सासनवंस : (शासनवंश). पाली काव्यग्रन्थ. रचना ब्रह्मदेशीय भिक्षु पञ्ञासामि (प्रज्ञास्वामी) ह्याने केली (१८६१).या ग्रंथामध्ये बुद्ध काळापासून एकोणविसाव्या शतकापर्यंतचा स्थविरवादी बौद्धधर्माचा इतिहास आला आहे. त्याची विभागणी एकंदर १० परिच्छेदात केली आहे. ह्या ग्रंथात बुद्धाचे जीवन, राजा अजातशत्रु, कालाशोक आणि सम्राट अशोकाच्या काळात झालेल्या तीन बौद्ध संगीतिंचा वृत्तांत आहे. सहाव्या परिच्छेदात ब्रह्मदेशामध्ये बौद्ध धर्माच्या विकासाची महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ‘अपरान्तरट्ठ’ आणि ‘सुनापरन्तक’ या प्रांतांना एकच मानून त्यांना ब्रह्मदेशांतर्गत मानले आहे. तपस्सु आणि भल्लिक हे दोन ब्रह्मदेशीय व्यापारी स्वत: बुद्धाकडून दीक्षा घेऊन प्रथम उपासक झाले होते, ह्याच काळात बुद्ध शिष्य गवम्पती थेर याने स्वतः ब्रह्मदेशात जाऊन धम्मप्रचार केला होता. ह्या आग्रहामुळे स्वतः बुद्ध आकाशमार्गाने ब्रह्मदेशातील सुधम्मपुर नगरात पोहचले आणि दर्शनार्थ आलेल्या सहा तपस्व्यांना सहा केश पूजार्थ दिले होते. बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर गवम्पतिने बुद्धाचे दंतधातु सुधम्मपुरला आणुन त्यावर ३३ स्तूप बांधले. ह्या सर्वांचे वर्णन या ग्रंथात आहे. ह्या दोन घटनांव्यतिरिक्त बुद्धाने पुन्हा एकदा ब्रह्मदेशातील सुप्पारकतित्थ ला जाऊन सात दिवस ध्यान-प्रवचन केल्याचा उल्लेख आहे.
वस्तूत: अन्य पाली स्त्रोतांवरून सिद्ध झाले आहे कि अपरान्त म्हणजे गुजरातचा व महाराष्ट्राचा समुद्र किनारा आणि सुनापरन्तक व सुप्परक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र होय. पण लेखकाने आजच्या महाराष्ट्राला मात्र थाई मानले आहे. तसेच गवम्पती बुद्ध तेथे गेल्याचे ऐतिहासिक दाखले मिळत नसले तरी तपस्सु व भल्लिक हे बुद्धाचे सहा केश घेऊन बर्माला गेल्याचे पुरावे मिळतात. श्रीमती मेबिल बोडने सासनवंस मध्ये दिलेल्या माहिती वर आधारित आपला पालि लिटरेचर ऑफ बरमा हा शोधनिबंध लिहिला. ब्रह्मदेशातल्या ३०० ग्रंथांचा उल्लेख ह्या ग्रंथात आहे. ब्रह्मदेशीय स्त्रियांद्वारे पाली साहित्य लिहिण्या-वाचण्याचे उल्लेख ह्या ग्रंथात आहेत. अशा स्त्रियांना सद्दनयेसु अतिकोविदा म्हणजे ‘शब्द शास्त्रात अतिनिपुण’ असे संबोधले जाई. १३ वे शतक ब्राह्मि-पाली साहित्याच्या दृष्टिने ब्रह्मदेशात सुवर्ण युग मानले जाते. तेथील भिक्षुसंघाचा इतिहास, सिंहली भिक्षुसंघ व राजा या संबंधित विद्यार्थांच्या दृष्टिने भरपूर माहिती आढळते. सम्राट अशोकाने हिमवंत प्रदेशात स्थविर मज्झिमला धर्मप्रचारासाठी पाठविले होते असा उल्लेख पाली अट्ठकथांमध्ये आढळतो. पण सासनवंसच्या लेखकानुसार त्याला चीन मध्ये पाठविण्यात आले होते. ऐतिहासिक, धार्मिक, साहित्यिक दृष्टिने या ग्रंथाला फार महत्व आहे.
संदर्भ : Rhys Davids, T.W., The History and Literature of Buddhism,Kolkata, 1962.
समीक्षक : प्रतिभा पिंगळे