मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट बनवणारी चित्रपटसृष्टी. ⇨ हॉलीवुडच्या पाठोपाठ जगातील सर्वांत मोठा चित्रपट-उद्योग म्हणून बॉलीवुडचे नाव घेतले जाते. बॉलीवुड हे नाव हॉलीवुड या अमेरिकन चित्रपटसृष्टीपासूनच निर्माण झाले. वर्षाला लहानमोठे असे सातशे ते हजार चित्रपट येथे बनतात. बॉलीवुडचे मुख्य केंद्र बॉम्बे (आजची मुंबई) आहे. २०१४ पर्यंत बॉलीवुडची आर्थिक उलाढाल ही सुमारे १४ हजार कोटी रुपये इतकी होती. याच काळात मुख्य प्रवाहातील उत्कृष्ट हिंदी चित्रपट शंभर कोटी, दोनशे वा अगदी तीनशे कोटींचा व्यवसाय करू लागल्याचे दिसते.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ⇨ दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार केला आणि भारतीय चित्रपटनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली गेली (१९१३). आलम आरा (१९३१) हा पहिला भारतीय बोलपट, तर १९३७ मध्ये आलेला किशन कन्हैया हा भारतात तयार झालेला पहिला रंगीत चित्रपट होता. कागज के फूल हा १९५९ मधील पहिला सिनेमास्कोप आणि पहिला ७० एमएम चित्रपट अराउंड द वर्ल्ड (१९६७) हा होय. शिवा का इन्साफ (१९८५) हा पहिला भारतीय त्रिमितीय चित्रपट होय.
मुख्य प्रवाहातील चित्रपट म्हणजे रूढार्थाने व्यावसायिक चित्रपट. हिंदी चित्रपटांमध्ये व्यावसायिक चित्रपट आणि कलात्मक चित्रपट अशी फाळणी नेमकी कधीपासून केली जाऊ लागली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुतेक चित्रपट सामाजिक असत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय समाजात असलेल्या आदर्शवादाचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये पडू लागले होते. मात्र, तेव्हा चित्रपटांचे असे दोन भाग केलेले नव्हते. फिअरलेस नादिया (१९०८-१९९६) यांचे देमार (स्टंट) चित्रपट आणि सामाजिक बांधीलकी मानणारे चित्रपट हे मुख्य प्रवाहातील चित्रपटच होते. हळूहळू त्यांत बदल होत गेला आणि प्रेमकथा वा सूडकथा हाच हिंदी चित्रपटांचा मुख्य गाभा बनला. चित्रपटगृहांचे वर्चस्व कमी झाले आणि व्यक्ती महत्त्वाच्या ठरू लागल्या. तरीही सर्व चित्रपटांना एकाच मापात मोजले जात होते. बंगालीमध्ये _सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी समांतर चित्रपट म्हणता येतील असे वेगळे चित्रपट करायला सुरुवात केली होती. मात्र हिंदीमध्ये १९६०च्या दशकाच्या शेवटी आणि १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांपेक्षा काहीतरी वेगळे सांगणार्या चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. १९६९ मध्ये दिग्दर्शक _मृणाल सेन यांचा भुवनशोम हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा अंकुर हा चित्रपट १९७४ मध्ये पडद्यावर आला. तेव्हापासून साधारणपणे कलात्मक चित्रपट ही संज्ञा वापरली जाऊ लागली. ज्या चित्रपटांमध्ये व्यावसायिक गणितांचा विचार केलेला नसतो किंवा ज्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शकाची दृष्टी ही आर्थिक यशापयशापेक्षा महत्त्वाची मानली जाते, अशा चित्रपटांना कलात्मक चित्रपट म्हटले जाऊ लागले. बाकीचे चित्रपट हे मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपट म्हणून बघितले जात. हे मुख्य प्रवाहातील चित्रपट बॉलीवुडचे प्रतिनिधित्व करतात, असे मानले जात असे.
राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद या त्रयीला हिंदी चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट मानले गेले. त्याआधी अशोककुमार यांचेही चित्रपट गाजले होते. या कलावंतांनी अस्सल मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांबरोबरच त्या काळात वेगळे वाटतील असे अनेक चित्रपटही आवर्जून केले. गुरुदत्त आणि बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी तर अनेकदा मुख्य प्रवाहाला छेद देणारे चित्रपट बनवले. पण त्या काळात चित्रपटाचे यश हे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवरच अवलंबून नव्हते, तर संगीताचाही त्यात मोठा वाटा असे. लीला चिटणीस, नलिनी जयवंत यांच्यापासून ते मीनाकुमारी, मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, नूतन यांच्यापर्यंत सर्व नायिकांच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होत होती. मुख्य म्हणजे मनोरंजन आणि प्रबोधन हे दोन्ही हेतू मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांसाठी आवश्यक होते. तथापि शम्मी कपूर यांनी मुख्य प्रवाहातील चित्रपटांचे हे गणित बदलले. कश्मिर की कली, जंगली, तुमसा नहीं देखा, राजकुमार असे शम्मी कपूर यांचे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे होते. हीच साखळी त्यानंतरही चालू राहिली आणि नायिका शोभेची बाहुली बनू लागली. शर्मिला टागोर, सायरा बानू, आशा पारेख या नायिकांनी काही वेगळ्या भूमिका जरूर केल्या; पण मुख्यत: त्यांचे काम हे नायकाला पूरक असेच होते.
७०च्या दशकाच्या सुरुवातीला संजीव कुमार, शशी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र हे बॉलीवुडमधील लोकप्रिय अभिनेते होते. राजेश खन्नांचा उदय याच दशकातला. राजेश खन्ना यांच्या निमित्ताने ‘सुपरस्टार’ ही संज्ञा अस्तित्वात आली. राजेश खन्ना आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासाठी या शब्दांचा प्रयोग करण्यात आला.
मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये प्रेम, मारामारी, नाट्य, विनोद अशा सगळ्या गोष्टींची भेळ असायला हवी, ही समजूत हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वीपासूनच होती. हळूहळू ती अधिकाधिक दृढ होऊ लागली. चित्रपटनिर्मितीमध्ये आर्थिक गणितांचा विचार इतर सर्व बाबींपेक्षा अधिक वरचढ ठरू लागला. त्यामुळे धोका पतकरण्याचे प्रमाण कमी झाले, त्याचा परिणाम चित्रपटांच्या कथानकावर होऊ लागला. फार वेगळे काही करण्यापासून दिग्दर्शक दूर जाऊ लागले.
९०च्या दशकाच्या अखेरीपासून बॉलीवुडमध्ये मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये पुन्हा नवनवीन प्रयोग होऊ लागल्याचे दिसते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीच्या दुसर्या टप्प्यामध्ये केलेले ब्लॅक, अक्स किंवा पिकू हे चित्रपट मुख्य प्रवाहातील होत. इरफान खान यांच्यासारख्या रूढार्थाने नायकाचे व्यक्तिमत्त्व नसलेल्या अभिनेत्यांना बॉलीवुडमध्ये चित्रपट मिळतात, हेसुद्धा याचेच लक्षण म्हणायला हवे. आशुतोष गोवारीकर, विशाल भारद्वाज, इम्तियाज अली, शिमित अमीन, अनुराग कश्यप, शुजीत सरकार, दिबाकर बॅनर्जी, सुजय घोष अशा अनेक दिग्दर्शकांनी मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट केले आहेत. केवळ व्यावसायिक गणितांचा त्यांनी विचार केलेला नाही. विख्यात अभिनेते आमिर खान यांनी सातत्याने व्यावसायिक आणि कलात्मकतेचे गणित जुळवून मुख्य प्रवाहात चांगले आणि वेगळे चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे.
समीक्षक – अभिजित देशपांडे