इतिवुत्तक : बौद्ध साहित्यानुसार पाली तिपिटकामधील सुत्तपिटक या भागातील खुद्दकनिकायतील चौथा ग्रंथ म्हणजे इतिवुत्तक होय. या ग्रंथातील काही अपवादात्मक सुत्त वगळता प्रत्येक सुत्ताची सुरूवात ही “वुत्तं हेतं भगवता, वुत्तमरहता ति में सुतं” म्हणजे ‘भगवंतांकडून असे म्हटले गेले, अर्हन्तानी बोललेले असे मी ऐकले’ अशाप्रकारे होते. यामुळेच या ग्रंथाचे नाव इतिवुत्तक असे आहे. या ग्रंथामध्ये एकूण ११२ सुत्त आहेत जे चार प्रकरणांमध्ये (निपात) विभागले आहेत.

इतिवुत्तक ग्रंथामधील सुत्तांची रचना ही गद्य व पद्य मिश्रित असून आकाराने लहान आहेत. सुत्ताच्या सुरुवातीला गद्य भाग व नंतर त्याच अर्थाची किंवा त्याला सहाय्यक अशी पद्य रचना (गाथा) दिली आहे व हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.यातील गद्य भाग हा मूळ बुद्धवचन असून त्याला पुरक अशी पद्य रचना संगीतिकारांनी केली आहे. तसेच अंगुत्तर निकायाप्रमाणे निपात पद्धतीने याची रचना केली आहे. प्रत्येक निपातातील सुत्त हे त्या निपाताच्या नावानुसार त्या संख्येशी संबंधित आहेत.सुत्तांची शैली व भाषा अतिशय सोपी व सुगम आहे.

एकक निपातातील प्रथम वर्गात लोभ, द्वेष, मोह, क्रोध, अहंकार यांचा त्याग केल्याने अनागामी (अर्हत पदाच्या आधीची अवस्था)  फळ प्राप्त होते तसेच दुःखाच्या नाशाची शक्यता आहे असे म्हटले आहे. द्वितीय वर्गात अविद्या व तृष्णेचा नाश, मैत्रीच्या भावनेने क्लेषांचा नाश तर धम्माचे सुक्ष्म चिंतन केल्याने निर्वाण लाभणे सोईस्कर होते. तसेच संघ विघटन हा साधनेमधील एक अडथळा आहे असे सांगितले आहे. तृतीय वर्गात पुण्ण्यकर्मांमुळे सुखप्राप्ती, प्रसन्नचित्त व्यक्तीला स्वर्गसुखाची तर पापी व्यक्तीला दुःखाची प्राप्ती होते. तसेच दानाचे व मैत्री भावनेचे महत्त्व विशद केले आहे.

द्विक निपातातील प्रथम वर्गामध्ये इंद्रियसंवर व भोजनाची मात्रा न जाणणारा दुर्गतीला जातो, दुराचारीला नरक प्राप्ती होते, आळशी व्यक्तीला निर्वाण लाभणे अशक्य तर शीलाचारीला स्वर्गप्राप्ती लाभते, साधनेचा वापर लाभ, सत्कार वा लबाडीसाठी करण्यास मनाई, प्रसन्न चित्ताने व प्रयत्नशील राहत ध्यानसाधना करावी असे म्हटले आहे. द्वितीय वर्गात ध्यान करणाऱ्याचे वितर्क विचार, अविद्येमुळे अकुशल गोष्टींची निर्मिती, एकांतात साधनेचे महत्त्व, जागृत राहून साधना करणे इत्यादी उपदेश केले आहेत.

तिकनिपातातील पाच वर्गांमध्ये लोभ, द्वेष व मोह ही तीन अकुशलाची मूळे आहेत, त्रिविध वेदना (सुख, दुःख, अदुःख-असुख) ज्ञानाने आस्रवक्षय व निर्वाणप्राप्ती, त्रिविध धातु (रूप, अरूप, निरोध), त्रिविध इच्छा (काम, भव, ब्रह्मचर्य), त्रिविध आस्रव (कामासव, भवासव, विभवासव), त्रिविध तण्हा (काम, भव, विभव), माराला पराजित करणारे त्रिविध गुण (शील, समाधी, प्रज्ञा), तीन प्रकारचे सुचरित आणि दुश्चरित असे विविध वर्णन केले आहे.

चतुक्क निपातामध्ये चार आर्यसत्य जाणणाराच खरा श्रमण वा ब्राह्मण व त्याचे जागृतपणे आचरण करणारा आस्रवमुक्त होऊन निर्वाण प्राप्त करतो, भिक्षूंच्या चार आवश्यक गोष्टी व त्याच्या लोभापासून दूर रहावे, चार प्रकारच्या शीलांनी संपन्न भिक्षू अशा इतर विषयांचे वर्णन आले आहे.के. आर. नॉर्मन या विद्वानाच्या मतानुसार चौथा निपात त्रिपिटकातील इतर साहित्यातून संकलित केला आहे आणि निपात म्हणून या ग्रंथामध्ये नंतर जोडले गेले आहे. त्यांच्यामते या ग्रंथाची एक जुनी चिनी आवृत्ती की जी मूळ प्राकृत किंवा संस्कृतपासून भाषांतरित केली असावी त्यामध्ये चौथ्या निपाताचा अभाव आहे, मात्र तिसऱ्या निपातामध्ये जास्तीची सुत्ते आहेत जी पाली आवृत्तीमध्ये नाहीत. या चिनी आवृत्तीचे मूळ सर्वास्तिवादी शाखेशी संबंधित असण्याची शक्यता आहे असेही म्हटले आहे.

संदर्भ :

• इतिवुत्तकपाळि सुत्तनिपातपाळि, धम्मगिरि-पालि-गन्थमाला, विपश्यना विशोधन विन्यास,धम्मगिरी, इगतपुरी, १९९५.

समीक्षक : मैत्रेयी देशपांडे