संहिता : संहिता हा शब्द सम्-उपसर्गपूर्वक धा-धातूला क्त-प्रत्यय लागून बनलेला आहे. व्युत्पत्तीनुसार या शब्दाचा अर्थ ‘एकत्र ठेवणे’ असा होतो. व्याकरण-परंपरेमध्ये प्रस्तुत शब्द संज्ञा अर्थात् सांकेतिक अर्थाने वापरताना हा व्युत्पत्त्यर्थ स्वीकारलेलाच आहे.प्रातिशाख्य-ग्रंथांमध्ये ‘संहिता’ ही संज्ञा स्पष्ट करताना मंत्रातील पदांचे सलग उच्चारण विचारात घेतलेले आहे. ऋग्वेद-प्रातिशाख्यानुसार, मागील पदाच्या शेवटी असलेला वर्ण हा पुढील पदाच्या आरंभीच्या वर्णामध्ये मिसळून त्या दोहोंमध्ये काळाचा अडसर न ठेवता केलेले उच्चारण म्हणजे संहिता होय. वाजसनेयि-प्रातिशाख्यानुसार, एका श्वासामध्ये उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांचा योग अथवा एकत्रीकरण म्हणजे संहिता होय. वैदिक मंत्रांचा विचार करता संहिता-पाठामध्ये पदांचे विलंबाशिवाय उच्चारण केले जाते. याउलट पदपाठामध्ये संहितेतील पदे अलग करून त्यांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. संहितापाठ व पदपाठ यांमध्ये प्रकृती म्हणजेच मूळ अथवा कारणभूत कोण आहे, यासंबंधी परंपरेत मतभेद दिसतो. या संदर्भात, ‘संहिता पदप्रकृतिः’ येथील पदप्रकृतिः हा समास दोन प्रकारे सोडवलेला दिसतो. पहिल्या मतानुसार, ‘पदानां प्रकृतिः पदप्रकृतिः।’ संहिता ही पदांची प्रकृती आहे. हे मत निरुक्ताचे टीकाकार दुर्गाचार्यांनी मान्य केलेले आहे. त्यांच्या मते, मंत्रद्रष्ट्या ऋषींना मंत्र हे संहितारूपात मिळाले. वेदाध्ययन करताना सर्वप्रथम संहितेचेच अध्ययन केले जाते. तसेच यज्ञामध्येही मंत्र संहितारूपातच म्हटले जातात. म्हणून संहिता ही प्रकृती, तर पदे ही नंतर आलेली अर्थात् विकारभूत होत. याउलट, दुसऱ्या मतानुसार, ‘पदानि प्रकृतिः यस्याः सेयं पदप्रकृतिः।’ पदे ही जिची प्रकृती आहेत, ती संहिता होय. ऋग्वेद-प्रातिशाख्यावरील भाष्यामध्ये उवटाचार्यांनी हे मत मांडलेले आहे. त्यांच्या मते, पदे ही मूलस्वरूप असून ती सिद्ध म्हणजे विकाररहित असतात. णत्व, षत्व वगैरे विकार म्हणजेच बदल हे संहितेतच दिसून येतात. म्हणून संहिता ही पदांची विकृती होय.

पाणिनीने अष्टाध्यायीमध्ये संहितेचे लक्षण केले आहे -‘परः संनिकर्षः संहिता।’. वर्णांमधील आत्यंतिक सांनिध्य म्हणजे संहिता होय. एक वर्ण उच्चारून दुसरा वर्ण उच्चारताना उच्चारणस्थान व प्रयत्न यांत बदल होत असल्याने दोन वर्णांच्या उच्चारणामध्ये अत्यंत सूक्ष्म असे काळाचे अंतर स्वीकारावेच लागते. हे अंतर पाणिनीय परंपरेत अर्धी मात्रा इतके स्वीकारले आहे. मात्र यापेक्षा अधिक काळ लागल्यास तेथे संहिता न होता विराम होतो. संहिता ही बंधनकारक कधी असते आणि विवक्षेवर म्हणजे वक्त्याच्या इच्छेवर अवलंबून कधी असते, यासंबंधीची कारिका पुढीलप्रमाणे – संहितैकपदे नित्या नित्या धातूपसर्गयोः। नित्या समासे वाक्ये तु सा विवक्षामपेक्षते।।. एक पद, धातू आणि उपसर्ग तसेच समास यांमध्ये संहिता नित्य मानलेली आहे. तर वाक्यामध्ये पदांचा जोडून उच्चार करणे अथवा न करणे हे विवक्षेवर म्हणजे वक्त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. वर्णांमध्ये संहिता असल्यास संधिकार्य होतेच. त्यामुळे बालेन (बाल + इन), क्षीरौदनः (क्षीर + ओदनः), परीक्षते (परि + ईक्षते) येथे संहिता बंधनकारक असल्याने विशिष्ट संधिनियमही प्रवृत्त झालेले आहेत. याउलट वाक्याच्या बाबतीत संहिता ही विवक्षाधीन असल्याने संधिकार्य करण्याचे बंधन नाही. त्यामुळे ‘शिष्यस्तेऽहम्’ हे वाक्य ‘शिष्यः ते अहम्’ असेही म्हटले जाऊ शकते.

संदर्भ :१.भागवत वा. बा., पाणिनीय व्याकरणाचे अंतरंग, श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय संशोधन ग्रन्थमाला क्रमांक ३, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, १९८८. २.भाटे सरोजा (संपा.),वैयाकरणसिद्धान्तकौमुदीभाग पहिला, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे,१९८९. ३.वर्मा, वीरेन्द्र कुमार (संपा.), भाष्यद्वयसहितम् शुक्लयजुर्वेद-प्रातिशाख्यम् अथवा वाजसनेयि-प्रतिशाख्यम्, ज्ञानप्रकाश प्रतिष्ठान, वाराणसी,१९७५.

 

Keywords : #प्रातिशाख्य, #पदपाठ, #संहितापाठ, #निरुक्त, #अष्टाध्यायी, #विराम, #पद