सीताकांत महापात्रा : (१७ सप्टेंबर १९३७). ओडिया भाषेतील श्रेष्ठ कवी. कवितेसह, निबंध, प्रवासवर्णन या साहित्यप्रकारातही  त्यांनी लेखन केले आहे. अधिकतर त्यांचे लेखन ओडिया भाषेत असून, काही पुस्तके इंग्रजीतही प्रकाशित झाली आहेत. यूरोपातील बहुतेक भाषांमधून त्यांचे साहित्य,अनुवादित झालेले आहे. ओरिसातील कटक जिल्ह्यातील, चित्रोत्पला नदीच्या तीरावरील महानगा या छोट्याशा गावात, एका सुशिक्षित, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय कुटुंबात सीताकांत महापात्रा यांचा जन्म झाला. गावातील शाळांतून मॅट्रिक झाल्यावर इतिहास विषय घेऊन १९५७ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. पुढे राज्यशास्त्र विषयात अलाहाबाद विश्वविद्यालयातून १९५९ मध्ये प्रथम क्रमांकाने त्यांनी एम.ए.ची पदवी संपादन केली. उत्कल विद्यापीठातून सामाजिक मानवशास्त्रीय विज्ञानात डॉक्टरेट केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून पदविकाही त्यांना मिळाली. काही काळ अध्यापनही केले. याशिवाय आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भारतीय प्रशासनसेवेत अनेक उच्चपदे भूषविली. प्रारंभी (१९९०-१९९४) ओरिसा शासनसेवेत सचिव, नंतर युनेस्कोत सांस्कृतिक विकास कार्यात प्रमुख अधिकारी (१९९४ ते १९९६) म्हणून ते कार्यरत होते. १९९६ मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर, महापात्रा यांची नियुक्ती होमी भाभा अधिष्ठान व एन. बी. टी. (राष्ट्रीय पुस्तक न्यास) या संस्थांमध्ये अध्यक्ष म्हणून झाली. केंब्रिज व हार्वर्ड विद्यापीठाचे ते सन्माननीय फेलो होते. तसेच होमी भाभा फेलोशिपही त्यांना दिली गेली. या काळात त्यांनी पूर्वोत्तर भारतातील आदिवासी समाजाच्या आधुनिकीकरण प्रक्रियेचा अभ्यास केला आणि त्यावर शोधनिबंध लिहिले. भारतीय आदिवासी मौखिक काव्यपरंपरेचे नऊ संग्रह, अनुवादित करून त्यांनी संपादित केले आहेत.शासकीय सेवेत असूनही त्यांनी लेखन-वाचनाचा व्यासंग सातत्याने जोपासला.त्यांची एकूण ९८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शालेय जीवनापासूनच घरातील सुसंस्कृत वातावरणाचा प्रभाव सीताकांत महापात्रांवर होता. सरलादास रचित महाभारताचे ,जगन्नाथदासांचे ओडिया भाषेतील एकादशस्कंधी भागवताचे वाचन आणि ओडिया भाषेतील अंध-आदिवासी कवी भीमा भोई यांची भजने या साऱ्यांचे संस्कार बालवयात घरातूनच त्यांच्यावर झाले. गावातील लोकांच्या बोलीभाषेची अनेकरूपे त्यांना आकर्षित करीत राहिली आणि या साऱ्या वातावरणातत्यांची कविता जन्माला आली. १९६३ मध्ये  महापात्रा यांचा दीप्ति-ओ-द्युति हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर अष्टपदी (१९६७), शब्दरा आकाश (१९७१),समुद्र (१९७७),अरा दृश्य (१९८१),समयारा शेषनामा (१९८४),कहाकु पुछीबा कहा (१९९० )चिढइ रे तू कि जाणु (१९९०),इत्यादी त्यांचे एकूण १२ कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय बिना आकाश बिना दिप्ती (१९७८), निसंग मनीषा (१९८०), शब्द स्वप्न वो निर्विकला (१९९०) आणि अंधाररा जोफिचिता (१९९०) हे त्यांचे निबंधसंग्रहही प्रकाशित झाले आहेत. understanding rhythms : oral Poetry of Indian tribes (१९९२) हा त्यांचा इंग्रजीमधील अभ्यासपूर्ण ग्रंथ असून, त्यांनी संपादन ,अनुवाद आणि प्रवासवर्णन या साहित्याप्रकारातही लेखन केले आहे.त्यांच्या चिढइ रे तू कि जाणु काव्यसंग्रहाचा रिचई री तू क्या जाने या राजेंद्रप्रसाद मिश्र यांच्या हिंदी अनुवादावरून चिमणे ग बाई तुज काय ठावे हा मराठी भावानुवाद कमलाकर सोनटके यांनी केला आहे. यूरोपातील बहुतेक भाषांमधून त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या आठ कवितासंग्रहाचे इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाले असून, त्यांच्या निवडक कवितांचा कृष्णक, निर्वाण और अन्य कविता हा संग्रह हिंदीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 

दीप्ति-ओ-द्युति या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाने ओडिया काव्यजगतात एका आधुनिक ओडिया कवितेच्या विकासाचे अत्यंत अर्थगर्भ दर्शन घडवले. अष्टपदी या काव्यसंग्रहात आठ दीर्घकविता असून यामध्ये प्राचीन दंतकथा आणि सार्वजनिक प्रतिकांना वेगळ्याच शैलीत काव्यबद्ध केले आहे.आपल्या ओदिशा राज्याची भौगोलिक आणि सांस्कृतिक भूचित्रे आणि रम्य निसर्गचित्रे त्यांच्या काव्यात प्रकटतात. पाश्चात्त्य काव्यातील सर्वोत्तमाची पारख आणि आदिवासी जनजीवनाशी असलेला त्यांचा घनिष्ट संबंध या साऱ्यांनी त्यांची संमिश्र आणि गहिरी काव्यसंवेदना घडवली आहे. त्यांच्या जीवनदृष्टीचे आणि काव्यदृष्टीचे एक अनन्य साधारण वैशिष्ट्य हे आहे की, त्यांनी ओदिशातील आदिवासींच्या गाण्यामधील काव्यसृष्टी जगाच्या नजरेसमोर आणण्याचे महान कार्य अत्यंत संवेदनक्षम पद्धतीने केले आहे.

त्यांनी त्यांच्या स्मृती आणि संभावना या निबंधसत कविता या साहित्यप्रकारावर विस्तृत भाष्य केले आहे.या निबंधातून त्यांची काव्यदृष्टी लक्षात येते.कवितेचा जन्म एका आवेग क्षेत्राच्या प्रकाशमुखी प्रेरणेतून होतो. कविता शब्दांचा वाद्यमेळ आहे. भाषेची जादू आहे. शब्द सामाजिक वारसा घेऊन आलेले असतात. चांगल्या कवितेत प्रत्येक शब्द बोलतो. प्रत्येक शब्द अनिवार्य आणि अद्वितीय वाटतो. प्रत्येक शब्द मंत्राने भारलेला असतो.कुठल्याही उत्कृष्ट कलाकृतीप्रमाणे खरी कविता अस्तित्त्वाचा साक्षात्कार घडवते. धडे देत नाही. शिकवण देण्याचा खटाटोप करीत नाही. मातीबद्दल कुंभाराला, लाकडाबद्दल सुताराला जशी आगळी निष्ठा असते; तसंच कवितेत विनयभाव, शब्दांबद्दल विनम्र आणि शांत निष्ठामय आसक्ती आणि प्रेम भरलेलं असतं.कविता बहुधा मानवाचं सर्वात मोठं नैसर्गिक आणि पुरातन अभिव्यक्ती साधन आहे,ही त्यांची एकूण काव्यविषयक भूमिका आहे.

अष्टपदी या काव्यसंग्रहाला राज्य साहित्य अकादमी पुरस्कार (१९६७), शब्दरा आकाश या संग्रहाला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार, सरला पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार, विषुव पुरस्कार, तुलसी सन्मान, सरस्वती सन्मान, ओडिया सांस्कृतिक पुरस्कार,ओडिया साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री (२००२),पद्मभूषण (२०११ ) आणि ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार (१९९३) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

संदर्भ : https://www.universeodisha.org/about-us/sri-sitakant-mahapatra/