तिपिटकांची भाषा : गौतम बुद्धांच्या वचनांचे संकलन म्हणजे तीपिटके (त्रिपिटक).बौद्धधर्माच्या ज्ञानासाठी पाली साहित्य हा महान स्रोत आहे. त्यातही तिपिटके सर्वात महत्त्वाची आहेत. हीनयान तसेच महायान विचारसणींची बीजे तिपिटकांमध्ये आणि त्यांचे स्पष्टीकरण करणाऱ्या अठ्ठकथांमध्ये आहेत. तिपिटके म्हणजे तीन पेटारे, तीनसंग्रह. बुद्धवचनांचे वर्गीकरण करून ती विषयांप्रमाणे तीन गटात संकलित केली गेली. ती तीन संकलने म्हणजे पिटके. विनय पिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक ही ती तीन पिटके.या तीन पिटकांची भाषा पाली भाषा म्हणून ओळखली जाते.

भाषाशास्त्राच्या दृष्टीने पाली भाषा हा प्राचीन प्राकृत भाषेचाच एक भेद किंवा प्रकार मानला जातो. ही भाषा मगध आणि त्याच्या आसपासच्या भागातील प्रादेशिक बोली होती. त्या भाषेतूनच गौतम बुद्धांनी धर्मोपदेश केला. धार्मिक ग्रंथांची भाषा झाल्याने तिला नंतर स्वतंत्र अस्तित्व मिळाले. राजकीय घडामोडींमुळे या भाषेत काही बदल झाले आणि तिचा विकासही झाला. अनेक ठिकाणांहून आलेल्या भिक्षूंच्या भाषेचाही परिणाम या भाषेवर झाला. स्वतः गौतम बुद्धांनीच बुद्धवचने आपापल्या भाषेत आणि पद्धतीने विशद करण्यास अनुमती दिली होती. चुल्लवग्गमधील  ५.३३ या वचनाप्रमाणे ही वचने वेदांप्रमाणे स्वरनिविष्ट करून त्याचे गायन करू नये असा दण्डक घालून दिला आहे. या सर्व कारणांमुळे बुद्धवचने ग्रथित करणा‍ऱ्या या भाषेमध्ये विविध भाषिक प्रवृत्ती आणि त्यामुळे अनेक भाषिक वैविध्ये दिसतात. ह्या सर्व प्रवृत्ती आणि वैविध्ये तिपिटकांच्या भाषेत येतात. तिपिटकांमध्ये बदलत्या काळाबरोबर बुद्धवचनांच्या भाषेत बदल होत गेला असल्याचे जाणवते. मगध प्रांताची म्हणून मागधी असा उल्लेख झालेली ही भाषा विविध रूपांमध्ये सामोरी येते. मागधीची ‘श’ आणि ‘ल’ असणारी रूपे पालीच्या प्राचीन सुत्तांमधे आढळतात, पण नंतरच्या भाषेतील तिपिटकांच्या काही भागात आणि अट्ठकथांमध्ये ती मिळत नाहीत, ती अशोकाच्या शिलालेखांमध्ये सापडतात. तिपिटकांचा प्रसार होण्यासाठी मौखिक माध्यमच अधिक वापरले गेले. त्यामुळेही भाषेमध्ये परिवर्तन झाले आणि विकासही झाला. या परिवर्तनाचा दुष्परिणाम काय होईल याबद्दल स्वतः महात्मा बुद्धांनी बोलून ठेवले आहे. कालांतराने त्यांचा उपदेश व त्यांचे सिद्धान्त भ्रमात्मक स्वरूपात व्यक्त केले जाण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी महापरिनिब्बानसुत्तामध्ये व्यक्त केली आहे. भाषेला महत्त्व न देता त्यातील आशय महत्त्वाचा आहे असे गौतम बुद्धांचे म्हणणे होते. (माज्झिमनिकाय१०३).त्यामुळे भाषिक वैशिष्ट्यांकडे जास्त लक्ष दिले गेले नाही. मगधामध्ये फिरायला लागल्यावर तिथली बोली त्यांनी स्वीकारली असावी. पण उपलब्ध  तिपिटकांची भाषा इ.स.पू. तिसऱ्या शतकातील संहितांपेक्षा वेगळी आहे. पाटलीपुत्रमध्ये भिक्षूंनी जेव्हा धर्मसंहिता एकत्र केली तेव्हा त्यांनी मगध या त्यांच्या प्रदेशातील प्राचीन बोली वापरली असावी. श्रीलंका, म्यानमार, थायलंड येथील बौद्ध अनुयायांची भाषाही शिलालेख, साहित्यकृती आणि वैयाकरणांच्या भाषेपेक्षा वेगळीच आहे. तसे पाहता, पाली भाषाही फक्त साहित्यिक भाषा असावी आणि तिचा वापर फक्त बौद्धांनीच त्यांच्या वाङ्‌मय निर्मितीसाठी केला.

तिपिटकामध्ये बुद्धवचने सादर केली गेली तीन प्रकारच्या रचनांमध्ये किंवा आकृतीबंधात. मज्झिमनिकायातील पहिल्या भागातील ३२व्या सुत्तात ‘नवंगंसत्युसारनम्‌’ असा त्याचा संदर्भ येतो. सुत्त, गेय्य, वैय्याकरण, गाथा, उदान, इतिवुत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेद असे ते नऊ प्रकार आहेत. हे सर्व प्रकार भाषेत आधीच्या काळापासून अस्तित्वात होते व प्रचलितही होते, यांचे तिपिटकातील अनेक ग्रंथात संदर्भ येतात. छोटे छोटे उतारे किंवा संहिता,संघाचे नियम, भाषणे, संवाद, पद्यबद्ध सूत्रे अथवा गाथा आणि अगदी सूक्ष्म किंवा संक्षिप्त स्वरूपातील संहिता असे अनेक प्रकारचे साहित्य बुद्धवचने सांगण्यासाठी प्रचारात होते आणि भिक्षू त्याचे नित्यनियमाने पठणही करीत असत. विनयपिटक, महावग्ग आणि उदान मधे सुत्तनिपातातील अट्ठकवग्गातील पद्ये येतात. या पद्यांचे गायन अथवा पठण करणाऱ्यांना ‘सरभाणक’ म्हणत. तसेच भिक्षूंमधे सुत्तन्तिक, धम्मकथिक, विनयधर असे प्रकार असत. या सर्वांच्या मौखिक पठणामुळे त्यांची त्यांची भाषिक वैशिष्ट्ये भाषेमध्ये आली आहेत.

तिपिटकांमधील पद्यांमध्ये भाषाशास्त्रीय दृष्ट्या वैदिकभाषेत आढळणारी प्राचीन तत्त्वे दिसतात. ध्वनिपरिवर्तन आणि रूपसिद्धीच्या बाबतीत आधीच्या काही रचनांमध्ये ही तत्त्वे ठळकपणे जाणवतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सुत्तनिपाताची भाषा. समूहतासे (गा. १४), भवामसे (३२), सुवाना (२०१), जनेत्वा (६९५), कुप्पटिच्चसन्ति (७८४) असे विविध प्रयोग यात आहेत. एवढेच नव्हे तर त्यातील विचारही वैदिक काळातील आहेत.धम्मपद आणि सुत्तनिपातामधे देव, यज्ञ, ब्राह्मण, मुनी यांविषयी लक्षणे सांगून चर्चा केली आहे.मुनी कोणास म्हणावे, मुनीने समाजात कसे वागावे, त्याचे आचरण कसे असावे याचाही विचार सुत्तनिपातामध्ये दिसतो. सुत्तनिपात अधिक काव्यात्म आहे. धार्मिक गीतिकाव्य असे त्याचे स्वरूप आहे. संवादरूप आणि आख्यानयुक्त सुत्तेही त्यात आहेत. पद्य गद्यापेक्षा प्राचीन आहे. पद्यातील विषय गद्यात पुनरुक्त होतात. अठ्ठकवग्ग व पारायणवग्ग अधिक प्राचीन आहेत. गायत्री सारखे वैदिक छंद, अनुष्टुप्‌ तसेच इन्द्रवज्रा, उपेन्द्रवज्रा या सारख्या वृत्तांमध्ये रचना आहे.

तिपिटकांची गद्यभाषा पद्यांच्या भाषेच्या तुलनेत एकात्मिक आहे. जातकांसारख्या नंतरच्या रचनांमध्ये नवीन रूपे आढळतात, तशी आधीच्या रचनांमध्ये आढळत नाहीत. नंतर नंतर भाषा अधिकाधिक कृत्रिम आणि आलंकारिक होत गेली. उदा. मिलिन्दपञ्ह जातक आणि अवदानांमध्ये उपमादी अलंकारांचा वापर भरपूर झालेला दिसतो, तो आधीच्या रचनांमध्ये दिसत नाही.

गौतम बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर काही आठवड्यातच बुद्धवचनांचे गायन झाले आणि विनयपिटकांचे संकलन झाले असे इतिहास सांगतो.चुलवग्गामध्ये(११) प्रथम धम्मसंगीतीची हकिकत येते.विनयपिटकामध्ये संघासाठी आवश्यक नियम संकलित केलेले आहेत तर सुत्तपिटकामध्ये पाच निकायांमधे मोठ्या संख्येत सुत्तांचे संकलन झाले आहे. त्यांपैकी खुद्दकनिकायात अनेक छोट्या-मोठ्या ग्रंथांचा समावेश आहे. त्या ग्रंथांची निर्मिती ही एका काळात झालेली नाही, त्यामुळे त्यांच्या भाषेतही आधीच्या व नंतरच्या प्रवृत्ती किंवा शैली ठळकपणे जाणवतात. दीघनिकाय आणि मज्झिमनिकायातील सुत्तेदेखील विविध काळात आणि विविध नामांनी संकलित झाली असे म्हणतात. त्यातील काही सुत्ते साक्षात बुद्धवचने आहेत, त्यांची सुरुवात ‘एकंसमयंभगवा….’ यावाक्यांशाने होते, काही सुत्ते निवेदित आहेत, अनेकांची सुरुवात ‘एवंमेसुतं’ या शब्दांनी  होते. मौखिक परंपरे बरोबर लेखनकलाही त्यावेळेस अस्तित्वात असावी असे लेखक, लेखापेति, लेखसिप्प, अक्खरिकइ या  शब्दांवरून वाटते.

बुद्धवचनांचे जे नऊप्रकार सांगितले ते सादरीकरणाच्या शैलीबद्दलही काही अर्थ सूचित करतात. सुत्त म्हणजे ‘सूक्त’.धम्म किंवा प्रवचन म्हणून सुत्तपिटकातील सुत्तांना सुवन्न म्हणतात. ही सुत्ते अनेक ठिकाणी पाल्हाळिक,पुनरुक्तीने भरलेली आणि शब्दप्रचुर आहेत. गेय्य म्हणजे गद्यामधील गाण्याजोग्या पण वृत्तबद्ध नसलेल्या रचना आहेत. स्पष्टीकरण, विवरण करणाऱ्या  प्रकाराला वेय्याकरण म्हणतात. अनेक सुत्तांमधे, कथांमधे प्राचीन गाथा समाविष्ट आहेत. अनेक पद्यरचनां मध्येही ‘गाथा’ आहेत. उदान म्हणजे खूप मोठा अर्थ सांगणारी छोटी छोटी वचने. इतिवुत्तक म्हणजे घटनांचे निवेदन करणारी वचने. जातकांमध्ये बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा आहेत. आश्चर्यकारक आणि अद्भूत घटनांचे जे वर्णन आहे ते अब्भुतधम्म प्रकारात येते आणि प्रश्नोत्तर रूपी भागाला वेदल्ल म्हणतात. हे सर्व शब्दही  वैशिष्ट्यपूर्णआहेत. काही प्रकार हे ग्रंथाची नावेही आहेत. उदा. उदान,जातक. या ग्रंथांचा समावेश खुद्दकनिकायात होतो आणि जातके निश्चितपणे उत्तरकालीन आहेत.

सुत्तपिटकामध्ये इतिहास, तत्कालीन समाज, त्याची संस्कृती, भाषाविज्ञान, मनोविज्ञानाचे दर्शन घडते. आयुर्वेदीय तसेच दार्शनिक तत्त्वेही दिसतात. उपमा, रूपक, कथा, गाथा इत्यादींच्या माध्यमातून शील, समाधी, पञ्ज या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. पटीच्चसमुप्पाद आणि मज्झिमापटिपदही सांगितली आहेत. अनिच्चता, दुक्ख, अनत्तता यांवरील बुद्धांचे विचार आणि विचार करण्याची साधने तसेच चार आर्यसत्ये, आसवक्खय यावर चिंतन यांमधे येते. दीघनिकायातील सुत्तांमधे उपदेश, चर्चा, विचार येतात. यात पुनरावृत्ती अधिक प्रमाणात आढळते. सामञ्जफलसुत्त इतर चार सुत्तांमधे पुनरुक्त झालेले दिसते. सुत्तनिपातामधील महावग्गातील अनेक भाग इतर काही वग्गांमधे सापडतात. मज्झिम निकायातील सुत्ते स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहेत. विवरणासाठी पौराणिक आणि काल्पनिक कथा येतात. पाली साहित्यातील थेरवादी परंपरेने बुद्धांना मानवी स्वरूपात सादर केले. यापरंपरेने बुद्धवचनांचे संरक्षण सर्वात जास्त केले. मज्झिम निकायातील काही सुत्तांमध्ये गौतम बुद्धांच्या अद्भूत धर्माचे, तसेच लोकोत्तरवादी तत्त्वांचे दर्शन होते. अंगुत्तरनिकायामधे अंकांनुसार रचना केली आहे. ही परंपरा अथर्ववेद संहितेशी थेट नाते सांगते.यामधे अनेक प्रक्षिप्त अंशही दिसतात. संवाद शैलीची प्राचीनताही दिसते. खुद्दकनिकायातील काही ग्रंथ उदा. धम्मपद, सुत्तनिपात प्राचीन भाषेतील रचना आहेत.ऋग्वेदीय भाषेचा प्रभाव, औपनिषदिक तत्त्वज्ञानासारखे विचार आणि बोधपर काव्य या दोन्ही ग्रंथात दिसते. या निकायातील काही ग्रंथांमधे कल्पनांचा विकास झालेला दिसतो. थेरगाथा, येरीगाथा, जातके ही बुद्धवचने नाहीत. त्यांत मूळपिटक परंपरेचे विकसित रूप दिसते. एकूणात पाहता सुत्तपिटक हे धम्मपिटकच आहे.

या दोन्हीपिटकांच्या नंतर पाटलीपुत्र येथे झालेल्या धम्मसंगीतीच्या वेळेस अभिधम्मपिटकाचे संकलन झाले. मोग्गल्लिपुत्तविस्सथेराने ‘कथावत्थू’ ची रचना तेव्हा केली आणि त्याचा अभिधम्मपिटकात समावेश झाला. हा अभिधम्म पिटकातील शेवटचा ग्रंथ. बुद्धांनंतर विकसित झालेले थेरवादाचे रूप या पिटकात व्यक्त होते.

गौतम बुद्धांनी सांगितले होते की त्यांच्यानंतर त्यांची वचनेच त्यांचे रूप आहे. ही वचने एकत्रित करून पुढे नेण्याचे कार्य त्यांच्या शिष्यांनी आणि अनुयायांनी केले, आणि आजही ती वचने तिपिटकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यात समाविष्ट असलेल्या ग्रंथांच्या रचनेच्या विविध काळाप्रमाणे, त्यातील बदलणाऱ्या संकल्पना आणि त्या व्यक्त करणाऱ्या भाषेची वेगवेगळी रूपे, वेगवेगळ्या कालानुसार होत जाणारा तिचा विकास आणि स्थित्यंतरे या तिपिटकांधून समोर येतात आणि एका मोठ्या कालखंडातील वैचारिक, सैद्धांतिक तसेच सांस्कृतिक घडामोडींचा संपूर्ण आलेख या भाषेच्या द्वारा उलगडत जातो.

संदर्भ ग्रंथ :

• Elliot ,Charles, Hinduism and Buddhism , London,1921.

• Davids,T.W.Rhys,Buddhist India,London,1903.

• Kern,Johan Hendrik Caspar,Manual of Indian Buddhism,1896.

समीक्षक : माधवी कोल्हटकर