कॅरी, विल्यम : (१७ ऑगस्ट १७६१—९ जून १८३४). अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित, ख्रिस्ती धर्मप्रचारक, कोशकार, व्याकरणकार व भाषांतरकार. जन्म इंग्लंडमधील पाेलेर्सपरी येथे. प्रतिकूल परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नसले, तरी धार्मिक साहित्याचे त्याने विपुल वाचन केले. वयाच्या साळाव्या वर्षी त्याने चांभाराचा व्यवसाय सुरू केला. नंतर मोल्टन येथील एका चर्चमध्ये त्याने धर्मोपदेशकाची नोकरी धरली व परदेशात मिशनरी व्हावयाचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने हिब्रू, ग्रीक व लॅटिन भाषा-साहित्य अभ्यासिले. ११ नोव्हेंबर १७९३ रोजी तो कोलकाता येथे आला. सुरूवातीस काही काळ त्याने माल्डा येथे शेती केली व नंतर मदनावती येथील निळीच्या कारखान्यात नोकरी धरली. मदनावती येथे फावल्या वेळात त्याने दुभाषी रामराम बसूंकडे बंगालीचा अभ्यास केला. या संदर्भात संस्कृतचे महत्त्व जाणून संस्कृतचाही त्याने चांगला अभ्यास केला. ह्याच सुमारास नापूरकर भोसल्यांचे वकील वेणीरामपंत यांचे आश्रित वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने त्याने मराठीचाही अभ्यास केला. १७९९ मध्ये त्याची नोकरी सुटली. या सुमारासच इंग्लंडवरून ख्रिस्ती धर्मप्रचारार्थ केंद्र स्थापण्यासाठी मार्शमन, वॉर्ड, ब्रॅड्सन व ग्रांट हिंदुस्थानात श्रीरामपूर (सेरामपूर) येथे आले व त्यांनी कॅरीस तेथे बोलावून घेतले. १० जानेवारी १८०० मध्ये बॅष्टिस्ट मिशन चे केंद्र तेथे स्थापन झाले.
श्रीरामपूर येथे जम बसताच कॅरीने तेथे एक चर्च, शाळा व छापखाना उभारला आणि आपल्या सहकांऱ्याच्या मदतीने धर्मप्रसारास प्रारंभ केला. या सुमारासच ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली (४ मे १८००). एप्रिल १८०१ मध्ये कॅरीची या कॉलेजात संस्कृत, बंगाली व मराठीचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. मृत्युंजय विद्यालंकार, रामराम बसू व वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने कॅरीने आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तसेच ह्या भांषातील मुद्रणव्यवसायाचा पाया घातला.
कॅरी व त्याच्या सहकाऱ्यांनी बायबलचा सर्व हिंदूस्थानी भाषांत व प्रमुख बोलीत अनुवाद करण्याचे योजिले होते आणि त्यासाठी छापखाना सुरु केला होता. छापखान्याचे आवश्यक साहित्य इंग्लंडवरुन आणले; परंतु मुख्य प्रश्न हिंदूस्थानी भाषांचा टंकांचा होता. कॅरीने टंक पाडण्याचे काम सर विल्किन्झ यांच्या हाताखाली तयार झालेल्या पंचानन नावाच्या लोहाराकडून करुन घेतले. पंचाननाचा मदतनीस मनोहर याने तर पुढे टंकाचा कारखानाच उभारला. कॅरीने स्थापन केलेला छापखाना पुढे श्रीरामपूर मिशन प्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला. बायबलचे चाळीस हिंदूस्थानी भाषा – बोलींतील अनुवाद याच छापखान्यात छापून प्रसिद्ध झाले. तसेच बंगाल गॅझेट, दिग्दर्शन व समाचार दर्पण ही नियतकालिकेही तेथूनच प्रसिद्ध होत असत. बंगाली नियतकालिक प्रकाशनाचा आरंभ तेथेच झाला.
फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये असताना कॅरीला मुख्यत्वे तीन प्रश्न सोडवावे लागले : (१) पाठयपुस्तके तयार करणे(२) ज्या भारतीय भाषांत ती तयार करावयाची त्यांची सारणी निश्चित करणे आणि (३) बंगाली लोकंना मातृभाषेची गोडी लावून ग्रंथलेखनास प्रवृत्त करणे. या दृष्टीने बंगाली पंडित जमवून कॅरीने कामास सुरुवात केली. रामराम बसू ह्यास बंगाली राजांचा इतिहास लिहिण्यास तसेच मृत्युंजय विद्यालंकार, राजीवलोचन मुख्योपाध्याय, हरप्रसाद राय, तारिणीचरण मित्र आणि चंडीचरण मुन्शी ह्यांना भारतीय ऐतिहासिक कथा, लोककथा व आख्यायिका गोळा करुन त्या लेखनबद्ध करण्यास त्याने प्रवृत्त केले. १८०१ मध्ये त्यानी बंगाली व्याकरण व १८१५ ते १८२५ ह्या काळात बंगाली शब्दकोश तीन खंडात (८०,००० शब्द) प्रसिद्ध केला. याशिवाय कथोपकथन (१८०१) आणि इतिहासमाला (१८१२) ही बंगाली पुस्तकेही त्याने प्रसिद्ध केली.
कॅरीने ग्रामर ऑफ मराठा लॅंग्वेज (१८०५) व डिक्शनरी ऑफ मराठा लॅंग्वेज (१८१०) हे ग्रंथ तयार करुन प्रसिद्ध केले. मराठीतील हे पहिले मुद्रित गद्यपुस्तक होय. यापुढील सोळा वर्षांत त्याने बायबलचा जुना व नवा करार मराठीत भागशः प्रसिद्ध केला. यांशिवाय त्याने वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्याकडून मूळ बंगालीवरून सिंहासन बत्तिशी (१८१४), हितोपदेश (१८१५) आणि प्रतापदित्य चरित्र (१८१६) हे तीन मराठी अनुवाद करून घेतले. महाराष्ट्रात ग्रंथप्रकाशनाचा आरंभ १८२२ मध्ये पंचोपाख्यान ग्रंथाने झाला असला, तरी त्यापूर्वी बंगालमध्ये झालेली मराठी ग्रंथनिर्मिती लक्षात घेता, मराठी ग्रंथमुद्रणाच्या आणि प्रकाशनाच्या आद्यप्रर्वतनाचे श्रेय विल्यम कॅरीकडेच जाते. श्रीरामपूर येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Carey, S. P. Willian Carey, 1923.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.