भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेला अभिजात कलात्मक चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेला हा हिंदी कृष्णधवल चित्रपट आहे. हा चित्रपट १९ फेब्रुवारी १९५७ साली प्रदर्शित झाला. गुरुदत्त यांनी लिहिलेल्या ‘कश्मकश’ या कथेमध्ये काही बदल करून प्यासा या चित्रपटाच्या कथेची निर्मिती करण्यात आली. चित्रपटाचे नाव सुरुवातीस ‘प्यास’ असे ठरले होते; पण कवीमनाच्या गुरुदत्त यांनी ते बदलून प्यासा  केले. या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्वकाळातली आहे. जवळच्या माणसांकडून व समाजाकडून आलेल्या विदारक अनुभवांमुळे एका बेरोजगार तरुण कवीच्या झालेल्या परवडीचे प्रत्ययकारी चित्रण या चित्रपटात केले आहे.

प्यासा चित्रपटात गुरुदत्त (विजय), वहिदा रेहमान (गुलाबो), माला सिन्हा (मीना), रेहमान, महमूद (विजयचा भाऊ) व जॉनी वॉकर (तेलमालिशवाला) इत्यादी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. गुरुदत्त यांनी यात नायक विजयची भूमिका केली आणि माला सिन्हा व वहिदा रेहमान यांनी नायिका व सहनायिकेच्या भूमिका निभावल्या आहेत. कारदार स्टुडिओ, फेमस स्टुडिओ येथे व मुंबई, कोलकाता या शहरांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात झाले.

पैशाच्या लोभापायी खालच्या थराला गेलेल्या सख्ख्या भावांच्या वागणुकीमुळे कवी असलेला विजय वडिलांच्या निधनानंतर परागंदा होतो. व्यवहारी जगतात त्याच्या गझलांचे, कवितांचे मोल कुणालाच नसते. विजयची प्रेयसी मीना हिने प्रेमापेक्षा वरचढ मानून स्वीकारलेला व्यवहाराचा मार्ग त्यामुळे ती एक श्रीमंत प्रकाशक घोषबाबू याच्याशी विवाह करते. तिचा नवरा विजयवर असलेल्या संशयामुळे त्याचा वारंवार अपमान करायची संधी शोधत असतो आणि त्यात बऱ्याअंशी यशस्वीही होतो. या सगळ्या विषण्ण करणाऱ्या परिस्थितीत नायकाची गाठ दुर्दैवी पण कलेचे मोल जाणणाऱ्या गुलाबो या गणिकेशी पडते. विजयच्या कवितांवर केलेले निःस्वार्थी प्रेम व नंतर कफल्लक आणि हतबल झालेल्या विजयचा तिने केलेला स्वीकार, तेलमालिश करणाऱ्या अब्दुल सत्तार या मित्राने शेवटपर्यंत निभावलेली मैत्री असे मानवी वृत्तीचे अनेक भलेबुरे कंगोरे या चित्रपटात पहावयास मिळतात. सोळा रिळांच्या या चित्रपटाच्या शेवटी विजय एकटाच या स्वार्थी दुनियेपासून दूर निघून जातो असे दाखवले होते; परंतु हा शेवट प्रेक्षकांना न रुचल्याने गुरुदत्त यांनी चित्रपटाचा शेवट बदलून गुलाबोही विजयबरोबर निघून जाते असा केला.

साहिर लुधियानवी यांच्या कविता चित्रपटाची कथा पुढे नेतातच पण या गाण्यांचे चित्रीकरण कवीच्या जीवनाचे आणि दुनियेचे वास्तवही दर्शविते. या गाण्यांना सचिनदेव बर्मन यांनी संगीत दिले आहे. ‘आज साजन मुझे अंग लगालो’, ‘हम आपकी आँखो मे इस दिलको बसा दे तो’, ‘जाने क्या तूने कहीं’, ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला’, ‘सर जो तेरा चकराये’, ‘जिन्हे नाझ है हिंद पर’ इत्यादी गाणी अजूनही रसिक श्रोत्यांना मोहित करतात. चित्रपटात गुरुदत्तवर चित्रित झालेल्या गाण्यांसाठी मोहम्मद रफी व हेमंतकुमार या दोन गायकांनी आवाज दिला आहे. गीता दत्त या एकाच गायिकेचा आवाज वहिदा रेहमान व माला सिन्हा या दोघींसाठी वापरला आहे. साहिर लुधियानवी व सचिनदेव बर्मन या गीतकार-संगीतकार जोडीचा प्यासा हा शेवटचा चित्रपट होय. ३५ मिमी. वर चित्रित झालेल्या, १४६ मिनिटांचा कालावधी असलेल्या या चित्रपटाची प्रत्येक दृश्यचौकट, त्यासाठी केलेली प्रकाशयोजना, दृश्यसंकलन, दृश्य विभागणी या तांत्रिक बाजू गुरुदत्त यांनी हाताळल्या. जोडीला कला दिग्दर्शक बिरेन नाग, छायाचित्रणकार व्ही. के. मूर्ती होते. या चित्रपटातले संवाद गाजले. गुरुदत्तच्या तोंडी असलेला अबरार अल्वी यांचा, “अपने शौक के लिए प्यार करती हैं और अपने आराम के लिए प्यार बेचती हैं” हा संवाद चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहिला आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दुःखद शेवट आवडला नाही म्हणून प्रेक्षकांनी याकडे सुरुवातीला पाठ फिरवली; पण शोकान्त शेवट बदलून सुखान्त केल्यानंतर मात्र प्रेक्षकांनी चित्रपटास गर्दी केली. या चित्रपटाची तेव्हाची कमाई दीड कोटीच्या आसपास झाली होती. ही तत्कालीन चित्रपटांकरिताची एक मोठी कमाई मानली जाते. टाइम या मासिकानुसार १९२३ पासूनच्या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे. गुरुदत्त यांच्या निधनानंतर हा चित्रपट देशविदेशातदेखील वाखाणला गेला. फ्रान्स व जर्मनी या देशांमध्ये या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. नवव्या आंतरराष्ट्रीय आशियाई चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवला गेला. प्यासा ही गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकीर्दीतील एक उत्कृष्ट म्हणून कलाकृती मान्यता पावली.

समीक्षक : निखिलेश चित्रे