉमस अक्वायनस यांनीही उचलून धरले होते. ओखमनंतर कांटनेही या प्रकारचा आग्रह धरला होता, तरीही या संकल्पनेचे नाव मात्र ‘ओखमचा वस्तरा’ हेच राहिले.

मुळात ओखमला हे ‘मित-तत्त्व’ (Principle of Persimony) मान्य असले, तरी त्याने त्यास ‘रेझर’ म्हटले असल्याचा उल्लेख कोठेही आढळत नाहीत (मुळात त्याच्या जन्ममृत्यूकाळासकट सर्वच तपशिलांबाबत मतमतांतरे आहेत); मात्र ‘ओखम्स रेझर’ असा शब्दप्रयोग १८५२ मध्ये सर विल्यम रोवन हॅमिल्टन या ब्रिटिश गणितज्ज्ञाने सर्वप्रथम केला, असे मानले जाते.

या  तत्त्वास साधेपणाचे तत्त्व (Principle of Simplicity) असेही म्हटले जाते. अर्थात, नेमके कशास सुटसुटीत, साधे, सोपे म्हणावे, हा प्रश्न उरतो. त्याचप्रमाणे सोपेपणा ही कसोटीही नेहमीच योग्य ठरेल, असेही नाही. त्यामुळे कल्पकतेला वाव मिळत नाही व नवनिर्मितीप्रक्रियेवर घाला घातला जातो. असेही आक्षेप या संकल्पनेबाबत घेतले जातात. ‘सोपे वाटणे व सोपे असणे’ ह्यांत फरक असल्याने व्यवहारात हे तत्त्व मार्गदर्शक ठरते का, अशी शंकाही व्यक्त केली जाते. मात्र उपयोजित व्यवस्थापनशास्त्रात त्यास ‘किस’ (Kiss‒Keep it Simple, Stupid) म्हटले जाते व ते मान्यता पावलेले दिसते.

संदर्भ :

  • Kaye, Sharon M.; Martin, Robert M. On Ockham, California, 2001.
  • Spade, Vincent Paul, Ed. The Cambridge Companion to Ockham, New york, 1999.

                                                                                                                                                               समीक्षक : नमिता निंबाळकर